Praniti Shinde Emotional: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बारामती येथे लाखो जनसमुदाच्या साक्षीनं त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी सर्वांनाच आपले अश्रू अनावर झाले होते. सर्वांनी अजित पवारांना भावपूर्ण निरोप दिला. अजित दादांचं असं अकाली जाणं हे साऱ्यांसाठी धक्कादायक होतं. या धक्क्यातून अजूनही कोणी सावरु शकलं नाहीय. अजित पवारांच्या आठवणी सांगताना काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे भावूक झालेल्या दिसल्या. त्यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? जाणून घेऊया.
महाराष्ट्राचे दादा आपल्यातून निघून गेलेत विश्वास बसत नाही. सकाळी अपघाताचे वृत्त आले. दादा त्यात नसावेत, अशी प्रार्थना सुरु होती. असतील तर सुखरुप असावेत असं सारख वाटत होतं पण अत्यंत धक्कादायक बातमी कानावर आली. अंगावर शहारा आला. मी त्यांच्यासाठी लहान बहीणीसारखी होती. आमच कौटुंबिक नातं होतं. 2 महिन्यापुर्वीच भाचीच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला गेलो होतो. माझ्या मतदार संघासाठी दादांनी खास निधी दिली होता. मी निवडून आली तेव्हा त्यांनी फोन करुन अभिनंदन केलं. काय गं प्रणिती… असं ते म्हणायचे.
अजित पवार दिलखुलास जगत होते. जिल्हा परिषद निवडणुकीत मेहनत घेत होते. 9 ची मिटींग असेल तर 10 मिनिट आधी ते पोहोचायचे. हेक्टीक लाईफस्टाईल. बारामतीत त्यांचे विमान क्रॅश झाले. स्वत:च्या गावात विमान क्रॅश झालं. चॉपर समजू शकते पण विमान लॅंडींगवेळी क्रॅश होणं हे खूप धक्कादायक आहे. विमान ट्विन इंजिन असायला हवं असं आपण म्हणतो पण ते त्याबाबतीत दक्ष होते, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
मी पहिल्यांदा आमदार झाले. दादांनी मला पाहीलं, त्यांना अभिमान वाटला आणि ते आनंदी झाले. मुख्यमंत्री व्हायचं त्यांचं स्वप्न होतं. कधीकधी आम्ही मुख्यमत्रीऐवजी त्यांच्याकडे जास्तवेळा जायचो. बोलायचे. कामासाठी निधी द्यायचे. बोरामणी एअरपोर्टसाठी 20 कोटी निधी देतो असं थेट सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा जीआर निघायचा. जे काही असेल ते दिलखुलास बोलायचे. विरोधी पक्षातील असले तरी त्यांचे काम करायचे. मोठी पोकळी निर्माण झालीय, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
अजित पवारांचा उत्तराधिकारी कोण?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झीरवाळ यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला निरोप दिल्यानंतर मैदानातून बाहेर पडताना उत्तराधिकाऱ्याबद्दल विधान केलं आहे. “अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात,” असं झीरवाळ यांनी म्हटलं आहे. “राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे,” असं नरहरी झीरवाळ म्हणाले आहेत. “आता तुतारी, घड्याळ वेगळं नाही, दोन्ही एकच,” असल्याचंही झीरवाळ म्हणालेत. “आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्याच आहेत आता इथुन पुढे एकत्रच असणार यात शंका नाही,” असंही झीरवाळ यांनी नमूद केलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार?
दोन्ही राष्ट्रवादी विलीन होण्यासंदर्भात दोन्ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही. भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी अनेकांनी अजित पवारांसोबत जाण्याचा पर्याय निवडला होता. शरद पवार जर भाजपासोबत युतीसाठी तयार असतील तरच हे सर्व त्यांना साथ देतील अशी शक्यता आहे. अन्य़था ते शरद पवारांचं नेतृत्व स्विकारणार नाहीत. अनेक नेते, आमदारांची शरद पवारांसोबत जाऊन विरोधी पक्षात बसावं अशी इच्छा नाही अशी सूत्रांची माहिती आहे. पुढील काही दिवसात खासदार सुनेत्रा पवार यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. पण सुनेत्रा पवार यांच्याकडे संघटनात्मक किंवा राजकीय अनुभव नसल्याने ती अडचण ठरु शकते. मुलगा पार्थ आणि जय पवार यांच्याकडेही नेतृत्व सोपवण्याइतका अनुभव नाही.