Maharashtra Weather News : देशातील हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच महाराष्ट्रसुद्धा यास अपवाद ठरलेला नाही. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असणारं अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं सत्र आता दूर सरलं असून काही जिल्ह्यांमध्ये तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. राज्यात हिवाळ्यानं अखेरच्या टप्प्यात प्रवेश केला असून, त्यामुळं हवेतील उष्मा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. असं असलं तरीही एक अनपेक्षित स्थिती राज्यातील हवामानात पाहायला मिळेल. 

Add Zee News as a Preferred Source

हिवाळा सरणार, पण मग नेमकं काय घडणार? 

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमीजास्त होत असला तरीही आता महाराष्ट्रावर मात्र या स्थितीचा फारसा परिणाम दिसून येत नाहीय. राज्यात पुढील काही दिवस पहाटेच्या वेळी आणि रात्री उशीरानं दुर्गम गावखेड्यांमध्ये धुक्याची स्थिती पाहायला मिळेल. घाटमाथ्यावरील परिसर, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भागसुद्धा इथं अपवाद ठरणार नाही. या धुक्याचा थेट दृश्यमानतेवर परिणाम होणार असल्यामुळं दिल्ली- हरियाणातील धुक्याच्या चादरीप्रमाणंच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातही ओढावताना दिसेल. 

किनारपट्टी भाग आणि मुंबईसाठी कोणता इशारा?

राज्यातील कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबईत हवामान अंशत: दमट आणि कोरडं असेल. आकाश बहुतांशी निरभ्र असून कमाल सरासरी तापमान 30 अंशांदरम्यान आणि किमान तापमान 24 अंशांदरम्यान असेल. दरम्यानच्या काळात कुठंही पावसाचा इशारा मात्र नाही. 

पश्चिम महाराष्ट्रातही तापमानवाढीस सुरुवात झाली असून सातारा, सांगली, कोल्हापुरात आकाश काही भागांमध्ये अंशत: ढगाळ असेल, थंडीचा कडाका कमी झाला असला तरीही इथं हवेत गारठा मात्र कायम असेल. जिथं सरासरी कमाल तापमान 30 ते 32 अंश आणि किमान सरासरी तापमान 18 ते 20 अंशांदरम्यान असेल असा अंदाज आहे. 

कोणत्या राज्यांना बसणार पावसाचा तडाखा?

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातील 8 राज्यांना भीषण थंडीचा इशारा असून, यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगढचा समावेश आहे. तर, 5 राज्यांना पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये राजस्थान, हिमाचलचा काही भाग, पंजाब, जम्मू काश्मीर आणि लडाखचा समावेश आहे. या पावसाच्या अंदाजातच ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून, त्यामुळं काही अडचणी उद्भवू शकतात, ज्या धर्तीवर सावधगिरी बाळगण्याच्या सूचना यंत्रणांनी केल्या आहेत. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp