Maharashtra Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये अद्यापही थंडीचं वातावरण कायम असतानाच मध्य भारत आणि दक्षिण भारतामध्ये मात्र वाऱ्यांची दिशा बदलली असल्यानं याचा परिणाम हवामान बदलांमध्ये दिसत आहे. परिणामी महाराष्ट्रात गारठा कमी होण्यात सुरुवात झाली आहे. प्रामुख्यानं राज्यातील किनारपट्टी भागांमध्ये दमट हवामानात वाढ होत असल्याचं चित्र आहे. तर, बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानातही चढ- उतार होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यासह मुंबई शहरात कसं असेल हवामान? (Mumbai Weather)
मागील 24 तासांमध्ये राज्यात धुळ्यात किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून इथं आकडा 10.5 अंश सेल्सिअवर स्थिरावला होता. तर, सर्वाधिक तापमानाची नोंद कोकणातील रत्नागिरी इथं करण्यात आली. जिथं पारा 34 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. ही स्थिती पाहता ढगाळ वातावरणामुळं राज्यात दमट हवामान आणि तापमानातील चढ- उतारांमध्ये पुढच्या 24 तासांमध्येही सातत्य पाहायला मिळणार आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानवाढील सुरुवात झाली असून, थंडी हळुहळू महाराष्ट्राची वेस ओलांडताना दिसत आहे. पुढचे पाच दिवस ही स्थिती कायम राहणार असून मुंबई शहर, उपनगरांमध्ये तापमानाच 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि रायगडसह कोकणातील काही भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, हलक्या पावसाचीसुद्धा हजेरी असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे.
थंडी, पाऊस नव्हे, तर देशात धुक्याचा यलो अलर्ट!
केंद्रीय हवामान विभागानं देशाच्या बहुतांश भागांमध्ये धुक्याची चादर आणि त्याचा दृश्यमानतेवर होणारा थेट परिणाम पाहता यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, महाराष्ट्रातील घाट क्षेत्रावरही दाट धुक्याची चादर कायम असल्यानं पहाटे आणि रात्री उशिरा वाट या धुक्यात हरवताना दिसेल. राजस्थान, उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्हे, पंजाब, हरियाणा, दिल्लीपासून अगदी उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये दिवस माथ्यावर येऊनही धुकं मागे हटणार नसल्यानं दृश्यमानता प्रभावित होताना दिसेल.
तिथं जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका तुलनेनं कमी होण्यास सुरुवात झाली असून, थंडी बऱ्याच प्रमाणात कमी नसली तरीही हाडं गोठवणाऱ्या स्थितीपासून या भागाला किमान दिलासा मिळत आहे हे खरं. मैदानी भागांमध्ये मात्र गारठा कायम असून, पश्चिमी झंझावाताचा परिणाम पुढील 24 तासांमध्ये इथं कशा प्रकारात पाहायला मिळते यावर हवामान विभागाचंही लक्ष असेल.