Milind Narvekar Letter to Devendra Fadnavis: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’च्या उद्घाटनापूर्वी मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं असलं तरी, सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला सावध केले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
बोर घाटातील खोल दरी आणि हवेचा प्रचंड दाब लक्षात घेता, सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय घाईघाईत हा मार्ग सुरू करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसंच, सुरुवातीचे 6 महिने प्रायोगिक तत्त्वावर केवळ प्रवासी वाहनेच या मार्गावरून सोडावीत आणि भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जड वाहनं तसंच ज्वलनशील पदार्थ नेणाऱ्या टँकर्सना या मार्गावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही नार्वेकर यांनी केली आहे.
नार्वेकर यांची ही मागणी फेब्रुवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात खंडाळा घाटात झालेल्या भीषण टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. त्या अपघातात प्रोपिलिन गॅसची गळती झाल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग तब्बल 32 तास ठप्प झाला होता आणि हजारो प्रवासी अडकून पडले होते.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण झाल्यावर, सुरक्षेच्या कारणास्तव सुरुवातीचे ६ महिने केवळ प्रवासी वाहनेच या मार्गावरून सोडण्यात यावीत. अशी मागणी मी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी (@Dev_Fadnavis), उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी… pic.twitter.com/Lctg1a2aYm
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 18, 2026
अशा आपत्कालीन स्थितीत प्रभावी मदतीसाठी त्यांनी यापूर्वीच अटल सेतूवर (MTHL) हेलिपॅड आणि आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांच्या वेळी तातडीने बचाव कार्य करणे शक्य होईल.
पत्रात काय लिहिलं आहे?
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक प्रकल्प या राज्याच्या महत्वाकांक्षी व जागतिक दर्जाच्या प्रकल्पाचे काम त्वरेने प्रगतीत आहे. सदरहू प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होऊन अपघातात घट होणार आहे. त्यामुळे बोर घाटातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. सदरहू प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होणार असल्याचे समजते याबाबत सर्वप्रथम आपले मनापासून अभिनंदन.
तसंच या अनुषंगाने सार्वजनिक उपक्रम समिती सदस्य म्हणून मी विनंती करतो की, सदर प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने व बोर घाटातील खोल दरीत मोठ्या प्रमाणात हवेचा दाब असून व पावसाच्या व धुक्याचे गडद क्षेत्र असल्याने सदर प्रकल्पातील सर्व तांत्रिक चाचण्या व अनुषंगिक कामे पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक सुरु होण्याची घाई करण्यात येऊ नये. तशा सूचना आपल्या स्तरावरुन संबंधितांस देणेबाबत विनंती आहे.
तसेच सद्यस्थइतीत मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून मोट्या प्रमाणात दळणवळण होणाऱ्या अवजड वाहनांमुळे घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या अनुषंगाने एक सूचनावजा विनंती आहे की, सदर प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रायोगिक स्तरावर किमान 6 महिने फक्त प्रवासी वाहने या मार्गाने सोडण्यात यावीत व अवजड वाहने सोडण्यात येऊ नये. तसंच कोणत्याही प्रकारची इंधने/ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारी वाहने या मार्गावर कधीही सोडण्यात येऊ नये म्हणून भविष्यात कोणतीही दुर्घटना होणार नाही.