विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगरच्या राजकारणात सध्या दानवे आणि भुमरे यांच्या चांगलीच जुंपली आहे. आणि याचं कारण ठरलंय समृद्धीची जमीन आणि त्याचा मिळणारा मोबदला. भुमरेंनी 1150 कोटी रुपये घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय. आणि यासाठी चालक जावेदची मदत घेतली असा दानवे यांचा आरोप आहे. याच आरोपांवरून आता भुमरे आणि त्यांचा चालक दोघेही संतापलेत. खासदार संदिपान भुमरे यांचे चालक जावेद शेख यांनी अंबादास दानवे यांना कायदेशीर नोटीस पाठवलीय. दानवेंनी सात दिवसात जाहीर माफी मा गावी अन्यथा एक कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दानवेंच्याविरोधात ठोकणार असल्याचा इशारा जावेद शेख यांनी नोटिसीतून दिलाय.
जावेद शेख यांच्या नोटीसमध्ये काय म्हटलंय?
– कोणतेही खात्री न करता जावेद शेख यांच्यावर बदनामीकारक आरोप करण्यात आले.
– सात दिवसांच्या आत आपण केलेले विधान वर्तमानपत्रातून किंवा प्रसार माध्यामातून परत घ्यावे
– वर्तमान पत्रात जाहीर प्रगटनाद्वारे दिलीगिरी व्यक्त करावी
– वक्तव्य परत घेऊन दिलगिरी व्यक्त न केल्यास आपल्याविरोधात एक कोटी रुपयाचा अबुनुकासानीचा दावा दाखल करण्यात येईल
दानवे-शिरसाट यांच्यात उत्तर-प्रत्युत्तर
या नोटीसला उत्तर देताना अंबादास दानवे यांनी भुमरेंचा अक्षरशः समाचार घेतला आहे. “अब्रू असणाऱ्यांनी नुकसानीची नोटीस पाठवावी,” असा बोचरा टोला लगावत दानवेंनी भुमरेंच्या इभ्रतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ही नोटीस मी माझ्या वकिलांकडे दिली असून, त्याला कायद्याच्या भाषेत चोख उत्तर दिले जाईल, असं दानवेंनी म्हटलंय. तर याबाबत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सावध भूमिका घेत, आरोप करणं सोपं आहे. सिद्ध करणं कठीण आहे असा टोला लगावला आहे.
जावेद शेखच्या कायदेशीर कचाट्यात दानवे अडकणार का?
आता सर्वांच्या नजरा 8 दिवसांच्या मुदतीकडे लागल्या आहेत. भुमरे खरंच 1 कोटींचा दावा ठोकणार की दानवे नवी कागदपत्रं बाहेर काढून भुमरेंची अडचण वाढवणार… ड्रायव्हरच्या नावावर झालेली जमीन प्रकरण आणि त्यातून उभे राहिलेले 1150 कोटींचे संशयाचं भूत आता भुमरेंची पाठ सोडणार की दानवेंना या कायदेशीर कचाट्यात अडकवणार, या संघर्षानं जिल्ह्याचं राजकीय वातावरण कमालीचे तापलंय.