Pune Cat vs Parror Fight: पुण्यात मांजर आणि पोपटावरुन झालेला वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. मांजर आणि पोपटामुळे सख्खे शेजारी एकमेकांचे पक्के वैरी झाले आहेत. या दोन प्राण्यांमुळे शेजाऱ्यांमध्ये झालेला शाब्दिक नंतर हाणामारीपर्यंत पोहोचला. हे प्रकऱण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनेश रंगराव पोताबत्तोनी असं मांजराच्या मालकाचं नाव आहे. पुण्यातील ताडीवाला परिसरात ही घटना घडली आहे. परिसरात याच घटनेची चर्चा रंगली आहे.
पुण्यातील ताडीवाला परिसरात मांजर आणि पोपटावरुन दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली आहे. अभिषेक सिंग असं फिर्यादीचं नाव असून, त्यांनी एक पोपट पाळला आहे. त्यांनी पोपटाचा पिंजरा घऱासमोरच ठेवला आहे. दिनेश रंगराव पोताबत्तोनी हा त्यांचा शेजारी राहतो. त्याने घऱात मांजर पाळलं आहे. त्यांची मांजर इतर मांजरींप्रमाणे फक्त घरात न थांबता परिसरात फिरत असते. मात्र बाहेर फिरताना हे मांजर अनेकदा पोपटाच्या पिंजऱ्याजवळ येत त्याला त्रास देत असे.
मांजर पोपटाला त्रास देत असल्याने अभिषेक सिंग आणि दिनेश यांच्यात वाद होत होता. एकदा मांजरीने पोपटाचा पिंजरा ढकलून दिला होता. यावरुन अभिषेक संतापले होते. त्यांनी दिनेशला मांजर पोपटाच्या पिंजऱ्याकडे आली नाही पाहिजे सांगत काळजी घेण्यास सांगितलं.
दरम्यान यावरुन दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. पण प्रकरण इतकं वाढलं की दोघांमध्ये हाणामारी झाली. दोघांचे कुटुंबीयही वादात सहभागी झाल्याने वाद टोकाला गेला होता. यादरम्यान एकमेकांना शिवीगाळही करण्यात आली.
मारहाणीदरम्यान अभिषेक सिंग जखमी झाले. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी मांजरीचा मालक आणि आपला शेजारी दिनेश रंगराव पोताबत्तोनी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दोन प्राण्यांवरुन झालेला वाद गुन्हा दाखल होण्यापर्यंत गेल्याने परिसरात एकच चर्चा रंगली आहे.
पुण्यात हत्या आणि आत्महत्येने खळबळ
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एकतर्फी प्रेमातून घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महाविद्यालयात जाण्यासाठी निघालेल्या एका विद्यार्थिनीवर तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र काही वेळानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश डामसे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. महेशला एका तरुणीवर प्रेम होते. मात्र संबंधित तरुणीने त्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला होता. या गोष्टीचा राग मनात धरून महेशने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. ही तरुणी जुन्नरमधील एका वसतिगृहात राहत होती आणि रोजप्रमाणे ती महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळी बाहेर पडली होती. त्याच वेळी महेशने तिचा पाठलाग करत तिला गाठले आणि अचानक कोयत्याने तिच्यावर हल्ला केला.