Maharashtra Politics Baramati Vidhan Sabha Bypoll: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे. अजित पवारांच्या जागी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवारांनी विधानसभेत जावं अशी सर्व पक्षांची इच्छा आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून या पोटनिवडणुकीत एकही उमेदवार दिला जाणार नाही, असं युगेंद्र पवार यांनी सोमवारीच स्पष्ट केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. सुनेत्रा पवारांविरोधात या ठिकाणी एक तगडा नेता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Add Zee News as a Preferred Source

युगेंद्र पवार या पोटनिवडणुकीसंदर्भात काय म्हणाले?

बारामती पोटनिवडणूक लढणार का यासंदर्भात विचारलं असता युगेंद्र पवारांनी, “तुमच्या सर्वांची इच्छा आहे, महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील, साहेब (शरद पवार) असतील, ताई (सुप्रिया सुळे) असतील, मी असेल आमच्या कुटुंबाची सर्वांची इच्छा आहे आणि बारामतीकरांची पण इच्छा आहे की बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी! ती बिनविरोध झाली पाहिजे. आमच्याकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून बारामतीसाठी कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही,” असं स्पष्टपणे सांगितलं. “आमच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असेल. कुठलाही उमेदवार आम्ही देणार नाही. आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ मदत करू. साहेबांच्या, ताईंच्या मार्गदर्शनाखाली काकींच्या मदतीने बारामतीच्या जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू,” असं युगेंद्र पवार म्हणाले.

सुनेत्रा पवारांविरोधात कोणता समाज अन् का नाराज?

सुनेत्रा पवारांविरोधात या मतदारसंघातून धनगर समाजातून उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासंदर्भातील हलचाली सुरु आहेत. यशवंत ब्रिगेड सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनगर समाज ही निवडणूक का लढवणार आहे हे सांगितलं आहे. “बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलून त्याऐवजी अजित पवार यांचे नाव देण्याच्या हालचालींमुळे धनगर समाज आणि सकल हिंदू समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.​ या पार्श्वभूमीवर,अहिल्यादेवींच्या नावाचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत धनगर समाजाने बारामतीत तगडा उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. “अजित दादांबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु अहिल्यादेवींचे नाव पुसण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही,”अशी भूमिका समाजबांधवांनी घेतली आहे. यामुळे ही निवडणूक आता चुरशीची ठरण्याची शक्यता आहे,” असं सोलनकर म्हणालेत.

कोणत्या बड्या नेत्याचं नाव चर्चेत?

ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केलं आहे. बारामती लोकसभेच्या उमेदवारीबाबत तेथील कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेणार, असल्याचं हाकेंनी स्पष्ट केलं आहे. “बारामती विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मला शेकडो कॉल आलेत की तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. पवार घराणं प्रोफेशनल राजकारण करत आहे,” असं हाके म्हणाले. पुढे बोलताना, “लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध करणं हे लोकशाहीला घातक आहे. निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुठं? निवडणुका म्हणजे प्रश्न मांडण्यासाठी साधन असतं,” असं हाकेंनी म्हटलं आहे. पुढील निर्णय चर्चा करुन घेतला जाईल असंही हाकेंनी म्हटलं आहे. त्यामुळे खरोखरच हाके सुनेत्रा पवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp