Sushma Andhare On Deepak Kesarkar: अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारे यांनी आधी रुपाली चाकणकर आणि आता दीपक केसरकर यांच्यावर निषाणा साधला आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट मध्ये केसरकरांनी भोंदू बाबा खरातशी त्यांचे कॉन्टॅक्ट असल्याचे उघड केले. त्यानंतर सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर एकापाठोपाठ एक टिकांचे बॉम्ब फोडायला सुरूवात केली. त्यांनी केसरकरांचे खरात सोबतचे जुने फोटो दाखवत टीकास्त्र सोडले. यावर त्यांना प्रत्युत्तरही देण्यात आले. मात्र, आता नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अंधारे यांनी केसरकरांवर पुन्हा एकदा टिकेचा बाण सोडला आहे.
सुषमा अंधारे यांचे केसरकरांना आवाहन
दरम्यान, झी 24 तासच्या टू द पॉईंटमध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी अशोक खरात प्रकरणात आणखी 39 नेत्यांची नावे असल्याचे उघड केले. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी केसरकरांना थेट आव्हान केले आहे. त्या म्हणाल्या, ‘केसरकर स्वतः मान्य करतात की ते खरातच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांना मंत्रिपदावरून हटविले म्हणजे ते शिंदेंचे विश्वासपात्र नाहीत. केसरकर यांना आव्हान आहे की, त्या 39 जणांची सगळ्यांची नावे उघड कराच.’
केसरकरांच्या बाजूला प्रत्येक वेळी फोटोत दिसणारा हा व्यक्ती कोण?
यानंतर अंधारे यांनी दीपक केसरकर यांचे खरातसोबतचे काही फोटो दाखवत त्यांच्याव्यतिरिक्त दिसणाऱ्या फोटोमध्ये असणाऱ्या एका व्यक्तिबाबत संशय व्यक्त केला. ‘खरातच्या बाजूला, केसरकरांच्या बाजूला प्रत्येक वेळी फोटोत दिसणारा हा व्यक्ती कोण? ही व्यक्ती सतत का दिसतेय? अतूल सावे यांच्या सोबत पण दिसतोय, हा त्यांचा डावा माणूस आहे का?’ असं म्हणत त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यांनी या व्यक्तिबद्दल काही माहितीही सांगितली. खरात, केसरकर आणि सावे यांच्यासह फोटोमध्ये दिसणाऱ्या या व्यक्तिचे नाव आवारे असून तो जगदंब पतसंस्थेचा चेअरमन आहे. तसेच त्यांनी या व्यक्तीची पोलीस चौकशी करण्याची मागणी केली.
आवारे आणि केसरकरांचा काय संबंध आहे?
तसेच दीपक केसरकर यांनी खरात प्रकरणात त्यांचे नाव जोडल्यानंतर, हे त्यांच्या विरोधात कटकारस्थान केले जाते आहे असे म्हटले. मात्र, यावरही सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘केसरकराचं हे वक्तव्य बालिश आणि हास्यस्पद आहे. केसरकर एमआयडीसीच्या इथे काय करत होते? केसरकर, खरात, चाकणकर सतत एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत काय दिसायचे? आर्थिक हितसंबंधांबाबत केसरकरांनी उत्तरे द्यायला हवीत. केसरकरांनी मान्य केले ते खरातकडे जात होते. जगदंब पतसंस्थेत काळा पैसा सफेद होत होता. आवारे आणि केसरकरांचा काय संबंध आहे? कांगावा करणं बंद करा आणि नेमक्या प्रश्नांची उत्तरे द्या असे आवाहान त्यांनी केसरकरांना केले आहे. सुषमा अंधारेंच्या या प्रश्नांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. आता याची उत्तरे दीपक केसरकर कशी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.