Eknath Shinde On Meeting With 8 MP of Uddhav Thackeray Shivsena: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असून ठाकरेंच्या शिवसेनेतील 9 पैकी 8 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाणार असल्याची बातमी एका वृत्तपत्राने छापल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली असतानाच आता या विषयावर स्वत: एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. एकनाथ शिंदेंनी या बातमीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या चर्चांवर अगदी स्पष्ट शब्दांमध्ये भाष्य करत नेमकं यामागील सत्य काय आहे हे सांगितलं आहे. शिंदे नक्की काय म्हणाले हे पाहूयात पण त्यापूर्वी ही बातमी काय होती ते जाणून घेऊयात…
बातमीत काय दावा करण्यात आलेला?
शिंदे यांनी बुधवारी रात्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊ खासदारांपैकी आठ खासदारांची बैठक घेतली असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. या बैठकीत या सर्व खासदारांनी पक्षांतर करण्याचे आश्वासन दिल्याचा उल्लेखही बातमीत आहे. ठाणे येथे एका गुप्त आणि तटस्थ ठिकाणी ही बैठक झाल्याचं बातमीमध्ये नमूद केलं आहे. या बैठकीत शिंदे यांनी सहा खासदारांना प्रत्यक्ष भेट घेतली, तर आणखी दोन खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग नोंदवल्याची माहिती देण्यात आली आहे.
नक्की वाचा >> ठाकरेंना सोडून सावंत शिंदेंसोबत? प्रेस कॉन्फरन्समध्येच लिहिलेल्या पत्रात नेमकं म्हटलंय काय? वाचा संपूर्ण मजकूर
ते आठ खासदार कोण?
कोणते खासदार बैठकीला होते असा दावा करण्यात आलाय?
> अरविंद सावंत
> संजय पाटील
> संजय देशमुख
> नागेश पाटील
> राजाराम वाकचुरे
> ओम राजेनिंबाळकर
> राजाभाऊ वाजे
> संजय जाधव
कोणत्या खासदाराचं नाव नाही?
उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 9 पैकी 8 खासदारांनी शिंदेंसोबत चर्चा केल्याचा दावा बातमीत करण्यात आला असला तरी यामध्ये एका खासदाराचं नाव नाहीये. ज्या ठाकरेंच्या खासदारांचं नाव या यादीत नाही ते आहेत, अनिल देसाई!
नक्की वाचा >> ठाकरेंचे 8 खासदार फुटून शिंदेंसोबत? राऊत अगदी स्पष्टच बोलले, ‘माझं आणि आदित्य साहेबांचंही…’
शिंदे काय म्हणाले?
ठाकरेंचे खासदार खरोखरच शिंदेसोबत जाणार की काय? अशी चर्चा आज सकाळपासूनच राजकीय वर्तुळात सुरु असतानचा तीन दिवसांसाठी साताऱ्यामधील आपल्या दरे गावी गेलेल्या शिंदेंनी या साऱ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे,” असं शिंदेंनी म्हटलं आहे. शिंदेंनी या प्रतिक्रियेच्या माध्यमातून सदर प्रकरणावर पडदा टाकला आहे.