Todays Weather News : वादळ, सोसाट्याचा वारा, पाऊस आणि उष्णता यांचा मारा सध्या देशाच्या विविध राज्यांमध्ये विविध प्रमाणात पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल ते अगदी आसाम, केरळ, त्रिपुरा आणि नागालँड इथपर्यंत हवामान बदलांचं हे सत्र सध्या नागरिकांना बेजार करताना दिसत आहे. याचदरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 50 किमीवर पोहोचत असल्या कारणानं या बदलांचा वेग आणखी वाढणार असल्याचा इशारासुद्धा जारी करण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्रावर उष्णतेचा मारा

सूर्याचा मारा आणखी तीव्र होत असल्यामुळं महाराष्ट्रात तापमानवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत ही तापमानवाढ सोसवेनाशी होत आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातही दमट हवामानामुळं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.        

राज्यात दिवसाची सुरुवातच उष्ण वाऱ्यांनी होत असून, दुपारची वेळ अधिकच तापदायक ठरत आहे. ज्यामुळं नागरिकांना अती उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणं टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील सोलापूर, सांगलीमध्ये उष्ण आणि दमट हवामानात वाढ होणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला असून उर्वरित राज्यात आकाश अंशत: ढगाळ असेल तर मुंबई शहरासह उपनगरांमध्येसुद्धा उकाडा कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण पट्ट्यामध्ये हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील, तर किनारपट्टी भागांमध्ये उष्ण वारे अंगाची लाही लाही करतील. उत्तर महाराष्ट्रसुद्धा या उष्ण हवामानास अपवाद ठरणार नाही. थोडक्यात पुढील 24 तास राज्यात उष्णतेच्या लाटेसम वातावरण राहील असाच प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशभरात हवामान बदलांना वेग

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या राज्यांत मैदानी क्षेत्रामध्ये वादळी वारे आणि पाऊस तर, याच राज्यांच्या पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान तापमानात घट अपेक्षित असल्यामुळं पर्यटनाच्य दृष्टीनं या राज्यांच्या दिशेनं जाणाऱ्यांनी हवामान वृत्ताचा आढावा घ्यावा असंही आवाहन करण्यात येत आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp