Nashik BPO Employee Conversion Case: नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे आणि सर्व संशयित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्याती तपासणी केली जात आहे. तपास यंत्रणांना या खात्यांना बाहेरुन फंडिंग मिळत होतं असा संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आतापर्यंत 7 पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. कंपनीची HR निदा खान अद्याप फरार आहे. दरम्यान निदा खानच्या कुटुंबाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
‘खरात प्रकरण दाबण्यासाठी मुलीला फसवलं’
निदा खानच्या वडिलांनी ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना आपल्या मुलीवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. आपल्या मुलीवर खोटे आरोप करण्यात आले असून, दुसरं प्रकरण दाबण्यासाठी हे करण्यात आलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांना दावा केला की, “निदाचा तक्रारदारांशी थेट संपर्क नव्हता. सगळं खोटं असून, भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण दाबण्यासाठी आमच्या मुलीला फसवलं जात आहे”.
‘निदा खान HR नाही’
निदाच्या काका आणि आईने दावा केला आहे की, “आम्ही गरीब आहोत आणि आम्हाला बदनाम केलं जात आहे. आमची मुलगी एचआर नाही, फक्त 15 -16 हजार कमावते”.
कुटुंबाने पुढे म्हटलं की, त्यांच्या मुलीने कधीही कोणावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला नाही. तसंच इतर धर्माच्या देवी-देवतांसदर्भात आक्षेपार्ह भाष्य केलं नाही. कुटुंबाच्या दाव्यानुसार, निदा खान भिवंडीत आपल्या सासरी असून, ती गर्भवती आहे. या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात असून, विनाकारण त्यांच्या मुलीला लक्ष्य केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व वादामुळे कुटुंबाला मानसिक त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
एसआयटी पथक मुंब्र्यात दाखल
दरम्यान नाशिकमधील विशेष तपास पथक पोलीस ठाण्यात दाखल झालं आहे. मुख्य आरोपी निदा खानच्या शोधाकरता नाशिक SIT पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ठाण्यातील मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये ते पोहोचले आहेत. मुख्य आरोपी निदा खान मुंब्र्यात असल्याची माहिती आहे. पथक निदा खानच्या नातेवाईकाला घेवून मुंब्र्यात दाखल झाली आहे.
खान संबंधीत कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर काम करत होती. तिने अनेक प्रकरणं बाहेर येऊ दिली नाही तसंच अटक आरोपी निदा खानच्या इशारावर काम करायचे असं तपासात समोर आलं आहे.
महिला पोलीस अधिकाऱ्यांनी अंडरकव्हर म्हणून केलं काम
सहा महिला अधिकाऱ्यांनी कंपनीत रुजू झाल्यानंतर आरोपींवर लक्ष ठेवलं होतं. मीटिंग आणि कामाच्या ठिकाणी त्याच्या वागणुकीवर त्या बारकाईने लक्ष ठेवून होत्या. यादर्यान त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात होत्या. कामावरुन सुटल्यानंतर संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांना दिली जात होती.