Infrastructure News Navi Mumbai Coastal Road: नवी मुंबईमध्ये एअरपोर्टचं उद्घाटन झाल्यापासून मुख्य शहराशी नवी मुंबई एअरपोर्ट अत्यंत वेगाने जोडण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांसंदर्भात कामाला जोर आल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबई विमानतळापर्यंत कमी वेळात पोहचण्यासाठी दोन कोस्टल रोडचे प्रकल्प विचाराधीन असून यापैकी एक मार्ग खारघर कोस्टल रोड (Kharghar Coastal Road Project) नावाने ओळखला जातो. या रस्त्याचा कोडनेम केसीआर असं आहे. भविष्यात नवी मुंबईमध्ये या विमानतळाच्या माध्यमातून वाढणारी खासगी आणि मोठ्या वाहनांची वाहतूक लक्षात घेत केसीआर फारच महत्त्वाचा ठरणार आहे. नवी मुंबईची कनेक्टीव्हिटी वाढवण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रोजेक्ट नेमका कसा आहे त्यासाठी किती खर्च येणार? हा रोड कोण बांधणार आहे? यासंदर्भातील ए टू झेड माहिती आपण जाणून घेणार आहोत.
खर्च किती? काम कोणाला सोपवलंय?
खारघर कोस्टल रोड प्रकल्प हा नवी मुंबईतील एक महत्त्वकांक्षी इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प सिडकोच्या (CIDCO) माध्यमातून बांधला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोड देण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. साधारण 9.7 किलोमीटरचा आणि अगदी तंतोतंत सांगायचं झालं तर 9.678 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असणार आहे. 30 मीटर रुंदीचा हा रस्ता सहा लेनचा असेल. जीएसटी वगळता 1020.70 कोटी रुपये खर्च करुन हा रस्ता बांधला जाणार आहे. म्हणजेच आकड्यात सांगायचं झालं तर 1020700000000 रुपये इतका खर्च या रोडसाठी येणार आहे. या प्रकल्पाचं कंत्राट संयुक्तरित्या जे. कुमार आणि जे. एम. म्हात्रे यांना देण्यात आलं आहे. प्रकल्पाचा काही भाग 2028 मध्ये वापरासाठी खुला होईल. मात्र संपूर्ण प्रकल्प पूर्णपणे वापरासाठी उपलब्ध होण्यास 2029 उजाडेल.
कुठून कुठे जाणार हा मार्ग?
हा मार्ग पनवेल खाडी किनाऱ्यावरून जाणार आहे. या मार्गाची सुरुवात जलमार्ग सेक्टर 16 पासून होईल आणि तो पुढे सीबीडी बेलापूर आणि नेरूळमधील वॉटर ट्रान्सपोर्ट जेट्टीपर्यंत जाईल. संपूर्ण मार्ग दोन प्रमुख टप्प्यांमध्ये विभागण्यात आला असून पाहिला टप्पा खारघर ते सीबीडी बेलापूर असा असून दुसरा टप्पा सीबीडी बेलापूर ते नेरूळ असा असेल.
लांबी, रुंदी कशी?
या मार्गाच्या एकूण लांबीपैकी सुमारे 6.96 किलोमीटरचं बांधकाम हे नवीन असेल. तर 2.99 किलोमीटरचा रस्ता हा विद्यमान मार्गाची दुरुस्ती करुन नव्या बांधकामाशी जोडला जाणार आहे. काही भागात खाडीवर ब्रिज किंवा रिअक्लेमेशनचा वापर केला जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, विद्युत उपकरणे शिफ्टिंगसारखे प्राथमिक काम सुरू झाले आहे. वन विभागाच्या परवानग्या मिळाल्यानंतर काम पूर्ण वेगाने लवकर सुरू होणार आहे
या मार्गामुळे नेमकं काय होणार?
नवी मुंबई विमानतळाला थेट आणि वेगवान कनेक्टिव्हिटी मिळण्याबरोबरच या मार्गामुळे प्रवासाचा वेळ फार कमी होणार आहे. खारघर ते बेलापूर/नेरूळ दरम्यानचा सध्याचा 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत होईल. सायन-पनवेल महामार्ग आणि पाम बीच रोडशी कनेक्टीव्हिटी प्राप्त होईल. हा मार्ग सुरु झाल्यावर खारघर, नेरूळ, बेलापूर भागात वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होईल. रिअल इस्टेट, कॉर्पोरेट पार्क, रोजगार या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांच्या माध्यमातून या मार्गामुळे नवी मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. तसेच भविष्यातील वॉटर ट्रान्सपोर्ट टर्मिनल आणि इतर प्रकल्पांसाठी कनेक्टीव्हिटी म्हणून हा मार्ग फार उपयुक्त ठरणार आहे. या मार्गामुळे खारघर भागात मोठा विकास होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दुसरा कोस्टल मार्ग कोणता?
दुसरा कोस्टल रोड हा उलवे कोस्टल रोड नावाने ओळखला जातो. हा मार्ग 7 किलोमीटरचा असणार आहे. मुख्य मार्ग 5.8 किलोमीटर आणि विमानतळाशी असलेली लिंक 0.9 ते 1.2 किलोमीटर असेल. हा मार्ग एकूण 6 लेनचा असेल. या मार्गासाठी एकूण 1600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यातून पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा मार्ग सीबीडी बेलापूरमधून सुरु होऊन सीवुड्स-दरावे, उलवे, बामनोंडगरी, तरघर, शिवाजी नगर जंक्शन इथे संपेल. मुंबई ट्रान्स हार्बरशी हा प्रकल्प लिंक्ड असेल. या मार्गामुळे अटल सेतूवरुन विमानतळापर्यंत सिग्नल फ्री आणि वेगवान प्रवास करता येईल. यामुळे प्रवासाची 25 मिनिटं वाचतील. या मार्गाचं 60 टक्के काम पूर्ण झालं आहे.