Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असं असतानाच आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचा बळी दिल्याचा आरोप केला आहे. नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या…
स्वाभिमान गमावून ‘गुलामी’चे राजकारण
काँग्रेससमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची लाचारी सुरु असल्याचा आरोप बन यांनी केला आहे. संजय राऊत यांच्यावर काँग्रेससमोर लाचारी पत्करल्याचा आरोप करण्यात आला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर झुकत राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले. महिला आरक्षण विधेयकाच्या वेळी काँग्रेसने साथ दिली नाही, तरीही त्यांची लाचारी केली जाते, हे दुर्दैवी असल्याची टीका बन यांच्याकडून करण्यात आली.
देशात मोदींचे नेतृत्व ठाम, विरोधक स्वप्नात
राऊत आणि काँग्रेसवर टीका करताना, विरोधक फक्त स्वप्नरंजन करत असल्याचे बन यांच्याकडून सांगण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशाचा ठाम विश्वास असल्याचे बन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ही केवळ सत्तेसाठी एकत्र आलेली ‘कॉमेडी सर्कस’ असल्याचा आरोप बन यांच्याकडून करण्यात आला.
स्थानिक नेतृत्वाला डावलण्याचे राऊतांचे धोरण
काँग्रेस नेत्यांचा अपमान सुरूच असल्याचा टोला लगावत बन यांनी राऊतांना लक्ष्य केलं. संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना डावलण्याचा आरोप बन यांच्याकडून करण्यात आला. नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांना योग्य मान न दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसच राऊत यांना धडा शिकवेल, असा इशारा बन यांच्याकडून देण्यात आला आहे.
महायुतीचं ‘सरप्राईज’ शक्य
दानवे फक्त उबाठा गटाचे उमेदवार असल्याचंही बन यांनी म्हटलं आहे. अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे नव्हे, तर केवळ उबाठा गटाचे उमेदवार आहेत. काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिल्यास समीकरणे बदलतील. महायुतीकडून देखील योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी होऊ शकतात, असं सूचक विधान बन यांनी केलं आहे.
सुषमा अंधारे नाराज
सुषमा अंधारे यांच्या नाराजीवरून उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर बन यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पक्षासाठी काम करूनही त्यांना संधी न देणे, आणि दानवे यांना पुन्हा संधी देणे, यावरून पक्षातील अंतर्गत राजकारण स्पष्ट होत असल्याची टीका बन यांनी केली आहे. राऊत यांनीदेखील अंधारे यांची खिल्ली उडवल्याचा आरोप बन यांच्याकडून करण्यात आला आहे. पक्षातील दुय्यम वागणुकीवरून नाराजी असल्याचं बन म्हणालेत.
जनतेतून निवडून येण्याचे राऊतांना आव्हान
राऊत यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर बन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राऊत यांनी कधीही थेट निवडणूक लढवली नाही, असा आरोप करत त्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आव्हान देण्यात आले. जनतेच्या मतांचा आधार नसताना टीका करण्याचा अधिकार नाही, असे बन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरेंचा राजकीय बळी टळला
दानवे यांना पुढे करून अंतर्गत संघर्ष झाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा बन यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या दबावामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवली नाही, असा गंभीर आरोप बन यांच्याकडून करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे जिंकले असते, पण त्यामुळे राऊत यांच्या राज्यसभा महत्त्वाकांक्षेला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे अंतर्गत दबाव टाकून अंबादास दानवे यांना पुढे करण्यात आले. काँग्रेस उमेदवार दिल्यास या संघर्षाचा परिणाम अधिक तीव्र होईल आणि आघाडीचे अंतर्गत मतभेद उघड होतील, असं बन यांनी म्हटलं आहे.
ईव्हीएम योग्य, पराभवाची शक्यता दिसली की…
पराभव दिसला की शंका उपस्थित करण्याचा आरोप बन यांनी विरोधकांवर केला आहे. निवडणूक जिंकली तर ईव्हीएम योग्य, पराभवाची शक्यता दिसली की त्याच ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्याची विरोधकांची भूमिका असल्याचे बन यांच्याकडून सांगण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्या संदर्भातही राऊत यांनी केवळ वक्तव्ये केली, पण प्रत्यक्ष प्रचारासाठी गेले नाहीत, अशी टीका बन यांच्याकडून करण्यात आली.