Sanjay Raut On Both Shiv Sena Merger: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप आणणाऱ्या शिवसेनेमधील उभ्या फुटीसंदर्भात आता दोन्ही पक्षातील नेत्यांकडून दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात विधानं केली जात असतानाच यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अनेकदा यासंदर्भात बोलताना कोणालाही माफी मिळणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या राऊतांनी यावेळी मात्र मवाळ भूमिका घेतल्याने खरोखरच दोन्ही शिवसेना एकत्र येणार की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे. राऊत नक्की काय म्हणाले आहेत? ही सारी चर्चा का सुरु झाली आहे? यावरच नजर टाकूयात…
भाजपकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न
कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तसेच माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदचे आमदार अंबादास दानवे या दोघांनीही दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे असे विधान केले होते. भाजपकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप, अब्दुल सत्तार यांनी केला. यावरुन बोलताना अंबादास दानवेंनी, “जो बुंद से गाई ओ हौद से नाही आती शेवटी काय भूमिका मांडायच्या त्या त्यांनी मांडल्या आहे. शिंदे सेनेत भाजप मध्ये काय लथड्या आहे ते समोर येत आहे. पालकमंत्री बोलू शकत नाहीत. सत्तार यांनी जी भूमिका मांडली ती अगदी अयोग्य मांडली आहे. आम्ही शिवसेना आहे म्हणत असेल तर ही शिवसेनेची जागा आहे. मी निवडून आलो होतो. मग यांना जागा का नाही मिळाली? शिवसेनेला भाजपने निस्तेनाबूत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हीच भूमिका सत्तार यांनी मांडली आहे. बरं झालं गुहाटी सुरतचे बाहेर आले आहे. आमदार खासदार यांना बोलावलं. याने उमेदवार फॉर्म मागे घेऊ शकतो,” असंही म्हटलं.
पश्चाताप होत असेल, तर…
दोन्ही शिवसेनेनं एकत्र येण्यासंदर्भात सत्तार यांनी व्यक्त केलेल्या इच्छेसंदर्भात बोलताना राऊतांनी, “शिंदे गटातील काही लोकांना पश्चाताप होत असेल, तर त्यांनी आमच्याकडे परत यावं,” असं म्हटलं आहे. “भाजपमध्ये अनेकजण आयात केलेले. भविष्यात भाजपाचा अध्यक्ष बाहेर देशातील झाला तर नवल वाटायला नको,” असा टोलाही राऊतांनी लगावला.
उद्धव ठाकरेशी चर्चा करायला यावं
“शिवसेना एकच आहे. हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि त्याच नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ज्याला हे लोक शिवसेना म्हणतायत ती अमित शहांची शिवसेना आहे. निवडणुक आयोग भाजपाला हाताशी धरून कटकारस्थान करून अमित शहांनी तात्पुरती कंपनी निर्माण केली आहे. ज्यांना त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला असेल त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेशी चर्चा करायला यावं,” असं राऊत यांनी काल शिर्डीत प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.
भाजपबरोबर का गेलात?
सत्तार यांनी व्यक्त केलेल्या इच्छेबद्दल बोलताना राऊतांनी कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला. “तुम्ही आणि तुमचे नेते भाजपबरोबर का गेलात? आज तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर घरगडी म्हणून काम करत आहात ही भूमिका का स्वीकारली? त्यावर आधी भाष्य करा आणि तुमच्या नेत्यांना सांगा,” असा सवाल राऊतांनी विचारला. “भाजपबरोबर जाणं म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी. महाराष्ट्राला खड्डयात घालणं आहे. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या नेतृत्वावाला सांगावं. त्यावर जाहीरपणे भूमिका व्यक्त केली पाहिजे,” अशी अपेक्षा राऊतांनी व्यक्त केली.
अमित शहा यांची सेना
संजय राऊत यांनी अमित शाहांवरही निशाणा साधला. “राज्यातील कोर्ट हे सगळे भाजपचे गुलाम , यांनी सगळे संघाचे नेते नेमले आहेत. भाजपचा वरचष्मा राजकारणात कधीच नव्हता. शिवसेना शिंदे गटाचे नेते अमित शहा म्हणून वारंवार त्यांना दिल्लीला जावं लागतं. ती अमित शहा यांची सेना आहे,” असा टोला राऊतांनी लगावला.
सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल, त्यामुळेच…
सुप्रीम कोर्टातील निकालासंदर्भात बोलताना राऊत यांनी, “सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल. त्यामुळेच निकाल लांबवला जातोय,” असं राऊत म्हणाले. एवढ्यावरच न थांबता राऊतांनी, अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर सूचक विधान केलं. “ज्यांना पश्चाताप होतोय, त्यांनी परत यावं. मात्र काही लोकांना प्रवेश मिळणार नाही,” असं राऊत म्हणाले.