Mumbai Under Water Metro Plan: मुंबई आणि उपनगरांमध्ये वाढत असलेल्या मेट्रो जाळ्यातील कांजूरमार्ग-बदलापूरला जोडणाऱ्या मेट्रो 14 चं काम दोन टप्प्यात करण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरु आहे. हे दोन टप्पे कसे असतील यासंदर्भातील माहिती समोर आली असून पहिल्या टप्प्यामध्ये शीळफाटा ते बदलापूर असा 25 किलोमीटरचा मार्ग उभारण्यात येणरा आहे. यामधील 10 किलोमीटरचा मार्ग कल्याण-शीळफाटा मेट्रो 12 अ मार्गिकेसोबत उभारण्याचा प्रस्ताव आहे. एमएमआरडीएकडून यासंदर्भातील चाचपणी आणि अभ्यास सुरु करण्यात आला आहे.
कसा असणार मार्ग?
बदलापूर, शीळफाटा, महापे, घणसोली, निळजे आदी भागांना थेट मेट्रो 14 मार्गिकेमुळे थेट मुंबईशी कनेक्ट होता येणार आहे. हा मार्ग सुरु झाल्यावर मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावरचा ताण आणि प्रवासी संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे रेल्वेतील गर्दीही कमी होईल. यापूर्वी ही मेट्रो मार्गिका सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्याचा एमएमआरडीएचा विचार होता. त्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यानुसार सुमारे 43.69 किमी लांबीच्या मेट्रो मार्गासाठी स्वारस्य निविदा मागविल्या होत्या.मात्र खासगी भागीदारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पीपीपीच्या निविदा रद्द करण्याची वेळ आली.
…म्हणून दोन टप्प्यात काम
आता एमएमआरडीएने ही मेट्रो मार्गिका ईपीसी तत्त्वावर कर्ज घेऊन उभारण्याचा विचार सुरू केला आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपयांचा खर्च एकाचवेळी करणे शक्य नसल्याने दोन टप्प्यात ही मेट्रो उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.
‘सल्लागार’ची प्रक्रिया सुरू
मेट्रो 14 मार्गिकेच्या प्रकल्पाच्या कामासाठी आर्थिक सुसाध्यता अहवाल, सविस्तर प्रकल्प अहवाल आणि प्रवासी संख्येचा अंदाजाचा नव्याने अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आधीच्या अहवालातील त्रुटी तपासून, तसेच नव्या शक्यतांची पडताळणी करावी लागणार आहे. या सल्लागाराच्या नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
10 किमी लांबीचा मार्ग एकत्रित का?
शीळफाटा ते बदलापूर पहिल्या टप्प्यात असा मार्ग उभारला जाईल. याच भागातून कल्याण शीळफाटा मेट्रो 12 अ मार्गिका जाणार आहे. मेट्रो 14 आणि मेट्रो 12 अ या दोन्ही मार्गिका एकमेकांना समांतर जात असल्याने दोन्हींचा जवळपास 10 किमी लांबीचा मार्ग एकत्रित उभारता येईल का याची पडताळणी एमएमआरडीएने सुरू केली आहे.
खाडीच्या खालून जाणार मेट्रो मार्ग
मेट्रो 14 मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यात शीळफाटा ते कांजूरमार्ग असा मार्ग उभारला जाईल. हा मार्ग ठाणे खाडीच्या खालून म्हणजेच पाण्याखालून जाणार आहे. तसेच या मार्गात मोठ्या प्रमाणात खाडी भाग आणि कांदळवनाचा भाग असणार आहे.