Dasara 2023 : रावण (Ravana) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो रामायणातील ‘व्हिलन’, खलनायक… अशीच या पात्राची आपल्या मनात प्रतिमा असते. वाईट शक्तींचं प्रतिक असलेल्या याच रावणाचं दसऱ्याला दहन केलं जातं. मात्र, अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात चक्क याच रावणाची पुजा केली जाते. या गावात रावणाची पूजा का केली जाते? रावणपूजेची अडीचशे वर्षांची या गावाची परंपरा नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या
सांगोळ्यात आहे रावणाची पुरातन मुर्ती
रावणाची मनोभावे पूजा आणि आरती होत असल्याचं पाहून-ऐकून आपल्याला निश्चितच आश्चर्याचा धक्का बसेल. अन् तेही कोणत्या दाक्षिणात्य राज्यात नव्हे तर चक्क महाराष्ट्रात होतं. अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावाने गेल्या अडीच शतकांपासून रावणपुजेची अनोखी परंपरा जोपासली आहे. फक्त परंपराच नाही तर या गावात 350 वर्षांपुर्वीची रावणाची सुंदर आणि सुरेख मुर्तीसुद्धा आहे. पातूर तालूक्यात असलेलं सांगोळा गाव अकोल्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या अगदी सुरूवातीलाच एका मंदिरवजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर, रेखीव मूर्ती आहे.
गावात रावणाच्या मुर्तीचं असं झालं आगमन
सांगोळा गावात रावणाच्या मंदिरासोबतच श्रीराम, हनुमान, भवानी देवीचंही मंदिर आहे. गावाला अगदी लागूनच गावाची जीवनवाहिनी समजली जाणारी मन नदी वाहते. या मूर्तीच्या आगमनामागची पौराणिक कथाही फार रोचक आहे. याच मन नदीच्या काठी ऋषी-मुनीचे आश्रम होते. अडीचशे वर्षांपूर्वी याच नदीच्या काठावर वास्तव्यास असलेल्या असलेल्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपस्या केली होती. त्यांच्या प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रम होत असत. ऋषी मरण पावल्यानंतर गावकऱ्यांनी मुर्तीच्या रूपाने त्यांच्या स्मृती जपण्याचा निर्णय घेतला. एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती घडवण्याचे काम सोपवले गेले. पण त्याच्या हातून घडली ती दशानन रावणाची मूर्ती. दहा तोंडे, काचा बसवलेले वीस डोळे, सर्व आयुध असलेले वीस हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली. मूर्ती घडवली तिथे दहा फटे असलेले सिंदोळीचे झाड होते. सिंदोळीचे झाड, अवचित घडलेली ही घटना अन त्यातून ‘लंकेश्वराची मूर्ती’ साकारल्या गेल्याचा हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर ‘रावण महाराज’ स्थिरावलेत.
आणि या गावात लंकेश्वर ‘रावण महाराज’ स्थिरावलेत….
ही मूर्ती गावाच्या दुसऱ्या बाजूला ठेवायची होती. मात्र, मूर्ती गावाच्या वेशीवरून समोर हललीच नाही. त्यामुळेच गावाच्या सुरुवातीलाच तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. या आख्यायिकेबद्दल माहिती ही लिखित नसून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत राहते. या घटनेनंतर गेल्या अडीच शतकांपासून ‘रावण महाराज’ सांगोळावासियांचं दैवत बनलं आहे. येथे विजयादशमीला रावणाचे दहन होत नसून त्याची मनोभावे पूजा केली जाते.
एकदा मूर्ती चोरून नेण्याचा प्रयत्न झाला होता
सांगोळ्यातील रावणाची ही सुंदर मुर्ती 50-60 वर्षांपूर्वी चोरून नेण्याचा प्रयत्नही झाला. एकदा काही बाहेरच्या लोकं रात्रीच्या वेळी गावात ही मूर्ती चोरून नेण्याकरीता आली होती. मात्र, मोठे प्रयत्न करूनही ती उचललीच न गेल्याने चोरीचा प्रयत्न फसल्याची आठवण गावकरी सांगतात.
‘रावण महाराज’ सांगोळावासियांचं ‘दैवत’
या गावात रावणाच्या मंदिरासोबत राम, हनुमान आणि इतर देवतांची मंदिरंही आहेत. या देवतांच्या आराधनेबरोबरच गावकरी भक्तीभावानं रावणाचीही आराधना करतात. रावणाच्या मूर्तीचं कुतूहल असल्यानं अनेक लोक या मूर्तीच्या दर्शनालाही येतात. वर्षभरातून दसरा आणि रामनवमीला या रावणासाठी गावकरी विशेष आरती आणि सोहळा साजरा करतात. पुढच्या काळात गावात रावणाचे भव्य मंदिर उभारणीचा ग्रामस्थांचा मानस आहे.
रावणदहन न करण्याचा सांगोळावासियांचा आग्रह
दसऱ्याला होणारं रावण दहन थांबावं, असंही आवाहन हे गावकरी लोकांना करतात. कारण, रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता. देवी सीतेकडे त्यानं कधीही वाईट नजरेनं न बघता तिचा आई म्हणून सन्मानच केल्याचं गावकरी सांगतात. त्यामुळे रावणातील चांगुलपणाला पुजत त्याचा सन्मान केला जावा असं गावकऱ्यांना वाटतं.
खरे राक्षस वेगळेच
रावणात दुर्गुणासोबतच फार मोठे सद्गुणही होते. मात्र, आजही सद्गुण दुर्लक्षित करीत देशभर होळी होतेय ते ती दुर्गुणरुपी रावणाचीच… सध्याच्या परिस्थितीत महागाई, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, राष्ट्रीय एकात्मतेचे मारेकरी हेच खरे राक्षस आहेत. त्यांच्या रूपातील रावणाचा दहन करण्याची शपथ दसऱ्याला घेत देश बलशाली करूयात. सर्वार्थाने हेच खरं आपलं सीमोल्लंघन होऊ शकेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Dasara 2023 : यंदा दसऱ्याचा मुहूर्त कधीचा? होम हवन करण्याचा विधी आणि मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर