अकोला : अकोल्याचे (Akola) भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा (Gowardhan Sharma) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. वयाच्या 74 व्या वर्षी गोवर्धन शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. गोवर्धन शर्मा हे मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. पण उपचारादम्यान शुक्रवारी रात्री 8 वाजता त्यांचा मृत्यू झाला. मागील अनेक दिवसांपासून राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान 04 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अकोल्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट करत गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी म्हटलं की, ‘अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’ तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

गोवर्धन शर्मा यांचा राजकीय प्रवास

गोवर्धन शर्मा यांचा जन्म 2 जानेवारी 1949 रोजी यवतमाळमधील पुसद तालुक्यात झाला. त्यांनी अकोल येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. 1985 ते 1995 पर्यंत अकोला नगरपालिकेत डाबकीरोड भागातून नगरसेवक म्हणून ते विजयी झाले. 1995 मध्ये पहिल्यांदा अकोला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांचा विजय झाला. जून 1995 ते 7 मे 1998 या कालावधीत युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडळात पशु, मत्स्य संवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे ते राज्यमंत्री होते. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 

1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असं सलग सहा वेळा अकोल्यातून ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. अकोला जिल्ह्यात आणि भाजपच्या वर्तुळात ‘लालाजी’ नावाने लोकप्रिय होते.  अतिशय साधं राहणीमान आणि लोकांना सहज उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. लोकांशी थेट जनसंपर्क असल्याने सलग सहावेळा ते निवडणुकीच्या रिंगणात विजयी झाले होते. दरम्यान त्यांनी कधीही चारचाकी किंवा फोनही वापरला नाही. त्यांच्या या राहणीमानाचं विशेष कौतुक केलं जायचं. 

हेही वाचा : 

व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन, वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास





Source link