अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) देखील राज्यभर दौरे आणि सभा करत आहेत. प्रकाश आंबेडकर म्हटलं की, चर्चा होते अकोला लोकसभा मतदारसंघाची (Akola Lok Sabha Constituency), याच मतदारसंघात नवीन वर्षाच्या सुरुवातीला ‘नया साल, नया खासदार’ अशा आशयाचे बॅनर लागले होते. आता पुन्हा अशाच प्रकारचे बॅनर्स अकोल्यात सगळीकडे लागले आहेत.
‘अकोला में तो बस प्रकाश आंबेडकर चल रहे हैं, हिम्मतवाला, ये दिल मांगे… बालासाहब आंबेडकर, यही है राईट चॉईस, जिंदा बंदा, निडर – बेखौफ – बेबाक, अशा आशयाचे बॅनर्स प्रकाश आंबेडकर यांच्या छायाचित्रांसह अकोल्यात झळकत आहेत. त्यामुळे शहरात या बॅनर्सची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांसह आता कार्यकर्ते देखील कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील अनेक भागात लागले बॅनर…
वंचित बहुजन आघाडीने अकोला मतदारसंघाची बांधणी मजबूतरित्या केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत दररोज पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद या मतदारसंघात वाढल्याचे दिसत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात बदल होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेमध्ये आहे. या संदर्भाने अकोला शहरातील जिल्हा परिषद प्रवेश द्वाराजवळ, राधाकृष्ण टॉकीज चौक, नेहरू पार्क, दुर्गा चौक, आदी ठिकाणी वेगवेगळ्या मजकुराचे बॅनर लागले आहेत. या बॅनरने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अकोल्याची जागा महाविकास आघाडीत आंबेडकरांच्या ताब्यात…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपबाबत देखील चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील बहुतांश मतदारसंघावर आघाडीतील नेत्यांचे एकमत झाले आहे. ज्यात अकोला लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीला सोडण्याचा देखील निर्णय झाला आहे. त्यामुळे सहाजिक या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रकाश आंबेडकर स्वतः रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक देखील रंगतदार होणार आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वीच इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते देखील कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..