Maharashtra Vidhan Sabha Election 2024 अकोला : सध्या राज्याचं राजकारण तापलंय ते तिकिटासाठीच्या रस्सीखेचीच्या बातम्यांमुळे. प्रत्येक मतदारसंघातील इच्छुक आपल्या नेत्यांच्या घराचे उंबरठे उमेदवारीसाठी झिजवतांना दिसताय. मात्र, उमेदवारी, निवडणूक आणि राजकारण यांपासून शिकलेली नवतरुणाई काहीशी दूरच राहण्याचा विचार करतेय. मात्र, अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीकडे (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारी मागणाऱ्या एका तरुण उमेदवाराने सर्वांचाचंच लक्ष आपल्याकडे वेधलंय. अकोला पूर्व मतदारसंघातून (Akola East Constituency) वंचित बहुजन आघाडीकडे एका उच्चशिक्षित अभियंता असलेल्या शेतकरी तरुणाने उमेदवारी मागीतली आहे.

अकोल्याचा उच्चशिक्षित शेतकरी निवडणुकीच्या रिंगणात

कौस्तुभ देशमुख असे या तरुणाचं नाव आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयात ‘एम.टेक’ झालेला कौस्तुभ सध्या अकोला शहरालगतच्या डोंगरगावात आधुनिक शेती करतोय. मात्र, शेती करत असतानाच शेती, शेतकरी आणि तरुणाईच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याला राजकारणाच्या रणांगणात उतरायचंय. यासाठी त्याने अकोला पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवाराची मागणी केलीये. 

अकोला जिल्ह्यातील एकूण पाच विधानसभा मतदारसंघांपैकी बाळापुर आणि मुर्तीजापुरात वंचितने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर अकोला पूर्व मतदारसंघात कौस्तुभ देशमुख यांच्यासह पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. असे असले तरी या शर्यतीत उच्चशिक्षित अभियंता कौस्तुभ देशमुख याची वर्णी लागते का? आणि मतदारराजा नवतरुणाईला राज्याच्या राजकारणात साथ देते का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

शेतीच्या बांधावरून थेट निवडणुकीच्या रणांगणात  

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी अनेक पक्षांचे इच्छुक सध्या प्रयत्न करीत आहेत. यामध्ये सर्वाधिक इच्छुकांची संख्या आहे ती वंचित बहुजन आघाडीत. या सर्व इच्छुकांच्या भाऊगर्दीत सध्या एका नावाने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. हे नाव आहे कौस्तुभ देशमुख या तरुणाचं. नुकत्याच तिशी पार केलेल्या कौस्तुभने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयात नागपूरच्या रायसोनी महाविद्यालयातून ‘एम.टेक.’च शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षणानंतर काही काळ अकोला आणि अमरावती येथे त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलं. मात्र, हे सर्व करत असताना त्याला खुणावत होतं आपली माती आणि आपली शेती. यातूनच त्याने अकोल्याला परतत पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय घेतला.‌ अकोला शहरालगतच्या डोंगरगाव येथे देशमुख कुटुंबियांची वडिलोपार्जित शेती आहे. हीच शेती सध्या कौस्तुभ यांच्या शेतीतील प्रयोगांची ‘प्रयोगशाळा’ झाली आहे. ‘आराध्या पोल्ट्री फार्म’ आणि ‘आराध्या डेअरी’च्या माध्यमातून त्यांनी मोठी भरारी घेतली आहे. त्यांच्या डेअरीतून दररोज अकोला शहरात जवळपास 100 लिटर दुधाची विक्री केली जाते. तर पोल्ट्री फार्ममधून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या दोन्ही व्यवसायाच्या माध्यमातून जवळपास 21 कुटुंबांना त्यांनी कायमचा रोजगार दिला आहे.

मात्र, शेती करत असतानाच शेती, शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय क्षेत्रात प्रवेश करणं महत्त्वाचा असल्याचा वाटत असल्याने त्यांनी राजकारणाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला. यातूनच 2020 मध्ये अकोला जिल्हा परिषदेच्या बाबुळगाव सर्कलमधून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नशीब आजमावलं. या निवडणुकीत त्यांना 1200 मते भेटलीत. वडील तीस वर्ष अकोला जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन अधिकारी म्हणून कार्यरत होते. याच माध्यमातून देशमुख कुटुंबियांचा वंचित बहुजन आघाडीची जवळून संपर्क आला. यातूनच कौस्तुभ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अकोला पूर्व मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. 

कौस्तुभ यांच्याकडे कुटूंबाचा राजकीय वारसा 

कौस्तुभ यांचे आजी-आजोबा शंकरराव आणि रमाबाई हे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. तर त्यांचे पणजोबा कृष्णरावबापू देशमुख गारडगावकर हे आमदार राहिले आहेत. त्यांच्या आई माधुरी देशमुख यांनी दोनदा अकोला महापालिकेची निवडणूक लढवली आहे. तर स्वतः कौस्तुभ यांनी एकदा अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे शेती करत असतानाही या कुटुंबाचा राजकारणाशी अगदी जवळचा संबंध राहिला आहे.

 

कोण आहेत कौस्तुभ देशमुख?

कौस्तुभ देशमुख हे सध्या 32 वर्षांचे आहेत. त्याचे वडील अकोला जिल्हा परिषदेतून पशुसंवर्धन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. नागपुरातील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगमध्ये बी. ई. एम. टेक. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण कौस्तुभ ने घेतले आहे. शिक्षणानंतर काही काळ अकोला आणि अमरावतीत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही कौस्तुभ ने नोकरी केली आहे. तर त्यानंतर त्याने पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. शहरालगतच्या डोंगरगाव येथील शेतीत त्याने अनेक नवे प्रयोग केलेत. शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड म्हणून कौस्तुभ ने आराध्या पोल्ट्री उद्योग आणि आराध्या दुध डेअरीच्या माध्यमातून काम सुरू केलं. तसेच 2020 मध्ये अकोला जिल्हा परिषदेसाठी बाभूळगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी मिळवत त्याने 1200 मते घेतली आहेत.

अकोला पूर्व मतदारसंघात वंचितकडून ही नावे आहेत उमेदवारीच्या शर्यतीत 

या मतदारसंघात मोठी ताकद असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अद्याप स्पष्ट नाहीय. वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकूंद भिरड, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक डॉ. संतोष हुशे आणि डॉ. हर्षवर्धन मालोकार यांची नावं चर्चेत आहेत.

अनेक दिग्गज नेते आणि इच्छुकांचे भाऊ गर्दीत कौस्तुभ देशमुख यांना वंचित बहुजन आघाडी उमेदवारी देते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं‌ आहे. सध्याची तरुणाई करिअरच्या मळलेल्या वाटा सोडून राजकारणाकडे जाऊ इच्छित नसताना कौस्तुभ देशमुख यांनी उमेदवारी मागण्याचे दाखवलेले धाडस हे निश्चितच वेगळे म्हणावे लागेल. 

आणखी वाचा

अधिक पाहा..



Source link