प्रतिनीधी कुणाल जामदाडे- Ahilyanagar Crime:  अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोहाळे शिवारात घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कौटुंबिक वादातून एक बापाने आपल्या चार चिमुकल्या मुलांसह आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण कैलास काळे (वय 30, रा. चिखली, ता. श्रीगोंदा) यांची पत्नी आठ दिवसांपूर्वी पती-पत्नीतील वादामुळे माहेरी येवला येथे गेली होती. पत्नी नांदायला येत नसल्याने नैराश्यातून अरुण यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी कोहाळे शिवारात एका विहिरीत चार चिमुकल्यांचे आणि वडिलांचा मृतदेह दिसून आला. अरुण यांनी स्वतःच आपला एक हात आणि एक पाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतल्याचे दिसून येत आहे. ही आत्महत्या आहे की अन्य काही याबाबत स्थानिक पोलीस सध्या तपास करत आहेत.

अजून दोन मुलांचा शोध सुरु 

मयतांची नावे पुढील प्रमाणे आहेत.  शिवानी अरुण काळे (वय 8). प्रेम अरुण काळे (वय 7). वीर अरुण काळे (वय 6). कबीर अरुण काळे (वय 5). अरुण काळे (वय 30). यापैकी अरुण काळे आणि दोन मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात पोलीस आणि गावकऱ्यांना यश आले असून उर्वरित दोन मुलांचा शोध सुरू आहे.

विहिरीत एकाच कुटुंबातील मृतदेह दिसताच उपस्थित गावकरी आणि नातेवाईकांचा हंबरडा फूटला. घटनास्थळापासून काही अंतरावर अरुण यांची मोटारसायकल आढळली असून त्यावरूनच ही घटना घडल्याचा संशय लावला जात आहे.

पती-पत्नीच्या वादामुळे चार मुलांचा बळी

पत्नी नांदायला येत नाही म्हणून चार निरागस जीवांचा बळी गेला ही बाब अत्यंत हृदय पिळवून टाकणारी आहे. छोट्याशा वादामुळे एका कुटुंबाचे अस्तित्व संपुष्टात आले असून यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पुढील तपास राहाता पोलीस करत आहेत.

FAQ

कोहाळे शिवारात काय घटना घडली?

कोहाळे शिवारात एका बापाने कौटुंबिक वादातून आपल्या चार चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

ही घटना कधी आणि कुठे घडली?

ही घटना 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोहाळे शिवारात घडली.

या घटनेचे कारण काय होते?

प्राथमिक माहितीनुसार, अरुण यांची पत्नी आठ दिवसांपूर्वी वादामुळे माहेरी गेली होती आणि ती नांदायला येत नसल्याने अरुण यांनी नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतला.





Source link