Nagpur: आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शेतीत योग्य वापर केल्याने काय करिश्मा होऊ शकतो, हे अमरावती जिल्ह्यातील खरपी गावातील संत्रा उत्पादक शेतकरी विजय बिजवे यांनी दाखवून दिलं आहे. दोन वर्षांपूर्वी आर्थिक नुकसान आणि निराशेमुळे संत्रा बाग तोडण्याचा निर्णय घेतलेल्या अमरावती जिल्ह्यातील विजय बिजवे या शेतकऱ्याने त्यांच्या मुलाच्या आग्रहावरून शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला आणि बागेत नवा बहर आला. पूर्वी केवळ 4–5 लाख रुपयांचे उत्पन्न देणारी संत्रा बाग आता तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचे उत्पादन देईल, असा विश्वास बिजवे यांनी व्यक्त केला आहे.

परतवाडा तालुक्यातील खरपी गावात विजय बिजवे यांची 8 एकरांची संत्रा बाग आहे. 10 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने बागायत करत असताना त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नव्हतं. मात्र B.Sc. Agriculture करणाऱ्या मुलाने AI वापरण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर शेतीत क्रांती झाली.

 नेमकं केलं काय या शेतकऱ्यानं?

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातील खरपी गावात विजय बिजवे यांची 8 एकरांची संत्रा बाग आहे. मागील 10 वर्षांपासून ते पारंपरिक पद्धतीने बागायत करत होते. मात्र, खर्च आणि उत्पन्नाचं गणित जमत नव्हतं. त्यामुळे त्यांनी बाग तोडण्याचा विचार केला होता. मात्र B.Sc. Agriculture करणाऱ्या मुलाच्या आग्रहामुळे त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून AI तंत्रज्ञानाचा अवलंब केला.  AI वापरण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम शेतीचं गुगल मॅपिंग केलं आणि पुण्यातील “Map My Crop” कंपनीच्या मदतीने काही सेन्सर बसवले. या सेन्सरमधून पाण्याची उपलब्धता, मातीचा ओलावा, तापमान आणि आवश्यक पोषकतत्त्वांची माहिती मिळू लागली. त्यानुसार त्यांनी झाडांना आवश्यक तेवढंच पाणी व औषधं वापरायला सुरुवात केली. परिणामी खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं. सध्या बिजवे यांच्या प्रत्येक झाडावर 800 ते 1200 संत्री लागलेली आहेत. AI तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी त्यांचा खर्च सुमारे 5.5 लाख रुपये आणि उत्पन्न 5 ते 6 लाख रुपये होतं. आता त्यांचा खर्च 4 लाखांपर्यंत आला असून उत्पन्न 25 ते 30 लाख रुपये होण्याची शक्यता आहे.

AI तंत्रज्ञान वापरणं थोड्या प्रशिक्षणानेही शक्य

बिजवे यांच्या म्हणण्यानुसार, AI तंत्रज्ञान वापरणं कोणत्याही शेतकऱ्यासाठी कठीण नाही. थोडं प्रशिक्षण घेतल्यास अल्पशिक्षित शेतकरीही याचा प्रभावी वापर करू शकतो. त्याशिवाय, त्यांनी रासायनिक फवारणी न करता गूळ, साखर आणि दूध यांच्या मिश्रणाची फवारणी केली, त्यामुळे मधमाशांचा वावर वाढला आणि परागसिंचन अधिक प्रभावी झालं. परिणामी फळांची वाढ आणि गुणवत्ताही सुधारली. जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांच्यानुसार, AI तंत्रज्ञानामुळे शेतीतील सर्वेक्षण, सिंचन आणि खत व्यवस्थापन अचूकपणे करता येतं. त्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ शक्य आहे. मात्र, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्केटिंगची सुविधा मिळावी यासाठी अमरावतीत प्रक्रिया प्रकल्प आणि मोठ्या बाजारपेठांशी थेट संपर्काची गरज आहे.

हेही वाचा

माझ्या धन्याच्या खांद्यावरचं जू उतरलं, माऊलीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, लातूरच्या 75 वर्षीय शेतकऱ्याला अशी मिळाली बैलजोडी

आणखी वाचा



Source link