Akola News अकोला : कापसाचे बियाणं बाजारात मिळत नसल्यानं शेतकरी (Farmers) चांगलेच आक्रमक होत आहे. एकीकडे कापसाच्या बियाण्यामूळे शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत. मात्र, याचवेळी अकोल्यात (Akola News) बी-बियाणांचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार समोर येतोय. अकोल्यात जादा दरानं बियाणे विक्री करणाऱ्या एका कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई केलीय. प्रति बियाणे पॅकेटामागे 1400 रुपये जादा दरानं ही विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या अडसूळ येथील मेसर्स अश्विनी ऍग्रो एजन्सी इथल्या केंद्रावर हा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर अव्वाच्या सव्वा दराने बियाणांची विक्री
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोप्रायटर रामराव रामचंद्र पोहरे या बियाणे विक्री केंद्रातून मेसर्स अजित सीड्स उत्पादित (अजित-155, बीजी 2) या कापूस बियाण्याची जादा दराने विक्री होत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार मोहीम अधिकारी महेंद्रकुमार सालखे आणि कृषी अधिकारी भरत चव्हाण यांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून सदर बियाणे विक्री केंद्रावर छापा टाकला. मेसर्स अजित सीड्स उत्पादित संकलीत कापूस बियाणे वाण (अजित -155, बीजी 2) प्रति पाकीट 1400 रुपये याप्रमाणे म्हणजच जादा दराने विक्री होत असल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
कृषी अधिकारी भरत चव्हाण यांनी मेसर्स आश्वनी ऍग्रो एजन्सीचे प्रोप्रायटर रामराव पोहरे यांच्या विरोधात बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, कापुस बियाणे किंमत (नियंत्रण) आदेश-2015, महाराष्ट्र कापुस बियाणे कायदा-2009, महाराष्ट्र कापुस बियाणे नियम-2010, इत्यादी कलमान्वयेनूसार तेल्हारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांकडून यापूर्वीच झाला होता आरोप
काल बियाणं मिळत नसल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. परिणामी, वैतागून त्यांनी रास्ता रोका आंदोलन केलं होतं. यात अनेक गावातील शेतकऱ्यांनी हा रस्त्यावर चक्का जाम केला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली अन् आंदोलन मागे घेतले. जिल्ह्यात बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण करण्यात आला असून काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून झाला होता. सद्यस्थित शेतकऱ्यांना सकाळपासून रांगेत बसावं लागत आहे. कूपन मिळाल्यानंतर दुपारी भर उन्हात रांगेत उभे रहावे लागते. मात्र, त्यानंतरही पुरेसे बियाणे मिळत नाही, केवळ दोन किंवा तीन बियाण्याचे पॅकेट हातात मिळतात. असा आरोपही शेतकऱ्यांनी केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..