मुंबई: भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी बुधवारी महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळाला महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या यादीबाबत उत्सुकता लागून राहिली होती. अखेर भाजपने यामध्ये आघाडी घेत आपल्या 20 उमेदवारांची नावे (BJP Candidate list) जाहीर केली आहेत. यामध्ये अकोल्यातून भाजपने अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 मध्ये अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे (Sanjay Dhotre) निवडून आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संजय धोत्रे यांची प्रकृती खालावली आहे. अंथरुणाला खिळून असल्याने ते बराच काळ सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे अकोला दौऱ्यावर आले होते. तेव्हाही खासदार संजय धोत्रे हे अकोल्यातील भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे भाजप नेतृ्त्त्वाने संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना अकोल्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. 

अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता अकोल्यात प्रकाश आंबडेकर विरुद्ध अनुप धोत्रे अशी हायव्होल्टेज लढत रंगणार आहे.  अकोल्यामध्ये अकोट, बालापूर, अकोला पश्चिमस, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे आता याठिकाणी कोण बाजी मारणार, हे आता पाहावे लागेल. सध्या प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी करत आहे. या चर्चेअंती वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र आल्यास अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी मोठे बळ मिळणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना संजय धोत्रे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर 2014 मध्ये प्रकाश आंबेडकर अकोल्यातून तिसऱ्या स्थानावर होते. अकोला लोकसभा मतदारसंघ हा गेल्या 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. केवळ 1999 मध्ये प्रकाश आंबेडकर भारिप बहुजन महासंघाच्या तिकीटावर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर त्याची पुनरावृत्ती करणार का, हे आता पाहावे लागेल. 

कोण आहेत अनुप धोत्रे?

भाजपचे अकोला लोकसभा प्रमुख असलेल्या अनुप धोत्रे यांना वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी खासदारकीची निवडणूक लढवण्याची संधी चालून आली आहे. पुण्याच्या सिंबायोसिस महाविद्यालयातून अनुप धोत्रे यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांचे वडील संजय धोत्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून अकोला लोकसभा मतदारसंघावर एकहाती वर्चस्व राखून आहेत. अनुप धोत्रे यांच्याकडे आपल्या वडिलांप्रमाणेच संघटनकौशल्य आहे. त्यामुळे अकोल्यातील भाजप कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. मात्र, या सर्वानंतरही त्यांची सर्व मदार ही त्यांचे वडील संजय धोत्रे यांच्या राजकी पुण्याईवर अवलंबून आहे. अनुप धोत्रे यांचा अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग समूह आहे. त्यात अनुप इंजिनीअरिंग वर्क्स, सोनल इंजिनीअरिंग वर्क्स, नकुल इंडस्ट्रीज, स्प्रिंकलर सेट, एचडीपीई पाईप्स उत्पादन, रेपोल प्लास्टिकसाठी, थर्मल पॉवर प्लांटसाठी जॉब वर्क, अन्न प्रक्रिया युनिट, बांधकाम आणि शहरी भू-विकास आदींचा त्यात समावेश आहे.

भाजपने महाराष्ट्रातील 4 उमेदवारांचं तिकीट कापलं

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या यादीत 4 बड्या खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीडमधून प्रीतम मुंडे, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक आणि जळगावमधून उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी बीडमध्ये पंकजा मुंडे, उत्तर मुंबईतून पियूष गोयल, ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा आणि जळगावमधून स्मिता पाटील यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.

आणखी वाचा

भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

अधिक पाहा..



Source link