केवळ मौजमस्तीसाठी चोरल्या चक्क शोरूमधून आलीशान गाड्या; चार अल्पवयीन मुलांसह एक जण ताब्यात

केवळ मौजमस्तीसाठी चोरल्या चक्क शोरूमधून आलीशान गाड्या; चार अल्पवयीन मुलांसह एक जण ताब्यात


Akola News अकोला : हल्लीचा काळ हा सोशल मिडियाचा काळ आहे. या सोशल मीडियामुळे जग जवळ आलं असलं तरी, त्यांचे अनेक दुष्परिणाम देखील समोर येत असतात. अशातच सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी अकोल्यातल्या (Akola News) काही शाळकरी मित्रांनी एक धाडसी पाऊल उचलले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वसामान्यांसह पोलिसांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आलंय. सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासोबतच फक्त मौज-मजेसाठी 4 अल्पवयीन मुलांसह एका तरुणाने चोरीचा (Crime) मार्ग निवडलाय. या पाच जणांनी थेट अकोल्यातल्या एमआयडीसी भागातील महिंद्रा शोरुमवरच डल्ला मारलाय. तर पुढं स्टॉक यार्डमधून चौघांनी महागड्या 3 लक्झरीएस कार चोरल्या. ज्याची किंमत प्रत्येकी 26 लाखापेक्षा अधिक आहे. मात्र हे प्रकरण पोलिसांनी (Akola Police) उघडकीस आणताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.  

तब्बल 70 लाखांहुन अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोशल मीडियावर रिल्स बनवून झटपट प्रसिद्ध होण्यासाठी आणि केवळ मौज-मस्तीसाठी 4 अल्पवयीन मुलांनी वेगळाच फंडा अवलंबलाय. पण हा फंडा आता त्यांच्या चांगलाच अंगलट आलाय. महार्गावर व्हिडिओ शूट करत 120 पेक्षा जास्त वेगानं वाहन चालवत असताना त्याचं हे बिंग फुटलं. दरम्यान, सद्यास्थित एमआयडीसी पोलिसांनी नवनवीन वाहनचोरी करून मजा करण्याऱ्या एका तरुणासह 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय.  मिर्झा उबेद बेदमिर्जा सईद बेग असं कार चोरणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत तब्बल 70 लाखांहुन अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

सोशल मिडियावर हवाबाजी करण्याचा नाद भोवला    

पोलिसांनी पुढे केलेल्या तपासात अशी माहिती मिळाली आहे की, वाहने चोरणारे सर्व अल्पवयीन मुले चांगल्या कुटुंबातील आणि ख्यातनाम शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, इतर मित्रांमध्ये वर्चस्व, सोशल मीडिया तसेच इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यासाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मात्र, शोरूमचे जनरल मॅनेजर सागर कड यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आलंय. सुरुवातीला एक गाडी आणि त्या पाठोपाठ 2 गाड्या या पाच मित्रांनी चोरल्या आहेत. ज्याची किंमत 70 लाखांहुन अधिक असल्याची माहिती पुढे आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

कुठे शेतातल्या साहित्याची नासधूस, तर कुठे उभ्या पिकाला लावली आग; शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट

कुठे शेतातल्या साहित्याची नासधूस, तर कुठे उभ्या पिकाला लावली आग; शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट


Akola News अकोला : सततच्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आधीच मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशातच अकोला जिल्ह्यात (Akola News) काही अज्ञातांकडून शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घालणारी बातमी समोर आली आहे. यात काही अज्ञातांनी शेतात ठेवलेल्या साहित्याची नासधूस करत मोठे नुकसान केले आहे. तर एक ठिकाणी शेतात कापणी करुन ठेवलेल्या ज्वारीच्या पीकाला आग लावल्याची घटना घडली आहे. मात्र, असे प्रकार करण्यामागील नेमकं कोण आणि त्याचा उद्देश नेमका काय, असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे. तर, दुसरीकडे या प्रकरणामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे बघायला मिळत आहे.  

कापणी करुन ठेवलेल्या ज्वारीच्या पीकाला लावली आग         

अकोला जिल्ह्यातील पणज येथे कापणी करुन ठेवलेल्या ज्वारीच्या पीकाला आग लावण्यात आल्याची घटना घडलीय. या आगीत शेतकऱ्याचं ज्वारी पिक पूर्णपणे जळून ख़ाक झालंय. अकोट तालुक्यातील पणजच्या नर्सिंगपूर शेत शिवारात काल सायंकाळच्या सुमारास ही आग लागलीय. अल्पभूधारक शेतकरी रवींद्र नवले आणि दिलीप नवले यांचे हे शेत आहे. शेतात कापणी केलेल्या ज्वारीच्या पीकाच्या गंजिला अज्ञात व्यक्तीनं आग लावली आहे.

या आगीत संपूर्ण पीक जळाले आहे. हवेचा वेग जास्त प्रमाणात असल्याने कापणी करुन ठेवलेलं ज्वारीचं पीक कणसासहीत जळाल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे. यात 1 ते दीड लाखांपर्यत ज्वारी आणि कडबा आगीमध्ये जाळाला असल्याचा अंदाज आहे. या नुकसानीचा संबंधीत विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नवले यांनी केली आहे. मात्र हे कृत्य कोणी केलं आणि ते करण्यामागे नेमकं कारण काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.   

दहा शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्याची तोडफोड

असाच एक संतापजनक प्रकार अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातील कोठा शेतशिवारात घडला आहे. यात शेतकऱ्याच्या शेतमालासह शेती उपयोगी साहित्यांना काही अज्ञातांनी आग लावलीये, या आगीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. कोठा शेतशिवार हा बागायाती परिसर असल्याने बारमाही इथे सिंचन राहते. त्यामुळ शेतातच पाईप, स्प्रींकलर आणि इतर साहित्य कायम असतं. मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तीनं तब्बल दहा शेतकऱ्यांच्या शेतातील पाईप, स्प्रींकलर, स्टार्टरची तोडफोड केलीय.

गोदामात ठेवलेला कापूसही पेटवला 

यात 290 पाईप कोयत्यानं फोडल्याचे दिसून आले. तर वैभव अहेरकर यांच्या शेतातील गोदामात ठेवलेला कापूस सुध्दा पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर काही पिकांना देखील आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू केला आहे. तर या प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

संकटात सापडलेल्या पिकांना शेतात पाणी देण्यासाठी गेला; मात्र काळाने शिक्षक शेतकऱ्याचा घात केला

संकटात सापडलेल्या पिकांना शेतात पाणी देण्यासाठी गेला; मात्र काळाने शिक्षक शेतकऱ्याचा घात केला


Akola News अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यातील पातुर तालुक्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि जोराच्या वाऱ्यासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. तर उरलेल्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू आहे. त्यात अकोल्यात तापमानाच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठत त्यात आणखी वाढ होताना दिसत आहे. उष्णतेचा वाढता पारा लक्षात घेता अस्मानी संकटातून वाचलेल्या शेतातील पीकांना पाण्याची अत्यंत गरज आहे.

अशातच आपल्या शेतातल्या भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या एका 52 वर्षीय शिक्षकाला जोराचा शॉक लागलाय. या घटनेत त्यांचा जागीचं मृत्यु झाला आहे. प्रल्हाद पुंडलिक ठाकरे असं या मरण पावलेल्या शिक्षकाचं नाव आहे. आज सकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चोंढी शेतशिवरात ही घटना घडली आहे. या घटनेनं ठाकरे कुटुंबावर मोठं संकट ओढावलं आहे.

विजेचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू 

धक्कादायक बाब म्हणजे या परिसरातील शेतकरी आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून रात्रीच्या अंधारात जीवाची पर्वा न करता पाणी द्यायला जातात. अनेकदा ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. अकोल्यातल्या आजचा हा प्रकार असाच काहीसा म्हणता येईल. याप्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मृत प्रल्हाद ठाकरे हे मूळ जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सुट्टीवर होते. ठाकरे यांची आई ही महिला शेतकरी असून त्यांनी पातुर तालुक्यातील चोंढी शेतशिवारात असलेल्या एका एकरात भुईमूग पिकाची लागवड केली आहे. दर दोन दिवसांआड़ त्या भुईमूग पिकाला पाणी देण्यासाठी जात असतात. परंतु प्रल्हाद ठाकरे हे घरी असल्याने आई शेतात न पाठवता ते स्वत: शेतात गेले होते. दरम्यान, कॅनॉलद्वारे भुईमूग पिकाला पाणी देण्यासाठी प्रल्हाद हे विद्युत बोर्डाजवळ गेले आणि पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी विद्युत बोर्डची पाहणी करत असताना अचानक त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला अन् त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला. यात त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. अशी प्राथमिक माहिती चान्नी पोलीस स्टेशन पीएसआय कोहळे यांनी दिलीय. 

दरम्यान, ठाकरे कुटुंबातील प्रमुख कर्ता व्यक्ती प्रल्हाद गेल्याने अख्ख कुटुंबावर मोठं संकट उभं झालंय. कारण ठाकरे यांच्या घरातील प्रमुख व्यक्तीला गमावावे लागले आहे. आता प्रल्हाद यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असं कुटुंब आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

Akola News :  कूलरचा शॉक लागून सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; अकोला शहरातील घटना

Akola News : कूलरचा शॉक लागून सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; अकोला शहरातील घटना


Akola News अकोला : आपण कुलरमध्ये पाणी भरताय? अथवा कूलर सुरू असताना त्याला हात लावताय? तर सतर्कता बाळगा. कारण अकोल्यात (Akola) कुलरच्या (Cooler) विजेचा धक्का लागून एका 7 वर्षीय चिमुकलीला जिव गमवावा लागलाय. घरात लावलेल्या कूलरजवळ खेळत असताना, या कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. युक्ती अमोल गोगे असं या मरण पावलेल्या चिमुकलीचं नाव आहे. काल, रविवारच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी (Akola Police) आकस्मित मृत्यूची नोंद केलीय. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. 

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर   

अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांची 7 वर्षीय मुलगी युक्ती ही घरात खेळत असताना कूलरजवळ गेली. दरम्यान, कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. युक्तीचे आईवडील आणि कुटुंबीय घरातच होते. मात्र, त्यांच्या लक्षात येईपर्यंत युक्तीचा मृत्यू झाला होता. युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि  परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र गोगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. दरम्यान कूलरला असलेल्या बटनांची एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला होता. त्यातूनच ही दुर्घटना घडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

काही दिवसांपूर्वीचं कुलरमुळे पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू

काही दिवसांपूर्वीचं पाणी भरतांना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्यानं जोरदार विजेचा धक्का लागून पोलीस दलातील अंमलदार गणेश रामराव सोनोने (57, रा. अंबिका नगर, मलकापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अकोला पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता पुन्हा कूलरचा शॉक लागून मृत्यु झाल्याची अकोल्यातील ही दूसरी घटना आहे.

अकोल्यात उष्णतेचा पारा 44.4 सेल्सिअसवर

मागील दोन ते तीन दिवसात उष्णतेच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठले आहे. अशातच काल विदर्भातील अकोला (Akola) जिल्ह्याचे तापमान हे सर्वाधिक 44.4° सेल्सिअसवर गेल्याचे बघायला मिळाले आहे. या वर्षातील हे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले आहे. तर आज बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्याचे कमाल तापमान 40° सेल्सिअसवर नोंदविण्यात आले आहे. तर आगामी काही दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होणार असून विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशाराही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घरातच राहण्यास पसंती दिली आहे. असे असले तरी कूलरमध्ये पाणी भरत असताना अथवा कुलर सुरू असताना विद्युत प्रवाह आणि बाबी तपासून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अकोल्यात उष्णतेचा पारा 44.4° सेल्सिअसवर; अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

अकोल्यात उष्णतेचा पारा 44.4° सेल्सिअसवर; अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा


Vidarbha Weather Update : महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ (Temperature Rise) झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसात उष्णतेच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठले आहे. अशातच आज विदर्भातील अकोला (Akola) जिल्ह्याचे तापमान हे सर्वाधिक 44.4° सेल्सिअसवर गेल्याचे बघायला मिळाले आहे. या वर्षातील हे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले आहे. तर आज बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्याचे कमाल तापमान 40° सेल्सिअसवर नोंदविण्यात आले आहे. तर आगामी काही दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होणार असून विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) इशाराही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.  

अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा  

आज अकोला आणि चंद्रपूरमध्ये या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तर उर्वरित विदर्भातही उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. असे असले तरी पुढील चार दिवस विदर्भातील बहुतांश भागात अवकळी पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. उद्या 6 मे रोजी विदर्भातील यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर येथे विजांच्या कडकडाटासह वादळ, 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. सोबतच उद्या अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

त्यानंतर 7 मे रोजी देखील विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर येथे विजांच्या कडकडाटासह वादळ, 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर हीच स्थिती येत्या 8 मे रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. त्यानंतर मध्य विदर्भात पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

तलावातील चार ते पाच क्विंटल माशांचा दुर्दैवी मृत्यू

सध्याघडीला विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यातील उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठे तलाव आणि धरणांनीही तळ गाठायला सुरवात केली आहे. परिणामी, राज्यात पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. अशातच या वाढत्या उन्हाचा फटका मनुष्याप्रमाणेच वन्यजीवांनाही बसताना दिसत आहे. वाशिम शहरातील पदमपुराणात उल्लेख असलेल्या भगवान पदमेश्वर येथील पद्म तलावातील पाणी सुकल्याने चार ते पाच क्विंटल माशाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. गेल्या सात ते आठ दिवसापासून वाढलेले तापमानामुळे तलावातील पाणी आटल्याचे चित्र आहे.

या भागात पावसाचा यलो अलर्ट

सोमवारी विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 6 मे रोजी अकोलालातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात सोमवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

विनयभंग झालेल्या महिलेचा पोलिसांकडूनच  मानसिक छळ; सलग चार दिवस रात्री उशिरापर्यंत ठेवलं ताटकळत 

विनयभंग झालेल्या महिलेचा पोलिसांकडूनच मानसिक छळ; सलग चार दिवस रात्री उशिरापर्यंत ठेवलं ताटकळत 


Akola News : ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात, त्यांचं संरक्षण करणं हे त्यांच प्रथम कर्तव्य असतं. पण त्यांच्याकडूनच न्याय होत नसेल तर जावं तरी कुणाकडे? असा प्रश्न विचारण्याचे कारण ठरले आहे ते अकोला (Akola) शहरात उघडकीस आलेला एक खळबळजनक प्रकार. शहरातील एका बड्या डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलिसांनी (Akola Police) तब्बल चार दिवस तक्रार न घेता रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवलंय. या महिलेला दोन वर्षांची चिमुकली मुलगी आहे. पहिल्या दिवशी तर या महिलेला रात्री 2 वाजेपर्यंत ताटकळत पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं गेलं. इतकेचं नव्हे तर चार दिवस या प्रकरणात चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करण्यात आल्याचा आरोप (Crime) महिलेने केला आहे. 

यादरम्यान तक्रारकर्त्या महिलेलाच तिच्यावर कारवाई करण्याचा धमक्या पोलिसांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. या प्रकरणात संशयित आरोपी डॉक्टरच्या दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचाही आरोप तक्रारदार महिलेनं केला होता. हा प्रकार आहे अकोला जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतला. अखेर चार दिवसानंतर सिव्हील लाईन पोलिसांना तक्रारदार महिला आणि माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा दाखल करावा लागला आहे. मात्र, डॉक्टरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हे प्रकरण उघडकीस येताच शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.   

महिलेसोबत नेमकं काय झालं? 

अकोला शहरतल्या जठारपेठ भागात चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनीक हा डॉ. प्रविण अग्रवाल यांचा दवाखाना आहे. त्वचारोगावरील उपचारांसाठी ते प्रसिद्ध आहेत. मात्र, शहरातील एक घटस्फोटीत महिला त्यांच्याकडे उपचारासाठी गेल्यावर डॉक्टरांनी तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. डॉक्टरांकडून याआधी तीनदा असा प्रकार झाल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र, सामाजिक भितीमुळे तिने याची वाच्यता कुठे केली नाही. मात्र, चौथ्यांदाही या डॉक्टरने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्यावर तिने यासंदर्भात पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. डॉ. प्रविण अग्रवाल विरोधात तक्रार देण्यासाठी संबंधित महिला अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र महिलेला तिच्या दोन वर्षाच्या मुलीसह सायंकाळपासून ते रात्री 2 वाजेपर्यत ताटकळत ठाण्यात बसवून ठेवलं गेलं.

यासोबतच गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. हनुमान जयंतीच्या अनुषंगानं सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या दिवशीचा हा प्रकार होता. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. मात्र तरीही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. पुढे आपल्यावरचं कारवाई करणार असल्याच्या धमक्या पोलिसांकडून मिळाल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. शेवटी आपली मुलगी रडत असल्याने खाली हात पोलीस ठाण्यातून घरी परतावं लागल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला आहे.

महिलेनं पोलीस तक्रारीत सांगितली आपबिती 

30 एप्रिल 2024 रोजी रात्री 8 वाजता तक्रारदार महिला ही चेहऱ्यावरील आजार दाखवन्यासाठी जठारपेठ मधल्या प्रसिद्ध असलेल्या ‘चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनीक’ या डॉ. प्रविण अग्रवाल यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. यादरम्यान अग्रवाल यांनी तिच्यासोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग केला. याआधी त्याने या महिलेसोबत तीनदा असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर दवाखान्यात मोठा गोंधळ उडाला. महिलेचा लहान भाऊ आणि डॉक्टरमध्ये शाब्दिक वादही झाला. अखेर महिलेनं ठाणं गाठलं.

मात्र, पहिल्या दिवशी तब्बल रात्री दोन वाजेपर्यंत तिला पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आल्याच. आरोप या महिलेनं केला आहे. पुढे दोन दिवस तिला रात्री 11 आणि 9.30 वाजेपर्यंत पोलिसांनी तिला ठाण्यात बसवून ठेवलं. तिच्या तक्रारीवर तब्बल चार दिवस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता असा आरोप तक्रारदार महीलेनं केला आहे. अखेर या महिलेच्या मूळ तक्रारीवर 4 दिवसांनंतर 3 मेला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला 354 (A) नूसार आरोपी डॉक्टरविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला. 

सिव्हील लाईन पोलिसांच्या बेजबाबदार वर्तनावर काय कारवाई होणार?

या संपूर्ण प्रकरणात सिव्हील लाईन पोलिसांची भूमिका अत्यंत बेजबाबदार आणि संशयास्पद आहे. आरोपी डॉक्टरला वाचविण्यासाठी पोलिसांच्या धडपडीचा ‘अर्थ’ काय?, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. यात पोलिसांची उत्तरे अत्यंत बेजबाबदारपणाची होती. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव हे माध्यमांशी बोलतांना म्हटले की, सदर महिलेच्या तक्रारीनंतर दवाखान्यातील CCTV फुटेज तपासले गेले.

त्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिस अधिक्षकांकडे महिला पोलिस अधिकाऱ्याची मागणी केली आहे. लवकरच गुन्हा दाखल केला जाईल. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, लवकर गुन्हा दाखल होणार. पण विशेष म्हणजे एका महिलेला रात्री 2 वाजेपर्यत ताटकळत पोलिस ठाण्यात बसवून ठेवल्या जातंय हे योग्य आहे का? असा सवाल पत्रकारांनी जाधव यांना विचारला असता, ते म्हटले महिलेला रात्री 7 वाजेनंतर अटक करता येत नाही. परंतु तक्रारदार महिला कितीही वेळ ठाण्यात थांबू शकते असे जाधव यांचे म्हणणे हे गुन्हा दाखल होण्यापूर्वी होते. 

झालेला प्रकार दुर्दैवी : डॉ. आशा मिरगे

या प्रकारावर ‘एबीपी माझा’शी बोलतांना राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी चिंता व्यक्त केली आहे. अकोला पोलिसांचं हे बेजबाबदार वागणं हे चिंताजनक आहे. एका लहान मुलाची आई असलेल्या पिडीत महिलेला रात्री उशिरापर्यंत बसवणं हे कायद्याचं उल्लंघन आहे. राज्य महिला आयोग आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी डॉ. मिरगे यांनी केली आहे. 

‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात, त्यांचं संरक्षण करणं हे त्यांच कर्तव्य असतं. पण त्यांच्याकडून न्याय होत नसेल तर जावं तरी कुणाकडे?. या प्रकरणात आरोपी डॉक्टरवर ‘मेहेरनजर दाखविणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होते का? किंवा किमान त्यांची कानउघडणी तरी जिल्हा पोलीस अधीक्षक करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp