संतापजनक! पोटफुगीवर उपचार म्हणून दहा दिवसाच्या बाळाला दिले गरम विळ्याने तब्बल 39 चटके

संतापजनक! पोटफुगीवर उपचार म्हणून दहा दिवसाच्या बाळाला दिले गरम विळ्याने तब्बल 39 चटके


Amravati Crime News : अमरावतीच्या मेळघाटातील दहेंद्री गावातून अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेत पोटफुगीवर (Bloating) दहा दिवसाच्या बाळाला चक्क गरम विळ्याने तब्बल 39 चटके दिल्याचा अघोरी प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे मेळघाटात अजूनही ‘डंबा’ वर अघोरी उपचार पध्दतीचा अवलंब केला जात असल्याचे समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली असून यात चटके देणाऱ्या वृद्धमहिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर दहा दिवसांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

बाळाची प्रकृती स्थिर, चार महिन्यापूर्वीही अशीच एक घटना 

पुढे आलेल्या माहितीनुसार, बाळावर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. डब्बा दिल्याने पोटफुगी कमी होते ही अंधश्रद्धा आजही  मेळघाटात सरख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात कायम आहे. चार महिन्यापूर्वीही एका बावीस दिवसाच्या बाळाला अशाच प्रकारे पोटावर चटके दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच आता ही घटना समोर आल्याने सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परिणामी या भागात जनजागृती करून असल्या अघोरी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटनांना आळा घालण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गडचिरोलीत 7 बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त; सव्वा लाखांचा दंड

गडचिरोलीतील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या सात स्कूल व्हॅनवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 7 वाहनांवर 1 लाख 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. शहरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर स्कूल व्हॅन संदर्भात मिळालेल्या तक्रारींच्या आधारे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तपासणी मोहीम राबवली. यामध्ये अनेक व्हॅनकडे आवश्यक परवाने आणि कागदपत्रे नसल्याचे आढळले. काही वाहनांमध्ये अनुमतीपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक केली जात होती, तर काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर वाहनाच्या टपावर ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले.

भंडाऱ्याच्या मोहाडीत दुकान फोडणारे सीसीटीव्हीत कैद

भंडाऱ्याच्या मोहाडी येथील दोन दुकानं फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मोहाडीतील सिराज मोबाईल शॉपी आणि मोटघरे हार्डवेअरमध्ये ही चोरी करण्यात आली. सिराज मोबाईल शॉपीचं शटर तोडून दुकानात प्रवेश करून मोबाईल चोरीत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. मोहाडी पोलीस या चोरट्यांचा आता शोध घेत आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा



Source link

भूकमारी… राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक; मुंबईत सर्वाधिक संख्या, पुण्यात किती?

भूकमारी… राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक; मुंबईत सर्वाधिक संख्या, पुण्यात किती?


मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट (Melghat) हा प्रदेश ओळखला जात. मात्र, नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार कुपोषित बालकांच्या संख्येत महानगरांमध्येच वाढ झाल्याचं चित्र आहे. राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तब्बल 1 लाख 82 हजार 443 बालकं कुपोषित असल्याची सरकारची आकडेवारी असून सर्वाधिक कुपोषित बालक मुंबई (Mumbai) उपनगरात असल्याचे धक्कादायक वास्तव देखील या आकडेवारीतून समोर आलं आहे. राज्यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या 1 लाख 51 हजार 643 असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या 30,800 एवढी आहे. पुण्यातही कुपोषित बालकांची संख्या चिंताजनक असल्याचं चित्र आहे. 

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये कुपोषणाच्या आकडेवारीत वाढ झाली असून मुंबई उपनगरमध्ये 16 हजार 344 कुपोषित बालके आहेत. त्यात, मध्यम कुपोषित बालकांची संख्या 13,457 तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 2887 एवढी आहे. राज्यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या 1 लाख 51 हजार 643 असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या 30,800 एवढी आहे. मुंबई उपनगराच्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यामध्ये कुपोषणाची  संख्या वाढली. नाशिक मध्ये 9 हजार 852 कुपोषित बालकांची संख्या असून यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या 8,944 तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 1852 एवढी आहे. 

पुण्यातील मध्यम कुपोषित बालकांची संख्या 7,410

ठाणे जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या 7,366 आणि तीव्र कुपोषित बालकांची संख्या 844 एवढी आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील कुपोषित बालकांची पुण्यातील संख्या कमी आहे. पुण्यात मध्यम कुपोषित बालके 7,410 तर तीव्र कुपोषित बालके 1666 एवढी आहेत. 

सरकारच्या योजनांवर होणारा खर्च विचार करण्यासारखा

धुळे जिल्हा मध्यम कुपोषित बालके 6,377 आणि तीव्र कुपोषित बालके 1741 आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्हा मध्यम कुपोषित बालके 6487 तर तीव्र कुपोषित बालके 1439 आहेत. नागपूर मध्यम कुपोषित बालके 6,715 तर तीव्र कुपोषित बालके 1373 एवढी आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजना आणि होणारा खर्च यावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचंही आकडेवारीतून समोर येत आहे.

हेही वाचा

 विठुरायाचं दर्शन घेतलं, पंढरपूरवरुन परतताना बुलढाण्याच्या वारकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, झाडाला दोर लटकवून….

आणखी वाचा



Source link

9 वर्षांच्या चिमुरड्या मुलाचा सावत्र बापाने गळा आवळला; मृतदेह जंगलात फेकला, फक्त 300 रुपयांच्या

9 वर्षांच्या चिमुरड्या मुलाचा सावत्र बापाने गळा आवळला; मृतदेह जंगलात फेकला, फक्त 300 रुपयांच्या


अकोला : सावत्र बाप आणि त्याच्या मित्रानं मिळून एका निरागस मुलाला आयुष्याच्या मध्यावरच गाठलं… कारण फक्त एवढंच, की तो पुढे जाऊन संपत्तीत वाटा मागेल. अकोला जिल्ह्यातील (Akola Crime News) अकोट येथे ही अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. दर्शन वैभव पळसकर (वय 9) या निष्पाप मुलाचा सावत्र वडील आकाश साहेबराव कान्हेरकर याने गौरव वसंतराव गायगोले या मित्राच्या मदतीनं गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह अकोलाअमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून दिला.(Akola Crime News) 

नेमकं काय घडलं?

2 जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता दर्शन हा कुणालाही न सांगता घराबाहेर पडल्याची माहिती त्याच्या आईने पोलिसांना दिली. अकोट शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल झाली. तपासाच्या सुरुवातीला पोलिसांना सावत्र वडिलांवर संशय गेला, कारण नुकत्याच बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दर्शन आपल्या वडिलांसोबत जाताना दिसून आला होता.यातून तपासाची दिशा स्पष्ट होत गेली आणि चौकशीत आकाशने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या मित्रासोबत दर्शनला दुचाकीवर जंगलात नेलं आणि गळा आवळून हत्या केली.

जंगलात 12 तास शोधमोहीम 

गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर अकोट पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. 60 पोलीस कर्मचारी आणि 7 अधिकाऱ्यांनी 12 तास जंगल परिसरात शोध घेत मृतदेह शोधून काढला. सध्या मृतदेह अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

फक्त 300 रुपयांसाठी गौरव बनला खुनात साथीदार

या अमानवी हत्येतील धक्कादायक बाब म्हणजे, आकाशने आपल्या मित्राला फक्त 300 रुपयांच्या मोबदल्यात या गुन्ह्यात सहभागी करून घेतलं. गौरव गायगोले नावाच्या या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

लैंगिक अत्याचाराचा संशय

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दर्शनवर लैंगिक अत्याचार झाला असण्याची शक्यता आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत निश्चितता येणार आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

सावत्र नात्यांची दाहकता

ही घटना केवळ एका मुलाच्या निर्घृण हत्येपुरती मर्यादित नाही, तर सावत्र नात्यांमधील अविश्वास, संपत्तीची लालसा आणि माणुसकी गमावलेलं मनोवृत्त यांचं दु:खद दर्शन घडवणारी आहे. आयपीएस अधिकारी  आणि अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू असून दोघा आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निष्पाप दर्शनसाठी न्यायाची मागणी

अकोटसह संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. न्यायासाठी लढणाऱ्या आईच्या डोळ्यातील अश्रू आणि 9 वर्षांच्या त्या निष्पाप चेहऱ्याचं स्मरण प्रत्येक संवेदनशील मनाला चटका लावून जातं‌‌ आहे.

आणखी वाचा



Source link

85000 कोटीचा महामार्ग नकोच, धान्य देणारी काळी आई हीच खरं शक्तीपीठ, कडूंचा फडणवीसांवर ‘प्रहार’

85000 कोटीचा महामार्ग नकोच, धान्य देणारी काळी आई हीच खरं शक्तीपीठ, कडूंचा फडणवीसांवर ‘प्रहार’


Bacchu Kadu :  सध्या राज्यात शक्तीपाठ महामार्गावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. विरोधकांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान करणारा हा महामार्ग नको अशी भूमिका शेतकऱ्यांसह विरोधकांनी घेतली आहे. दरम्यान, याच शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्यावरुन प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu ) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांना टोला लगावलाय. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो देखील शेअर केलाय. 

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

आधी जागरण खऱ्या शक्तिपीठाचं! धनधान्य देणारी काळी आई ही खरं शक्तिपीठ असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याला न्यायाचा महामार्ग खुला करुन देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य असल्याचे कडू म्हणाले.  85000 हजार कोटीचा महामार्ग आम्ही मागितला नाही तो आमच्यावर थोपवू नये असेही कडू म्हणाले. कर्जमाफी कडे सोयीस्कर दुर्लक्ष करत काही अडाण्यांचे खिसे भरण्यावर भर देण्याची आवश्यकता नसल्याचे कडू म्हणाले. आधी भूमीरुपी खऱ्या शक्तिपीठाचं रक्षण महत्वाचं आहे. म्हणूनच शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना आमचा पाठिंबा असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. 

Shaktipeeth Expressway : कसा असेल शक्तिपीठ महामार्ग? 

विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे.  राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीडलातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा  खर्च येणार आहे.

कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार?

कोल्हापूर – अंबाबाई, तुळजापूर – तुळजाभवानी. नांदेड – माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ,  हिंगोली जिल्ह्यातील  औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.  

समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण झाला. आता शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करणार असून त्यामुळे मराठवाड्याचे आर्थिक चित्र बदलेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग तीन शक्तिपीठांसह अनेक मोठ्या धार्मिक ठिकाणांना जोडणारा असल्याचे फडणवीस म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

Shaktipeeth Expressway : समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण, आता शक्तीपीठ महामार्गही करु, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार!

आणखी वाचा





Source link

अकोल्यात ‘गे डेटिंग अॅप’चा भयावह सापळा, बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार

अकोल्यात ‘गे डेटिंग अॅप’चा भयावह सापळा, बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार


अकोला : ‘गे डेटिंग’ अ‍ॅपवरुन ओळख, मैत्री आणि त्यानंतर फसवणुकीचा भयावह सापळा… अकोल्यात घडलेली ही घटना समलिंगी व्यक्तींविरोधातील फसवणुकीचे नवीन आणि धोकादायक रूप उघड करतेय. बँकेत कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला डेटिंग अ‍ॅपवरून फसवून लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून ब्लॅकमेल करण्यात आले आणि त्याच्याकडून तब्बल 80 हजार रुपये उकळण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून, उर्वरित दोन आरोपी फरार आहेत.

Akola Gay Dating App News : नेमकं काय घडलं? 

अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याने समलैंगिक डेटिंग अ‍ॅपवर एका अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधला. बोलणं वाढलं आणि मैत्री झाली. त्यानंतर 14 जून रोजी प्रत्यक्ष भेट ठरवण्यात आली. हिंगणा फाट्याजवळ आरोपी मनीष नाईक हा त्या बँक अधिकाऱ्याला भेटला. तिथून दोघं मिळून कारने शहरातील नदीकिनाऱ्यावर गेले, जिथे दोघांत समलैंगिक संबंध झाले.

परंतु, या घटनेनंतर कथानकाने अचानक वळण घेतले. मनीष नाईकने त्याचे तीन साथीदार तिथे बोलावले. या चौघांनी मिळून बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात आले.

ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक लूट 

चित्रीकरण केलेल्या व्हिडीओच्या आधारे पीडित अधिकाऱ्याला धमकावून ब्लॅकमेल केलं गेलं. ‘हा व्हिडीओ व्हायरल करू’ अशी भीती दाखवत सुरुवातीला 30 हजार रुपये आणि नंतर टप्प्याटप्प्याने एकूण 79,300 रुपये आरोपींनी उकळले. पीडित अधिकाऱ्याने अखेर खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सविस्तर तक्रार दाखल केली.

पोलिसांची योजना आणि अटकेची कारवाई 

तपासादरम्यान पोलिसांकडे आरोपींचा केवळ मोबाईल क्रमांक होता. ठोस पुरावे नसल्यामुळे पोलिसांनी रणनीती आखत, पीडित व्यक्तीच्या मदतीने पुन्हा त्या व्यक्तींना भेटण्याची योजना आखली. त्या वेळी मनीष नाईक प्रत्यक्ष स्थळी आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या माहितीवरून मयूर बागडे यालाही अटक करण्यात आली.

इंजेक्शनद्वारे शारीरिक नियंत्रण?

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष नाईक याच्याकडे काही प्रकारचे उत्तेजक इंजेक्शन होते, जे तो समलैंगिक व्यक्तींना देत असे. या इंजेक्शनच्या प्रभावाने शारीरिक संबंध सहज साधले जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ही बाब अधिक चिंताजनक बनवते.

पोलीस तपासात फसवणुकीची आणखी प्रकरण येणार समोर? 

अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आणखी दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे. याशिवाय, अशाच पद्धतीने इतर कोणत्याही व्यक्तीची फसवणूक झाली आहे का, याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांचं आवाहन 

खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदार यांनी सांगितलं की, “या प्रकारात इतर अनेक पीडित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या समलैंगिक व्यक्तींनी कोणतीही भीती न बाळगता पुढे यावं, आणि पोलिसांना मदत करावी.”

डेटिंग अ‍ॅपचा गैरवापर 

ही घटना ‘गे डेटिंग अ‍ॅप’चा गैरवापर किती गंभीर स्वरूपात केला जाऊ शकतो, याचं ज्वलंत उदाहरण ठरते. समाजातील एका विशिष्ट गटावर आधारित अ‍ॅप्सचा उपयोग फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक अत्याचारासाठी होऊ लागल्यास, त्याचं रूप अत्यंत घातक ठरू शकते.

आणखी वाचा



Source link