अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर; सरकारचा
अकोला: अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराला काल 25 जूनला राज्य शासनाने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर केला आहे. मात्र यावरून अकोल्यात आता भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय वादाची लढाई सुरू झाली आहे. सरकारचा निर्णयानंतर दोन्ही पक्षांनी मंदिरात जात राजराजेश्वराची महाआरती केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष श्रेयासाठी समोरासमोर उभे ठाकले आहेत.
अकोल्यात देवाच्या मंदिरात श्रेय्याचा राजकीय घंटानाद सुरू झालाय आणि अकोल्यात भाजप आणि काँग्रेस राजकीय श्रेयासाठी समोरासमोर आले ते शहराचं ग्रामदैवत राजेश्वराच्या मंदिरात…याला निमित्त ठरलंय अकोल्याचा ग्रामदैवत असलेल्या राज राजेश्वर मंदिराला राज्य सरकारने दिलेल्या तीर्थस्थळाच्या ‘ब’ दर्जाचं…राज्याच्या नगर विकास विभागाने काल 25 जुनला हा आदेश जारी केलाय. अन् या आदेशानंतर अकोल्यात सुरू झालाय राजकीय श्रेयाचा आटापिटा…. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल तीस वर्षांनंतर अकोला पश्चिम मतदार संघात भाजपला पराभूत करत काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी झालेत. त्यांनी विधानसभेतील पहिल्याच भाषणात ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिराला तीर्थस्थळाचा ‘ब’ दर्जा देण्याची मागणी केली होतीय. आज सरकारच्या निर्णयानंतर त्यांनी मंदिरात जात राजेश्वराचं दर्शन घेतलंय. हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
राज्य शासनाकडून एखाद्या मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर त्याठिकाणी सरकारकडून मिळणाऱ्या प्रमुख सुविधा :
– विकास आराखड्यानुसार विशिष्ट निधी मंजूर केला जातो.
– राज्याच्या धार्मिक पर्यटन योजनांतून रस्ता, पाणी, वीज, स्वच्छता, सौरऊर्जा, डिजिटल सुविधा यासाठी अनुदान.
– मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण / सिमेंटकरण.
– भाविकांसाठी शौचालये, स्नानगृहे, विश्रांतीगृहे (धर्मशाळा).
– पार्किंगची सोय, सुरक्षा बंधोबस्त, CCTV यंत्रणा.
– मंदीर परिसराचा सौंदर्यीकरण, उद्यान व फुलबागांची निर्मिती.
– मंदिरातील जत्रा, यात्रा, कीर्तन, भजन, उरूस यांना शासकीय पाठबळ.
– पर्यटन महोत्सव अथवा तीर्थस्थळ उत्सव आयोजित करण्यासाठी निधी.
– तीर्थस्थळाचा समावेश पर्यटन माहिती पुस्तिका, संकेतस्थळे, मोबाईल अॅप्स मध्ये.
‘ब’ वर्ग म्हणजे काय?
‘ब’ वर्ग तीर्थस्थळ म्हणजे राज्यस्तरीय धार्मिक महत्त्व असलेले, भाविकांची मोठी गर्दी होणारे पण अजून ‘अ’ दर्जाच्या स्तरावर न गेलेले मंदिर. यांना विकासासाठी ‘अ’ इतकाच महत्त्वाचा दर्जा दिला जातो. या सुविधा स्थानिक देवस्थान ट्रस्ट, महापालिका/ग्रामपंचायत, आणि पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून अंमलात आणल्या जातात.
राजेश्वर मंदिरात भाजपने मंदिरात मोठा जल्लोष-
काल सरकारचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राजेश्वर मंदिरात भाजपने मंदिरात मोठा जल्लोष करीत महाआरती केलीय. नुकतेच 11 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात येऊन गेले होतेय. त्यावेळी भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी राजराजेश्वर मंदिराला 50 कोटींचा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होतीय. नंतर 22 जूलै 2024 ला त्यांनी मंदिराला तीर्थस्थळाचा ‘ब’ दर्जा देण्याची मागणी करणारे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलं होतंय. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचे श्रेय भाजपचंच असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत.
अकोल्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये सातत्याने चढाओढीचे राजकारण-
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर अकोल्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये सातत्याने चढाओढीचे राजकारण सुरू आहे. येऊ घातलेली महापालिका निवडणूक लक्षात घेऊन अकोल्यातील राजकारण पुढच्या काळात आणखी पैटणार असल्याचा ‘ट्रेलर’ सध्या यावरून पाहायला मिळतोय. मात्र श्रेयवादाच्या लढाईत गुंतलेली भाजप आणि काँग्रेस अकोलेकरांचं जगणं आणखी सुखकर व्हावं यासाठी एकत्र येतील का?, हाच खरा प्रश्न आहे.
आणखी वाचा