
अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादारचे कारनामे समोर; पोलिसांशी कनेक्शन, आमदारां
अकोला: अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादार याचे अनेक वादग्रस्त कारनामे ‘एबीपी माझा’च्या हाती लागले आहेत. एमडी ड्रग्स विक्री प्रकरणात अकोल्यातल्या खदान पोलिसांनी काल (बुधवारी,ता-16) दोघांना अटक केली. मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हादीक खान असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचं एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलं. ताब्यात घेण्यात आलेल्या एमडी ड्रग्सचं वजन 46 ग्रॅम 30 मिली ग्रॅम इतकं आहे. तिसरा आरोपी गब्बर जमादार हा अद्याप फरार आहे. दरम्यान, अकोल्यातल्या गौरक्षण रस्त्यावरील मातृभूमी प्रेस परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. (Akola Crime news)
आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता
अटकेतील मोहम्मद यासीन हा आरोपी ‘बीएएमएस’च्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने गब्बर जमादारचा पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचा स्पष्ट केलं आहे. गब्बरचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबतही फोटो असल्याचं समोर आलं आहे. (Akola Crime news)
गब्बर जमादारचे व्हिडिओ ‘माझा’च्या हाती
पोलीस मित्र म्हणून वावरणाऱ्या गब्बर जमादारचे अनेक कारनामे ‘एबीपी माझा’च्या हाती (Akola Crime news) लागलेले आहेत. एका मिरवणुकीत जमादार हा उरळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार गोपाल ढोले आणि कायंदे नावाच्या आणखी एका अधिकाऱ्याला नोटांची ओवाळणी घालतानांचा व्हिडिओ ‘माझा’च्या हाती आले आहेत. यासोबतच पोलिसांच्या पथसंचालनात तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत चालतांनाचाही व्हिडिओ समोर आला आहे. वाढदिवसाचा केक कापतांना गब्बरच्या कार्यकर्त्याच्या हाती तलवार असलेले फोटो समोर आलेले आहेत. गब्बरचे पंचगव्हाण परिसरात अनेक अवैध धंदे असल्याची सूत्रांंची माहिती आहे. पोलिसांचा अतिशय जवळचा मित्र असलेल्या गब्बरच्या धंद्यांकडे पोलिसांचं दुर्लक्ष कसं?, दुर्लक्ष झालं असेल तर त्याचा ‘अर्थ’ काय? याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर यामुळे पोलिसांच्या देखील कार्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पंचगव्हाणमधील गब्बरच्या मालकीच्या ‘ऑरो वॉटर प्लांट’वर पोलिसांची नियमित उठबस असल्याचं समोर आलं आहे. फरार गब्बरला अटक झाली तर ड्रग्ज पेडलरचं मोठं ‘अकोला कनेक्शन’ समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गब्बर हाच अकोला आणि परिसरातील प्रमुख ड्रग्ज पुरवठादारांपैकी एक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा