मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं

मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं


अकोला : विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून छाननी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. आयोगाच्या तारखेनुसार 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज छाननी होऊन बाद उमेदवारांची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, अकोला (Akola) जिल्ह्यात चक्क मनसेच्या उमेदवाराचाच अर्ज बाद झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. या घटनेनंतर, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा असून, आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही संबंधित उमेदवारावर केला जात आहे. त्यातून, त्यांच्या मनसे (MNS) कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदवारी अर्ज फेटाळलेल्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचं कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं. अर्जाच्या छाननीत काल वय 25 दिवसांनी कमी असल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला गेला होता. त्यामुळे, मनसे पक्षाकडून आता काय कारवाई केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

अकोल्यातील डाबकी रोड भागातल्या आठवडी बाजार चौकात अंबेरे यांचं कार्यालय आहे. अंबेरे यांनी विरोधी उमेदवारांशी हातमिळवणी करून जाणीवपूर्वक आपलं वय कमी असल्याची बाब लपवल्याचा आरोप आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून ही तोडफोड केल्याची माहिती आहे. उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. मात्र, येथील मतदारसंघात मनसेचा उमेदवार अपात्र ठरल्याने मनसैनिक व मनसे पक्षासाठी हा मोठा झटका आहे.

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं राज्यातील बहुतांश मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. राज ठाकरे यांनी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र दौरा केला होता. त्यावेळी, काही उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, निवडणुकांची घोषणा होताच मनसेकडून याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, अकोला मतदारसंघातून प्रशंसा अंबेरे या युवतीला उमेदवारी देण्यात आली होती.

हेही वाचा

पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा

 

 

अधिक पाहा..



Source link

रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या मुलीवर सामूहिक अत्याचार, अमरावतीमध्ये धक्कादायक घटना

रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या मुलीवर सामूहिक अत्याचार, अमरावतीमध्ये धक्कादायक घटना


अमरावती : अमरावती शहरात 25 वर्षीय युवतीवर  जणांकडून सामुहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन  पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात  आली आहे.  यामध्ये पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि कार जप्त करण्यात आहे.  सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना पकडण्यात यश आले आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, विलासनगर येथील एका युवतीचे घरी भांडण झाले त्यानंतर  युवती रागाच्या  भरात घराबाहेर पडली.  घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्याने जात असताना एका ओळखीच्या  युवकाने विलासनगरमधून युवतीला राग शांत करण्यासाठी नेलं आणि दारू पाजली.  त्यानंतर त्याने आपल्या चार मित्रांना बोलावले. त्यानंतर कारमध्ये आलेल्या तरुणांनी पीडिताला कारमध्ये बसवून अमरावती शहरातील वेलकम पॉईंटजवळील शेतात घेऊन गेले. तिथे तरुणांनी आळीपाळीने युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला बुधवारी पहाटे एका ठिकाणी सोडण्यात आले.  

तरुणांनी सोडल्यानंतर पीडिताने ताबडतोब पोलीस स्थानक गाठले.  आज दुपारी 1 च्या जवळपास पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली. या प्रकरणी गाडगेनगर पोलीसांनी मनोज डोंगरे (वय 29) यांच्यासह अक्षय सरदार (वय 29), अजय लोखंडे (वय 28), मिलिंद दहाट (वय 30), प्रीतम धडसे (वय 19)  यांना अटक केली असून यांच्यावर गुन्हा दाखल केले असून त्यांच्याकडून चारचाकी गाडी जप्त केली आहे..

सीसीटीव्हीने आरोपीला पकडून दिले

पीडितीन तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ज्या बारमध्ये दारु घेतली त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये पीडित महिलेला एका व्यक्ती हात पकडून जबरदस्तीने घेऊन जाताना दिसली.  त्या फुटेजची बारकाईने चौकळी केली असता संशयीत व्यक्तीला विशालनगर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर संशयीत व्यक्तीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्या आाधारे इतर तिघांना अटक करण्यात आली.   गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी आणि कारदेखील यावेळी जप्त करण्यात आली.  

राज्यात बाल लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन व महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बदलापूरच्या शाळेतील बाल लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या लाटेनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना उघड झाल्या असून पोलिसांनी (Police) देखील तातडीने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा काही दिवसांपूर्वीच एन्काऊंटर करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती.

हे ही वाचा :

Bopdev Ghat Incident: ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत

अधिक पाहा..



Source link

अकोल्यात सर्वपक्षीयांसमोर ‘बंडोबां’चे आव्हान; बंड शमविण्यासाठी सर्वच पक्षांत नेत्यांची धावपळ

अकोल्यात सर्वपक्षीयांसमोर ‘बंडोबां’चे आव्हान; बंड शमविण्यासाठी सर्वच पक्षांत नेत्यांची धावपळ


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात निवडणूक ज्वर सध्या टिपेला पोहचला आहे.‌ काल (29 ऑक्टोबर) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळाली. बंडखोरीचं हेच चित्र अकोला जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पहायला मिळालं. ‘पार्टी विथ डिफरन्स’, ‘शिस्तबद्ध पक्ष’ अशी ओळख असलेल्या भाजपाला अकोल्यात बंडखोरची सर्वाधिक झळ पोहोचलेली पाहायला मिळाली.

यासोबतच जिल्ह्यात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीचं अमाप पीक आल्याचं चित्र आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या दिग्गजांनी बंडखोरी केली आहे. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबरच्या माघारीपर्यंत यातील किती ‘बंडोबां’ना पक्ष ‘थंड’ करतो याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागलेली आहे.

बंड शमविण्यासाठी सर्वच पक्षांत बड्या नेत्यांची धावपळ

अर्ज भरण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी अकोला जिल्ह्यातल्या काही मतदारसंघात बंडखोरी करून उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी बंडखोरी करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यामध्ये प्रामुख्याने महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळाली. त्यामुळे आता या बंडखोरांना रोखण्याचं मोठं आव्हान सर्वच राजकीय पक्षांसमोर असणार आहे. अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात कुणी-कुणी बंडखोरी केली आहे?, ते पाहूयात.

अकोला पश्चिम : महाविकास आघाडीत अकोला पश्चिम मतदार संघ हा काँग्रेसच्या वाटेवर गेला आहे. तर महायुतीत मतदारसंघ भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे.  काँग्रेसकडून या मतदारसंघात साजिद खान पठाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. तर भाजपकडून माजी महापौर विजय अग्रवाल यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात पक्षाच्या दिग्गजांनी बंडखोरी करत दंड थोपटले आहेत 

अकोल्यात काँग्रेसच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटांनी काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली आहे. साजिद खान पठाण यांना काँग्रेसन तिकीट दिल्यामुळे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते डॉ. जीशान हुसेन यांनी बंडाचा झेंडा हाती घेत वंचित बहुजन आघाडीची वाट धरली आहे. सर ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख आणि महापालिकेतील माजी गटनेते राजेश मिश्रा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत दंड थोपटले आहेत. हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्यासाठी आधीपासूनच ठाकरे गटाचा विरोध होता. राजेश मिश्रा यांच्यासोबतच ठाकरे गटाचे दुसरे नेते  प्रकाश डवलेंनी देखील बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल भरला. तर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री प्रा.अजहर‌ हूसेन यांचे पुत्र जिशान हुसेन यांनी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत उमेदवारी दाखल केली. यासोबतच काँग्रेस नेते आणि माजी महापौर मदन भरगड यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

शिस्तबद्ध पक्ष समजल्या जाणाऱ्या भाजपातही अकोला पश्चिम मध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणजेच भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या विरोधात भाजपच्या दोन नेत्यांनी बंड पुकारला.. भाजपचे ज्येष्ठ नेते हरीश आलिचंदानी आणि डॉ. अशोक ओळंबे हे भाजपकडून इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांचा तिकीट नाकारलं आणि विजय अग्रवाल यांना संधी दिली. त्यामुळे दोन्ही नेते नाराज होते. ओळंबे यांनी प्रहार पक्षात प्रवेश करत तिसऱ्या आघाडी कडून आपली उमेदवारी दाखल केली. तर हरीश आलिचंदानी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आहे. या दोघांची उमेदवारी भाजपासाठी मोठे डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुर्तिजापूर : मुर्तीजापुर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 2009 पासून भाजपाचे हरीश पिंपळे येथून सतत तीनदा विजय झालेले आहेत. यावेळेस त्यांचं तिकीट कापला जाईल अशी मोठी शक्यता आणि चर्चा संपूर्ण मतदारसंघात होतील. भाजपच्या पहिल्या दोन्ही यादींमध्ये त्यांचं नाव नसल्याने त्यांच्या उमेदवारीची शक्यता मावळली होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणी पक्षाने चौथ्यादा हरीश पिंपळे यांच्यावर परत विश्वास ठेवत त्यांना रिंगणात उतरवलं आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सुगत वाघमारे यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मात्र मुर्तीजापुर मतदारसंघात तीनही प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे. 

मुर्तीजापुरमध्ये शरद पवार गटाच्या रवि राठीनी पक्षांतराचा नवा विक्रम रचला आहे. त्यांनी चार दिवसात तीन राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीन तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपची वाट धरली होती.. मात्र, भाजपने विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना पुन्हा चौथ्यांदा संधी दिलीये. त्यामुळं रवी राठी नाराज झाले.. थेट त्यांनी प्रहार पक्षात प्रवेश केलाय. आणि तिसऱ्या आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 2019 च्या निवडणुकीत रवी राठी यांनी राष्ट्रवादीकडून तिसऱ्या क्रमांकाची 42 हजार मते घेतली होती. तर याच मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते महादेव गवळे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. 

भाजपने हरीश पिंपळे यांना उमेदवारी दिल्याने भाजपाचे बंडखोर आणि बोर्टा गावाचे युवा सरपंच पंकज सावळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली सावळे यांना भाजपातील असंतुष्टांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. याशिवाय वंचितने डॉ. सुगत वाघमारे यांना उमेदवारी दिलीय. यामुळे वंचितच्या ज्येष्ठ नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा पुष्पा इंगळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

बाळापूर : बाळापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाल्याचे दिसून आलेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना या ठिकाणी बच्चू कडूच्या परिवर्तन महाशक्ती म्हणजेच तिसरा आघाडीने पाठिंबा दिला.‌ त्यांना आधी प्रहारकडून पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी कृष्णा अंधारे यांनी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला.  कृष्णा अंधारे हे शिंदे गटाकडून तसेच राष्ट्रवादीकडून बाळापुर मतदारसंघासाठी इच्छुक होते. मात्र बाळापुर मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाटेवर गेला आणि ते नाराज झाले. अखेरच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढत असलेले उमेदवार आणि काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनी निवडणुकीच्या तीन आठवड्यापूर्वीच काँग्रेसमधून वंचितमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे खतीब यांची बंडखोरी येथून महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाचे उमेदवार असलेले नितीन देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे.

अकोट : अकोट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते रामप्रभू तराळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केले. ठाकरे गटाकडून ते इच्छुक होते. मात्र अकोट विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेवर गेल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे तराळे यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

अकोला पुर्व :  अकोला पूर्वमध्ये वंचितचच्या जेष्ठ नेत्याने बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने वंचित बहुजन आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. वंचित ते ज्येष्ठ ओबीसी नेते डॉ.संतोष हुशे हे पक्षाकडून अकोला पूर्व मतदार संघासाठी इच्छुक होते. मात्र वंचितने त्यांना तिकीट नाकारलं. आणि ज्ञानेश्वर सुलतान यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज असलेल्या संतोष हुशे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. डॉ. हुशे हे गेल्या 40 वर्षांपासून प्रकाश आंबेडकरांचे अत्यंत निकट आणि विश्वासू नेते समजले जातात. 

बंडखोरांना थांबवण्याचे राजकीय पक्षांपुढे आव्हान 

अकोला जिल्ह्यातील सर्वच पक्षांना बंडखोरांच्या उमेदवारीचा फटका बसला आहे. दरम्यान, आता या बंडखोरांना रोखण्याचं आघाडी आणि युतीला मोठं आव्हान असणार आहे. कारण, 2019 च्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यात दोन जागांवरील निकाल हे फक्त दोन हजार मतांपर्यंत असल्याने कोणताच राजकीय पक्ष कोणत्याही प्रकारची चूक करायला तयार नाही. गेल्या निवडणुकीत अकोला पश्चिममधून भाजपाचे गोवर्धन शर्मा यांनी फक्त 2593 मतांनी काँग्रेसच्या साजिद खान पठाण यांचा पराभव केला होता. तर मुर्तीजापुरमधून भाजपाचे हरीश पिंपळे हे वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांच्यापेक्षा फक्त 1910 मतांनी आघाडी घेत विजय झाले होते. त्यामुळे बंडखोरांच्या मतांमुळे सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचं देऊळ पाण्यात आहे. त्यामुळे ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी सर्वच पक्ष कसोशीने प्रयत्न करणार आहेत, हे मात्र निश्चित.

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

जितेंद्र आव्हाडांनी लायकीच्या पलीकडं जाऊन अजितदादांवर टीका करु नये, अमोल मिटकरींचा हल्लाबोल

जितेंद्र आव्हाडांनी लायकीच्या पलीकडं जाऊन अजितदादांवर टीका करु नये, अमोल मिटकरींचा हल्लाबोल


Amol Mitkari on Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे सुरुवातीपासूनच अजित दादांवर द्वेष ठेवतात. अजितदादा पदावर असताना तेव्हा आव्हाडांची खिचडी पकली नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाडांनी लायकीच्या पलीकडे जाऊन अजित पवारांवर टीका करु नये. बुद्धी जागेवर येण्यासाठी आव्हाडांनी रोहित पाटलांचं पाय धुवून पाणी आणि पिलं पाहिजे असा टोलाही मिटकरींनी लगावला. 

आर.आर. आबा गृहमंत्री असताना त्यांना तातडीने सही कुणी करावी लावली. हे महाराष्ट्र समोर आलं पाहिजे. त्यासाठीच अजित पवारांच्या स्टाईलमध्ये ते केलेलं विधान होतं असेही अमोल मिटकरी म्हणाले. सांगवीत आज आयोजीत केलेल्या सभेत अजितदादांनी गतकाळातील वस्तुस्थिती सांगितली होती. अजितदादांच्या विधानाचा विपर्यास करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाडांनी रोहित पाटलांचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे असेही मिटकरी म्हणाले. आव्हाडांनी इथून पुढे तोंड सांभाळून बोलावं. आपापला मतदारसंघ सांभाळावा असेही मिटकरी म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज तासगात माजी खासदार संजयकाका पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी दादांनी दिवंगत आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सही केल्याचा गौप्यस्फोट केला. यावेळी अजित पवार यांनी सांगली मधील सभेत सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणी आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला असं वक्तव्य केलं. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्यात आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता,असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या संजय काका पाटील यांच्या प्रचार शुभारंभ मेळाव्यातून केला. मुंबईत दहशतवादी हल्ल्यानंतर बडे बडे शहरो मे छोटे-छोटे हातसे होते रहते है असे म्हणाले आणि आर. आर. पाटील यांना कोणीतरी राजीनामा द्यायला सांगितला.  आर आर पाटलांनी थेट राजीनामा देऊन अंजनी गाठले, त्यांच्या राजीनामाचे मला कल्पनाच दिली नाही.  आर. आर. पाटील यांना तंबाखू खाऊ नको म्हणून कित्येक वेळा सांगितलं होतं. पण ते माझ्या माघारी हळूच तंबाखू खायचे, असं देखील अजित पवार म्हणाले.  

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar : आर. आर.पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरील सही फडणवीसांनी दाखवली, अजित पवारांचा आरोप

अधिक पाहा..



Source link

भाजपाने प्रहारच्या प्रदेशाध्यक्षला फोडलं, बच्चू कडूंनीही दंड थोपटले, बडा मासा गळाला लावून अकोल्

भाजपाने प्रहारच्या प्रदेशाध्यक्षला फोडलं, बच्चू कडूंनीही दंड थोपटले, बडा मासा गळाला लावून अकोल्


Akola Vidhansabha Election 2024:राज्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, अकोल्याचा राजकारणात काल दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत सामना रंगणार असल्याचं दिसत असलं तरी दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कळल्यानंतर आता बच्चू कडूंनी भाजपचा बडा मासा गळ्याला लावत अकोल्यातील राजकारणाचा गेम फिरवल्याचं दिसतंय.

8 वर्ष भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले आणि सध्या प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले भाजपचे अशोक ओळंबे यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला असून आज ते विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  अकोल्यातून भाजपने माजी शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांना तिकीट दिलं आहे. तर बच्चू कडूंनी भाजपच्या शहराध्यक्षाला प्रहारमध्ये घेत दंड थोपटले आहेत.    

बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये मोठं इनकमिंग

काल दिवसभरात बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षात मोठंच ‘इनकमिंग’ झाल्याचं दिसलं. एकीकडे भाजपचे आठ वर्ष अकोला शहराध्यक्ष राहिलेले आणि सध्या प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले डॉ अशोक ओळंबे यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांचाही मध्यरात्री प्रहारमध्ये प्रवेश झाल्याचं कळतं. बाळापुर मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात गेल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या जिल्हाध्यक्षांनी ‘रामराम’ ठोकत प्रहारमध्ये प्रवेश केला आहे. बाळापुर मतदारसंघातून कृष्णा अंधारे आता प्रहारचे उमेदवार असतील. त्यामुळे अजित पवार गटाला बाळापुर मतदारसंघात मोठाच धक्का बसल्याचं सांगण्यात येतंय.

3 पक्ष बदलत शेवटी प्रहार तिकीट

गेल्या काही दिवसांमध्ये बच्चू कडूंच्या प्रहार मध्ये अनेकांचा पक्षप्रवेश होत आहे. तीन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपात प्रवेश करणारे रवी राठी यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला होता. एकाच आठवड्यात तीन पक्ष बदलण्याचा अनोखा विक्रम रवी राठी यांनी केल्याची चर्चा आहे. दरम्यान मुर्तीजापुर मधून भाजपकडून रवि राठी यांना तिकीट मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. 2019 च्या निवडणुकीत रवी राठींना राष्ट्रवादीचे तिकिटावर तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच 42000 मते मिळाली होती. दरम्यान मध्यरात्री डॉक्टर अशोक कोळंबे यांचा निवासस्थानी प्रहार मध्ये प्रवेश केल्यानंतर आता मूर्तिजापूरमधून रवी राठी हे प्रहार चे उमेदवार असतील.

हेही वाचा:

Maharashtra Assembly Election 2024: भाजपचा बच्चू कडूंना जोरदार धक्का; प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे भाजपच्या गळाला 

अधिक पाहा..



Source link

एकाच मतदारसंघासाठी महायुतीत दोन उमेदवारांना एबी फॉर्म; वरुड मोर्शी मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत?

एकाच मतदारसंघासाठी महायुतीत दोन उमेदवारांना एबी फॉर्म; वरुड मोर्शी मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत?


Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जरी महायुतीचे वरिष्ठ नेते मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असा दावा करत असले तरी विदर्भातील वरुड मोर्शी या विधानसभा (Warud Morshi Vidhan Sabha) मतदारसंघात तशीच स्थिती निर्माण झाली आहे. वरुड मोर्शीचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार(Devendra Bhuyar) यांनी काही दिवसांपूर्वी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. तर आज देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याकडून त्यांना ए बी फॉर्म मिळाल्याचा दावा केला आहे.

वरुड मोर्शी महायुती मधील मैत्रीपूर्ण लढतीचा केंद्र?

तर दुसऱ्या बाजूला वरुड मोर्शी मधील भाजप नेते उमेश यावलकर यांचाही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घेणाऱ्या उमेश यावलकर यांचा दावा आहे की भाजपने त्यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे एकाच मतदारसंघातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दावेदार फक्त दावेदारीच करत नाही आहे. तर त्यांच्या पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिल्याचा दावाही करत आहे. त्यामुळे वरुड मोर्शी महायुती मधील मैत्रीपूर्ण लढतीचा केंद्र बनेल आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देवेंद्र भुयार यांनी विधानसभेची उमेदवारी मिळवण्याच्यादृष्टीने अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, पहिल्या दोन उमेदवारी याद्यांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे देवेंद्र भुयार मुंबईत ठाण मांडून बसले होते. मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने देवेंद्र भुयार नाराज होऊन माघारी परतले होते. यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसला ‘उमेदवारी अर्ज भरायला चला’, असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे देवेंद्र भुयार अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असे दिसत होते. मात्र, अजितदादा गटाकडून त्यांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला.

A, B  फॉर्म म्हणजे काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार विधानसभा किंवा लोकसभेत एखाद्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज करायचा असेल तर त्याची खासगी माहिती आणि तो कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. यासाठी त्याला दोन स्वतंत्र फॉर्म भरावे लागतात. यातील पहिला फॉर्म हा A आणि दुसऱ्या फॉर्मला B असे संबोधले जाते. याला एकत्रित AB फॉर्म संबोधले जाते. AB फॉर्म भरणाऱ्या उमेदवाराला त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजले जाते. त्यामुळं हा फॉर्म भरणं महत्वाचं समजलं जातं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही, ते केवळ आमचे राजकीय शत्रू; संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा

मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp