Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकर यांना भोवलंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलीये. आता पोलिसांनाही त्यांना दणका दिलाय.
Maratha Reservation : राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बुधवारी जोरदार गदारोळ झाला. विधानसभा आणि विधानपरिषदेतही मराठा ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधी आमदार आमनेसामने आले. निमित्त ठरलं ते राज्य सरकारनं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीनं घातलेला बहिष्कार… मविआच्या नेत्यांनी बैठकीला दांडी मारल्यानं बुधवारी कामकाज सुरू होताच सत्ताधारी आमदारांनीच गोंधळाला सुरूवात केली. या गदारोळामुळं विधानसभा तब्बल 4 वेळा तहकूब करण्यात आली. शेवटी अडीच वाजता दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्याची वेळ अध्यक्षांवर आली.
मराठा आरक्षण बैठकीला विरोधक का आले नाहीत. त्यांचा बोलवता धनी कोण?, असा सवाल आमदार आशिष शेलारांनी यावेळी केला. तर सरकारकडून मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला.
सत्ताधारी मराठा समाजाला आरक्षणावरुन झुलवत ठेवत असल्याचा गंभीर आरोप विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. सरकारमधील नेते छगन भुजबळ दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करतात. उपमुख्यमंत्री फडणवीस एक बाजू सांभाळतात आणि मुख्यमंत्री दुसरी बाजू सांभाळतात.. असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. गरज होती तेव्हा आम्हाला विश्वात घेतलं नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
विधानपरिषदेतही आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण तापलं. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गोंधळ एवढा वाढला की, मार्शल्सना बोलवण्याची वेळ उपसभापती नीलम गोऱ्हेंवर आली. तरीही गोंधळ थांबेना. अखेर परिषदेचं कामकाजही तहकूब करण्यात आलं.
कोणत्याही समाजावर अन्याय व्हायला नको अशी भूमिका सरकार आणि विरोधक नेहमीच मांडतात. मात्र आरक्षणाचा राजकीय तिढा काही संपत नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच राहतात. या सगळ्यामध्ये राज्यातील सामाजिक वीण कुठेतरी सैल पडताना दिसतेय आणि ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाहीय.
दरम्यान, एकही कुणबी नोंद रद्द केली तर विधानसभा निवडणुकीत तुमचे 288 आमदार पाडून टाकू असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय. तसंच कुणबी नोंद रद्द झाल्यास राज्यातील सगळे रस्ते जाम करु अशा इशाराही त्यांनी दिलाय. मनोज जरांगे पाटलांची जनजागृती शांतता रॅली धाराशिवमध्ये पोहोचली. इथे आयोजित सभेत जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर घणाघाती टीका करत हा इशारा दिला.
Fish Swimming On Local Train Tracks: केवळ महाराष्ट्रातच नाही तर मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यांना धुवाँधार पावसाने झोडपलं आहे. महाराष्ट्राबरोबरच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसहीत अनेक राज्यांमधील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक राज्यांमधील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. बिहारसारख्या राज्यामध्ये तर नदीवरील पूल पडण्याच्या एकामागून एक अनेक घटना घडल्यात. काही ठिकाणी कंबरभर पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागथ आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये रेल्वे ट्रॅकवर चक्क मासे पोहताना दिसत आहेत.
ट्रॅकमध्ये पोहणारे मासे
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये दोन रुळांदरम्यान साचलेल्या पाण्यामध्ये काही सापासारखे दिसणारे लांबलचक मोठ्या आकाराचे मासे पोहत असल्याचं दिसत आहे. आता हा व्हिडीओ काहीजण कल्याणचा म्हणत आहेत तर काहीजण डोंबिवलीचा म्हणत आहेत. पण हा व्हिडीओ नेमका कुठला हे ठामपणे सांगता येत नसलं तरी हा व्हिडीओ व्हायरल झालाय हे मात्र खरं.
महिला प्रवाशांच्या गप्पा
हा व्हिडीओ काही महिला प्रवाशांनी शूट केल्याच्या व्हिडीओमधील आवाजावरुन स्पष्ट होत आहे. एक महिला दुसरीला व्हिडीओ काढ असा सल्ला देत असतानाच दुसरी व्हिडीओच काढतेय असं सांगताना ऐकू येतं. त्यानंतर या महिला हे मासे नदीच्या पाण्यातून आले असतील. त्यांना कळत नाहीये ते कुठे आहेत. ट्रॅकवर हरवलेत. कसे सुस्तावले बघ, अशी वाक्य या महिलांच्या संवादामध्ये ऐकू येत आहेत. हा व्हिडीओ 8 जुलै रोजीचा म्हणजेच सोमवारचा आहे. याच दिवशी मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. ज्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. तुम्हीच पाहा व्हायरल झालेले हे व्हिडीओ…
1)
भिजलेल्या लोकांचे दुःख कमी व्हावं म्हणून एकनाथ शिंदे सरकारने मुंबईच्या ट्रॅक मध्ये शार्क मासे सोडले आहेत
रेल्वे प्रशासनाचा नाले सफाईचा दावा काल पूर्णपणे फोल ठरला. जागोजागी पाणी साचत होते, रेल्वे ट्रॅक सुध्दा भरून वाहत होते. त्यातच एका ठिकाणी ट्रॅक मध्ये मासे फिरत असल्याचा व्हिडियो वायरल झाला आहे. #MumbaiRains
— शिवसैनिक सागर मस्के (@SagarMa37210258) July 9, 2024
आता हे मासे ट्रॅकवर कसे आणि कुठून आले यासंदर्भातील वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. दरम्यान, हे मासे चिवण्या नावाने ओळखले जाणारे मासे असल्याचं सांगितलं जात आहे. याच माशांना ‘चढणीचे मासे’ किंवा ‘उद्धवनीचे मासे’ असंही म्हणतात.
Vidhan Parishad Election 2024: पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं. 12 जुलैला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक चुरशीची ठरणाराय. आगामी विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्याचा खटाटोप सर्वच पक्षांनी सुरू केला आहे. महाराष्ट्रातील आमदारांचा मुक्काम सध्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे. महाविकास आघाडीनं संख्याबळापेक्षा एक उमेदवार जास्त उभा केलाय. विधान परिषदेच्या या मैदानात राज्यातील अनेक दिग्गज नेते उतरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फोडाफोडी होवू नये म्हणून सर्वच पक्षांनी खबरदारी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढचे 3 दिवस भाजप आमदारांचा मुक्काम हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये असणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार वांद्रे इथल्या हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये मुक्कामाला असतील. शिंदेंच्या आमदारांसाठी ताज हॉटेलमध्ये 60 रूम बुक करण्यात आल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे उपस्थित राहणार असून आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अंधेरीच्या हॉटेलात राहणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची सोय परळच्या आयटीसी सेंट्रल ग्रँड मराठा हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे भाजपचे उमेदवार आहेत. कृपाल तुमाने, भावना गवळी हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील हे महाविकासआघाडीचे उमेदवार आहेत.
संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीचे 69 आमदार आहेत. त्यांचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, मविआनं तीन उमेदवार दिल्यानं निवडणुकीत रंगत आलीय.. यामधलं एक महत्वाचं नाव म्हणजे मिलिंद नार्वेकर. नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक आहेत.. त्यांना विधान परिषदेमध्ये उतरवण्याचं कारण म्हणजे त्यांचे सर्वपक्षीय नेते आणि आमदारांशी असलेले सलोख्याचे संबंध.
अगदी शिंदेंच्या शिवसेनेतीलही काही मतं नार्वेकरांना मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.. मागील काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर हे भाजपच्या काही नेत्यांशी गुप्तगु करताना पाहायला मिळालं.. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, राम कदम यांच्याशी मिलिंद नार्वेकरांची झालेली चर्चा हा चर्चेचा विषय ठरलाय… त्यामुळे भाजपचे आमदारही नार्वेकरांना मदत करणार का अशी चर्चा सुरू झालीय.
शिवसेना ठाकरे गटाच्या या खेळीमुळं धोक्यात आलेले उमेदवार म्हणजे शेकापचे जयंत पाटील… आता जयंत पाटलांना महायुतीचे किंवा काही अपक्ष आमदार मदत करणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे.. 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे असल्यानं नेमका कुणाचा गेम होतो, ते पाहायचं…
Shocking Visuals Nashik Bus Accident: नाशिकमधील सापुतारा घाटातील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटामध्ये रविवारी एक बस थेट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचा हादरवून टाकणारा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे. खरं तर सापुतारा घाट मार्ग दिवसेंदिवस अधिक खडतर होत असून पावसामुळे येथील निसरड्या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. असाच एक अपघात रविवारी (7 जुलै 2024 रोजी) झाला. प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस दरीत कोसळून 2 मुलांचा मृत्यू झाला असून एकूण 58 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचा नेमका क्षण बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.
नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त बस ही गुजरातमधील सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती समोर येत आहे. ही लक्झरी बस 60 प्रवाशांना घेऊन परत जात असताना हा अपघात झाला. या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याचं दिसून येत आहे. सुरतमधील चौक बाजार-उधना येथील प्रवाशांना घेऊन जाणारी बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक जीजे 05 बी. टी. 9393 ही बस रविवारी सापुतारा येथे गेलेल्या प्रवाशांना घेऊन सापुतारा-मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात होती. सायंकाळी सहाच्या सुमारास घाटात एक अवघड वळण घेताना लक्झरी बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस संरक्षण भिंतीला धडकून दरीत कोसळली.
व्हिडीओत कैद झाला थरार
व्हिडीओमध्ये अवघड वळणावरुन बस वळालीच नाही आणि थेट संरक्षण भिंत तोडून दरीत कोससळ्याचं व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे. स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ही लक्झरी बस खोल दरीत कोसळल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांच्या किंकाळ्या आणि आरडाओरड ऐकू येत आहे.
…म्हणून मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली नाही
ही बस दरीत कोसळल्यानंतर लोक मदतीसाठी धावले. सुदैवाने ही बस संपूर्णपणे दरीत न कोसळता उतारावरील एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आणि अधिक प्रमाणात जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात 8 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, 108 चे पथकही घटनास्थळी पोचलं होतं. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात हलवलण्यात आलं. या अपघातात दोन चिमुकल्यांनी प्राण गमावला आहे. या अपघातप्रकरणाची सध्या पोलीस चौकशी करत आहे. मात्र या दुर्घटनेचा नव्याने समोर आलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकल्याचं पाहायला मिळत आहे.
Pune Heavy Rain : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यात 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशातच पुणे जिल्ह्यात पुणे शहर, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी आणि भोर तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे.
अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता वर नमूद तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावं, असंही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर
भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर केली आहे.