Maharashtra Weather Alert: यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावली आहे. मात्र संपूर्ण जून महिना सरला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. जुलै महिनाचा पहिला आठवडा गेला तरीदेखील मुसळधार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच आहे. मुंबईत तर केवळ पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. तर, राज्यातील काही भागात पावसाची समाधानकारक स्थिती आहे. मात्र, मुंबईत पावसाने पाठ फिरवली आहे.
पश्चिमी वाऱ्याचा वेग अत्यंत कमी झाल्याने समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला नसल्याने पाऊस थांबला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामानातील बदलांमुळं संपूर्ण राज्यात अद्यापही पुरेसा पाऊस झाला नाहीये. सुरुवातीला जुलै महिन्यात पाऊस अपेक्षित असेल असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र, हवामानातील बदलामुळं अद्यापही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत मुंबईकर आहेत.
रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, सोमवारी आणि मंगळवारी साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मराठवाडा वगळता 10 जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही मध्यम पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसासाठी योग्य स्थिती आवश्यक आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल.
मुंबईसह महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांनंतर मुसळधार पाऊस बरसेल. तो पर्यंत कोकणपट्टीसह राज्याच्या काही भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ७ जुलै रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
राज्यात पाणीचिंता
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले असले तरी धरणांमधील पाणीसाठा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच नोंदविण्यात आला आहे. राज्यात जवळपास ९८५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असल्याचे माहिती जलसंपदा मंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे. राज्यातील एकूण ७९५ गावे आणि ३ हजार १५७ वाड्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे.
मुंबईतही जलसंकट
सात धरणांच्या क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस नाहीये. त्यामुळं मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. परिस्थिती चिंताजनक असून सात धरणांत नऊ टक्के पाणीसाठा आहे. तसंच, राखीव जलसाठ्याचा वापर सध्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maratha Reservation Warning: मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. जरांगे पाटील आज हिंगोलीमध्ये असून या ठिकाणी समाजबांधावांना उद्देशून त्यांनी जाहीर भाषण केलं. मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 288 मतदरासंघांमधून सत्ताधाऱ्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा थेट इशाराच दिला आहे.
…तर लोकसभेची पुनरावृत्ती होईल
“तुम्हाला बघून आज माझं मन भरून आलं आहे. सकाळपासून आपण भूक हरवून उपस्थित राहिलात यासाठी मी आपले आभार मानतो,” असं म्हणत जरांगेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. “एकट्या छगन भुजबळांचं ऐकून मराठ्यावर अन्याय केला तर याद राखा,” असा इशारा जरांगेंनी आपल्या भाषणातून दिला. “भुजबळांचं ऐकून जर मराठयांवर अन्याय केला तर 288 मतदारसंघातून सरकारचा एक ही उमेदवार निवडून येऊ देणार नाही,” असं जरांगे आपल्या भाषणात म्हणाले. “सरकारने मराठ्यांचा आक्रोश समजून घ्यायला हवा. छगन भुजबळांचं ऐकून जर अन्याय केला तर लोकसभेची पुनरावृत्ती होईल. पुन्हा मला म्हणायचं नाही, असं कसं झालं. मग मांडीला मांडी लावून बसतात आणि म्हणतात पाटील फक्त पाडा म्हणून नका. पाडा मराठे म्हटले तर तुमची ही अवस्था झाली,” असा टोला जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
राजकारणाची इच्छा नाही
“मराठा समाजाला आरक्षण मिळावे एवढीच आमची अपेक्षा आहे. राजकरण करायची आमची इच्छा नाही. जर आम्हाला राजकारणाकडे ओढलं तर तुमचं तुम्ही बघा,” असा इशारा जरांगेंनी दिला. तसेच पुढे बोलताना, “सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. 1967 ला 180 जाती आरक्षणाखाली घातल्या. त्यात 83 क्रमांकाला कुणबी आहे. व्यवसायाला आरक्षण दिलं गेलं. माळी समाजाची जात 1967 आरक्षणाअंतर्गत घातली. एका माळी समाजातील सर्व पोटजाती आरक्षणात घातल्या. 83 क्रमांकाला कुणबी आहेत. विदर्भातील मराठा समाज त्यात आहे. आमचा रोटी-बेटी व्यवहार हकतो. त्यांना जर व्यवसायावर आरक्षण दिलं तर आमचा व्यवसाय ही शेतीच आहे. 180 जातीच्या पोट जाती म्हणून 350 जाती यांनी आरक्षणात घतल्यात,” असं जरांगे म्हणाले.
13 तारखेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर..
“कैकाडी समाजाच शिष्टमंडळ मला भेटले. आमची एकच जात आहे. विदर्भात ते एससी आरक्षणात आहेत. विदर्भातील कैकाडी मराठवाड्यात आले की जात बदलते. आरक्षण मिळत नसल्याने मराठ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळत नाही. नोकरी लागत नाही. 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. तसं झालं नाही तर झालेला निर्णय तुम्हाला झेपायचा नाही,” असं जरांगे सरकारला इशारा देताना म्हणालेत.
13 तारखेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर आपली मुंबईला बैठक होईल. यावेळी तुम्ही म्हणालं तसं मागच्यावेळी मी परत आलो आता येणार नाही. मग छगन भुजबळला कडेवर घेऊन बसा,” असा टोला जरांगेंनी लगावला. “छगन भुजबळ आता मुकादम झालाय. याला हे बोल, त्याला ते बोल. आंतरवालीत आंदोलन सुरू असताना पुढे आणून बसवलं अन् म्हणतात जातीयवाद नाही झाला पाहिजे. माय बाप हो, तुम्हाला हात जोडून विंनती आहे, हे राजकारणी लोक लावून देतील. गोरगरीब ओबीसींच्या अंगावर जाऊ नका. ओबीसींनो मराठ्यांचा पण अंगावर जाऊ नका. केसेस झाल्यावर कुणी सातबारा घेऊन येत नाही. हे छगन भुजबळला समजणार नाही,” असं जरांगे म्हणाले.
‘काहीजण म्हणतात मी मिथुन आहे’
“काहीजण म्हणतात मला घटना कळत नाही. शिकलेलच नाही, मी चवथी शिकलेला नाही. पण दीड कोटी मराठा आरक्षणात घातला का नाही? काहीजण म्हणतात मी मिथुन आहे. बरं मी मिथुन आहे पण मी खुटी ठोकली की नाही?” असा सवाल जरांगेनी विचारला.
Ladaki Bahin Yojana : राज्य सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेच्या अमलबजावणीसाठी राज्य सरकार जोमात कामाला लागलंय. मात्र उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सरकारनं याच बजेटमध्ये आणखी एक घोषणा केली. पण त्या योजनेचं काय झालं?
नवी मुंबईतील (Navi Mumbai) भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (Gamesh Naik) संतप्त झालेत. विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार असलेले गणेश नाईक यांनी राज्य सरकारमधले काही अधिकारी आणि सिडकोचे काही अधिकारी भ्रष्ट असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. एकप्रकारे एकनाथ शिंदेंवरच टीका असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
“गार्डनचे, मैदानाचे, हॉस्पिटलचे आणि शाळांचे भूखंड यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी 13 महिन्यापूर्वी निर्देश देऊनही हे अधिकारी त्यावर कारवाई करायला तयार नाहीत. बिल्डरांच्या हितासाठी महानगरपालिकेला पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी आदेश दिले जातात. राज्य शासनात जे दलाल अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना उघड करण्यासाठी मी आरोप केले आहेत. जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला तुम्ही पाच पैशांची किंमत देणार नसाल तर तुम्ही तसं उत्तर द्या, आम्ही लोकांना सांगू,” असं गणेश नाईक म्हणाले आहेत.
गणेश नाईक अस्वस्थ का?
– लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवं होतं, ते मिळालं नाही. ती जागा शिंदे गटाकडे गेली. – एकेकाळी नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेले नाईक गेल्या काही वर्षात बाजूला गेल्याचं चित्र – सिडको आणि महापालिकेतील वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र – एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिलं जात असल्याची चर्चा – आता ऐरोलीवर शिंदे गटाचा दावा
गणेश नाईकांच्या मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा
नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. लोकसभेला शिंदे गटाच्या उमेदवाराला मोठी आघाडी ऐरोलीतून दिली, तसंच या मतदारसंघात शिंदे गटाचे जास्त नगरसेवक निवडून आले होते असं सांगत हा दावा करण्यात आला आहे. यामुळे भाजपा आणि शिंदे गटात नवी मुंबईत वाद उफळण्याची शक्यता आहे.
“मागच्या वेळी आम्ही युती म्हणून सहकार्य केलं. मोठा लीड आम्ही मिळवून दिला. पण याचं फलित काय मिळालं? विरोधी पक्षापेक्षा येथील स्थानिक नेते आम्हाला टार्गेट करतं. आम्हाला स्वत:चं अस्तित्व टिकवायचं आहे. ऐरोलीत शिवसेनेचे जास्त नगरसेवक आहे, त्यामुळे आम्ही ठाम राहणार आहोत. पुढे काय होईल ते पाहू,” असं नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले म्हणाले आहेत.
Manoj Jarange On Pankaja Munde : लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला. बीडमधील जातीय समीकरण पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेलं, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. उदयनराजे भोसले यांनी प्रचार करून देखील पंकजा मुंडे यांना मराठा मतांचा फटका बसल्याचं दिसून आलं. अशातच बीड मधील पंकजा मुंडेंचा पराभव कोणामुळे झाला? असा सवाल मनोज जरांगे यांना ‘झी 24 तास’च्या मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा जरांगे यांनी काय उत्तर दिलं? पाहा
काय म्हणाले मनोज जरांगे ?
आपण जेव्हा मोठ्या नेत्याचा वारसा चालवत असतो, तेव्हा जनतेची भावना समजून घेणं गरजेचं असतं. ज्यावेळेस जातीय तेढ निर्माण व्हायला लागला, आम्ही म्हणाल तसंच करा, असं म्हटलं तर मराठा समाज कसं ऐकेल? आम्ही कधी विरोध केला? आम्ही सांगितलं का कोणाला पाडा, आम्ही कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. समाजाचा निर्णय घेतला. आधी तुम्ही पडला नाहीत का? तुम्ही फक्त मराठ्यांना द्वेष देयला लागला, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे जरांगे यांनी केलेलं आवाहन नाहीये का? असा सवाल जरांगेंना विचारला गेला. आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं की, सरकारने आमची फसवणूक केली. यावेळेस ताकदीनं पाडा. मराठ्यांच्या मताला एकजूट दिसली पाहिजे. आपल्या मताची भीती वाटली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं होतं. मराठ्यांनी एकजुटीने मतदान केल्याने मराठ्यांच्या पोरगरिबाच्या पाया पडायला लागले.
पाहा Video
दरम्यान, आपण जेव्हा एखाद्या पक्षाच्या मोठ्या पदावर काम करतो, एखाद्या मोठ्या नेत्याचा वारसा चालवतो तेव्हा भावनेच्या, जातीय द्वेषाच्या आहारी न जाता जनतेची भावना समजून घ्यावी लागते. जातीय तेढ निर्माण झाल्यास हे का झालं हे समजून घेणं त्यांचीही जबाबदारी आहे, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले. आम्ही मोठ्या मनाने दिली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी ही आम्ही दिलेल्या वाख्येप्रमाणे व्हायला हवी अशी आमची प्रमुख मागणी असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Ashadhi Wari 2024 : महाराष्ट्राला लाभलेल्या थोर संत परंपरेसाठी जितकं कृतज्ञ रहावं तितकं कमीच. प्रपंचही तितकाच महत्त्वाचा आणि परमात्त्म्याशी एकरुप होणंही तितकंच महत्त्वाचं असं सांगत देवाच्या भक्तीसह समाजप्रबोधनाचं काम संतांनी केलं. दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांच्या आधारावर संतांनी समाजाला सन्मार्गावर नेण्यासाठी मोठा हातभार लावला. अशा या संतांच्या मेळ्यातलं अनेकांच्याच तोंडी असणारं एक नाव म्हणजे, श्री संत ज्ञानेश्वर माऊली. पसायदान असो किंवा ज्ञानेश्वरी… माऊलींचा प्रत्येक शब्द म्हणजे प्रमाण. याच माऊलींनी इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला असं म्हटलं जातं.
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई या भावंडांनी पैठण मुक्कामी असताना धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला. असं म्हणतात की, धर्म, समाजानं आपल्याला स्वीकारून मुंजीची परवानगी द्यावी या हेतूनं ही मंडळी इथं आली, पण धर्मशास्त्राच्या अभ्यासामुळं त्यांनी वेगळा मार्ग निवडला होता. त्या काळात त्यांच्या एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे संस्कृतात असणारं तत्त्वंज्ञान फक्त ब्राह्मणांनाच वाचता येत होतं. ज्यामुळं सामान्यांना या ठेव्यात डोकावण्याचीही परवानगी नव्हती.
पुढं समाजाला उपदेश करणारी ही भावंड पैठणहून आळंदीच्या दिशेनं निघाली आणि त्यांचा किर्तीमान जनमानसात पसरू लागला. वाटेत लागलेल्या नेवासा या गावी त्यांचं आपुलकीनं स्वागत झालं. ही आपुलकी आणि गावकऱ्यांचं प्रेम या भावंडांना भारावून गेलं आणि या ठिकाणाला आध्यात्मिक साहित्यात ओळख असावी अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.
नेवासा येथे मुक्कामी असतानाच ज्ञानेश्वरांनी आपल्या वैचारिक ज्ञानाचा ठेवा वापरत गीता सामान्यांपर्यंत पोहोचवावी अशी इच्छा निवृत्तीनाथांनी व्यक्त केली आणि गीतेचा उपदेश सामन्यांनाही ग्रहण करता यावा यासाठी त्यांनी तो मराठीत लिहिला आणि गीतेचं हे मराठी सार भावार्थदीपिका नावानं ओळखलं जाऊ लागलं. हे शब्द मराठी साहित्यातील उपलब्ध ठेव्यापैकी सर्वात जुनं साहित्य असल्याचं सांगितलं जातं.
आख्यायिका सांगते…
ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील पसायदानानंतरच्या ओवी क्रमांक 1802 आणि 1803 नुसार…
ऐसे युगी वरी कळी | आणि महाराष्ट्रमंडळी | श्री गोदावरीच्या कूळी | दक्षिणिली || 1802||
त्रिभुवनैकपवित्र | अनादी पंचकोश क्षेत्र || जेथ जगाचे जीवन सूत्र || श्री महालया असे ||1803||
म्हणजेच, अशा रितीनं कलियुगात, महाराष्ट्रदेशात गोदावरीच्या दक्षिण तटावर जिथं जगाचे जीवनसूत्र मोहिनीराज यांचं वास्तव्य आहे, असं अत्यंत पवित्र आणि अत्यंत पुरातन पंचक्रोश (नेवासे) क्षेत्र वसलं आहे.
आख्यायिकेनुसार श्री विष्णूनं इथंच मोहिनी रूप धारण केलं होतं. त्याचं प्रतीक म्हणून इथं श्री मोहिनीराज मंदिर असून ते अतिशय पवित्र क्षेत्र आहे. म्हणूनच माऊलींनी गीतेवरील सार मराठीत लिहिण्यासाठी अर्थात ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी या ठिकाणाची निवड केली असावी.
(वरील माहिती उपलब्ध संदर्भ आणि आख्यायिकांवर आधारित असून, त्यामध्ये साधर्म्य नसू शकतं याची नोंद घ्यावी.)