Badlapur Crime News : बदलापूरमध्ये स्त्री बीजांची बेकायदेशीर तस्करी सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ माजली आहे. आजपर्यंत आपण सेक्स रॅकेट ऐकलं होतं, पण पैशांसाठी आता स्त्री बीज तस्करी किंवा एग डोनेशन सारखे धक्कादायक रॅकेट समोर आलंय. या जाळ्यात महिला कशा अडकायच्या आणि कसं चालायचं हे रॅकेट पाहूयात.
रॅकेटमधील मुख्य आरोपी कोण?
सुलक्षणा जयवंत गाडेकर (44) – मुख्य सूत्रधार
अश्विनी चाबुकस्वार (29) – मध्यस्थ आणि महिलांना शोधण्याचे काम करणारी
मंजुषा वानखेडे (46) – रॅकेटमधील महत्त्वाची दुवा.
बदलापूरमध्ये कसं चालायचं ‘स्त्री बीज तस्करीचं’ रॅकेट?
बदलापूरमधील जोवेली परिसरातील नॅनो सिटी इमारतीत हा धक्कादायक प्रकार चालायचा. या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार एक महिला असून तिचं नाव सुलक्षणा गाडेकर होतं. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्याकडे एक पीडित महिला आली होती. तिने याप्रकाराबद्दल सांगितल्यानंतर या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. तिने सांगितलं की, महिलांच्या अंडाशयातील अंडी (Eggs) कृत्रिमरित्या वाढवून ती बेकायदेशीररीत्या IVF (In-Vitro Fertilization) सेंटर्सना विकली जात होती.
असं चालायचं संपूर्ण रॅकेट…!
हे रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवलं जायतंय, यासाठी अशा महिलांचा शोध घेतल्या जायचा ज्यांना पैशांची गरज आहे. यासाठी वस्त्यांमध्ये जाऊन दुसरी आरोपी अश्विनी चाबुकस्वार अशा महिलेचा शोध घ्यायची. मग त्यांना 15 ते 20 हजारांचं आमिष दाखवून बेकायदेशीर इंजेक्शन देण्यात यायची. त्यानंतर या महिलांना डोनर बनवून त्यांच्याकडून हे बेकायदेशीर प्रकार करुन घेतला जायचा.
धक्कादायक म्हणजे सुलक्षणा गाडेकर ही कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:चा घरात या महिलांना हार्मोनल इंजेक्शन्स द्यायची. ज्यामुळे महिलांमधील स्त्री बीजे वाढवण्यासाठी मदत व्हायची.
महिलेला एकदाच स्त्री बीज देता येत मग…?
आयव्हीएफ कायद्यानुसार विशिष्ट वयात आणि अटींसह एक महिला आयुष्यात फक्त एकदाच स्त्री बीज देऊ शकते. त्यामुळे सुलक्षणा गाडेकर या महिलांच्या आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट ओळखपत्रे तयार करायची आणि त्यानंतर त्यांच्याकडून स्त्री बीज घ्यायची. एवढंच नाही तर या स्त्री बीज वाढ पाहण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांऐवजी बेकायदेशीर सेंटर्समध्ये त्या महिलांची गूपचुप सोनोग्राफी करायची. त्यानंतर पुढे स्त्री बीजांची वाढ योग्यरित्या झाल्यानंतर ठराविक आयव्हीएफ सेंटर्समध्ये या महिलांना नेण्यात यायचं. त्यानंतर शस्त्रक्रिया करून ती अंडी काढण्यात यायची.
हे रॅकेट उघड झाल्यानंतर पोलिसांनी या तिन्ही महिलांना अटक केली असून आता अनेक बड्या डॉक्टरांना आणि सोनोग्राफी सेंटर चालकांना रडारवर घेतलंय. पोलिसांच्या तपासातून असं समोर आलं आहे की, काही व्हाईट कॉलर डॉक्टरांच्या मदतीशिवाय इतकं मोठं रॅकेट चालवणे अशक्य आहे.
इतक्या लाखांना व्हायची स्त्री बीजची विक्री!
आता पुढे या स्त्री बीजे गरजू दाम्पत्यांना किंवा आयव्हीएफ सेंटर्सना लाखांच्या घरात विकली जात होती. पोलीस तपासात करताना आरोपींच्या मोबाईलमध्ये आर्थिक व्यवहारांचे, सोनोग्राफीचे आणि बनावट प्रतिज्ञापत्रांचे अनेक पुरावे समोर आले आहेत. धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या अंदाजानुसार या रॅकेटमध्ये किमान 40 ते 100 महिलांचे शारीरिक शोषण झाल्याच उघड झाले होते.
बदलापूर ते बंगळुरु कनेक्शन?
पोलीस तपासातून असं समोर आलं आहे की, हे रॅकेट बदलापूरपर्यंत मर्यादित नसून ते याचे धागेदोरे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर तसंच राज्याबाहेरील गुजरात, तेलंगाना आणि बंगळुरूपर्यंत पोहोचल्याचे धागेदोरे सापडले आहेत. ठाणे पोलिसांनी (परिमंडळ 3) यासाठी विशेष पथके तयार करून अनेक मोठ्या रुग्णालयांची चौकशी सुरू केली आहेत.
स्त्री बीज वारंवार दिल्यास जीवाला धोका?
एका पीडित महिलेने अनेकवेळा स्त्री बीज दिल्यास हे कायद्यानुसार गुन्हा तर आहे शिवाय यामुळे महिलेचा जीवही धोक्यात येतो. तज्ज्ञ सांगतात की, वारंवार हार्मोनल इंजेक्शन्स घेतल्यामुळे संबंधित महिलेला कर्करोग, गर्भाशयाचे आजार किंवा कायमचे वंध्यत्व येण्याचा मोठा धोका आहे. तसंच अंडी काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान अंतर्गत रक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यूही होऊ शकतो.