नागपूर अमरावतीतल्या मेळघाटातील (Amravati Melghat)  कुपोषण (Malnutrition) आणि बालमृत्यूचा (Child Death Rate)  दर दहा वर्षांच्या तुलनेत कमी आहे परंतू बालमृत्यू आणि कुपोषण अजूनही संपलेलं नाही. एबीपी माझाच्या टीमने तीन दिवस मेळघाटातील धारणी, चिखलदरा या भागातील अनेक गावांना भेटी दिल्या. समृद्धी महामार्गापासून 100 ते 125 किमी असलेल्या मेळघाटातील अनेक गावात धड रस्ते नाहीत. जे रस्ते आहेत त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधाही नाहीत. मेळघाटातील सर्वात मोठ्या धारणी परिसरात आजही कुपोषणाची प्रकरणं सर्वाधिक आहे.  एप्रिलपासून नोव्हेंबर अखेरपर्यंत उप जिल्हा रुग्णालयात 43 बालकांचा मृत्यू झाला आहे.

 उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर म्हणाले, कुपोषणामुळे एकही बाळ दगावले नाही पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. कारण प्रत्येक आईसाठी बाळ महत्त्वाचे आहे. सध्याचा मृत्यू दर पाहिला तर सहा टक्के आहे. आमच्या रुग्णालयात उपचार शक्य नसेल तर आम्ही पालकांना त्यांना शहरात घेऊन जाण्याचा सल्ला देतो. मात्र पालक रुग्णलात घेऊन न जाता मुलांना घरी घेऊन जातात. मुलांना त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाही. रुग्णालयातील स्टाफ  देखील कमी  आहे. शासकीय रुग्णालयावर भार कमालीचा आहे. 

रोजगारासाठी स्थलांतर, मेळघाटातील बहुतेक गावांत 50 टक्क्यांहून अधिक घरांना टाळं 

दरम्यान रोजगार मिळत नसल्याने मेळघाटातील बहुतेक गावांत 50 टक्क्यांहून अधिक घरांना टाळं लागलंय. तेथील लोक कामधंद्याच्या शोधात मध्य प्रदेश, गुजरातला विस्थापित झालेत. या स्थलांतरामुळे कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. रोजगाराचा मोठा प्रश्न असल्याने स्थलांतर होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडी रोजगारासाठी सरकारने मनरेगा (महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी अॅक्ट) ही योजना आणली. मात्र आजही रोजगारासाठी स्थलांतर होत असेल तर रोजगार हमी योजना फोल ठरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. 

गरोदर महिलांना न मिळणारा सकस आहार हे एक कारण

बालके अधिक प्रमाणात कुपोषित असून येथील परिस्थिती चिंताजनक आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कुपोषणमुक्तीसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मात्र आदिवासी समाजातील लोकांचे स्थलांतर तसेच परिस्थितीमुळे गरोदर महिलांना न मिळणारा सकस आहार, यामुळे जन्माला येणारे बाळ कुपोषित जन्मते. तर अनेक वेळा त्याचा मृत्यूही होतो. कुपोषण आणि बालमृत्यूच्या नावाने कोट्यवधी निधी येतो. मात्र तिथपर्यंत तो पोहोचत नाही तसेच त्याची जनजागृती होत नाही. या परिसरात कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. 



Source link