फक्त पुरुषच मद्याचे सेवन करायचे तो काळ गेला. आता महिला देखील पुरुषांसोबत अगदी त्यांच्याप्रमाणेच मद्याचे सेवन करतात. भारतातील 8 अशी राज्ये जेथे महिला सर्वाधिक प्रमाणात दारु रिचवतात. एवढंच नव्हे तर भारतीय लोक प्रामुख्याने मद्याकडे आकर्षिक होतात. मग त्यामध्ये अगदी Gen X, मिलेनियल्सते Gen Z पर्यंत सगळ्या स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. भारताच्या 8 राज्यांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत सर्वाधिक दारु पितात असं सर्वेक्षणात आढळले आहे. महिलांचा मद्य प्राशनाकडे असलेल्या ओढीची अनेक कारणे आहेत. म्हणजे यामध्ये आदिवासी परंपरा ते अगदी बदलती जीवनशैली, वाढता ताण एवढंच नव्हे तर शहरीकरण, वाढती आर्थिक स्वातंत्र्य या सगळ्याचा समावेश आहे.
महिलांकडे आतापर्यंत सोज्वळ, मनमिळावू, घर सांभाळणारी अशा दृष्टीकोनातून पाहिलं आहे. हळूहळू महिला पुरुषांप्रमाणे घराबाहेर पडल्या यानंतर पुरुषांची मक्तेदारी असलेल्या किंवा पुरुषांचा ओढा असलेल्या मद्य प्राशन करण्याकडे त्यांचा कल वाढला. भारतातील कोणत्या राज्यात याचे प्रमाण वाढले ते पाहूया.
अरुणाचल प्रदेश
ज्या राज्यात मद्यपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे, ते राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश. या राज्यातील 24.2% महिला मद्यपान करतात. अरुणाचल प्रदेशमध्ये मद्यपानाची संस्कृतीच आहे. जसे की, पाहुण्यांना ‘अपोंग’ म्हणजे तांदळापासून बनवलेली बिअरसारखे पेय दिले जाते. म्हणजे या राज्यात आदराने दारु दिली जाते.
सिक्कीम
सिक्कीममध्ये मद्यपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त असून हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. सिक्कीममधील १६.२% महिला मद्यपान करतात आणि हे राज्य स्वतःच घरगुती मद्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. येथील सर्वात प्रसिद्ध पेय म्हणजे ‘छांग’ (Chhaang)—एक प्रकारचे आंबवलेले बाजरीचे मद्य. छांग हे पारंपरिकरीत्या घरीच तयार केले जाते आणि सण-उत्सव, सामाजिक कार्यक्रमात याचे सेवन केले जाते.
आसाम
2025 च्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये 7.3 टक्के महिला मद्याचे सेवन करतात. राज्यातील आदिवासी समुदायांमध्ये मद्यनिर्मिती आणि मद्यपानाची दीर्घकालीन परंपरा आहे. येथे ‘व्हिस्की’ हे सर्वात प्रसिद्ध मद्य आहे. या वाढीव प्रमाणावर सांस्कृतिक प्रथांचा, विशेषतः आसाममधील आदिवासी समुदायांमधील प्रथांचा प्रभाव आहे.

तेलंगणा
तेलंगणामधील 6.7% महिलांना मद्यपान करायला आवडते. यामुळे या यादीत तेलंगणाचा क्रमांक चौथा लागतो. येथे शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये मद्यपानाचे प्रमाण अधिक आहे आणि व्हिस्की व बिअर हे सर्वाधिक पसंतीचे पर्याय आहेत.
झारखंड
झारखंडमध्ये 6.1% महिला मद्यपान करतात. ‘जर्नल ऑफ आदिवासी अँड इंडिजिनस स्टडीज’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, ही बाब प्रामुख्याने उपेक्षित आदिवासी भागांमध्ये दिसून येते. कामाची संधी फार नसल्यामुळे लोक मद्यव्यसनाकडे, आणि विशेषतः महिला मद्यविक्रीकडे वळतात.
अंदमान-निकोबार
अंदमान आणि निकोबार हे आयलंड आहे. या ठिकाणी 5 टक्के महिला मद्यप्राशन करतात. हांडिया, तो़ी आणि जंगली हे तेथील स्थानिक आणि पारंपरिक पेय आहे.
छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये 4.9 टक्के महिला दारुचं सेवन करतात. व्हिस्की, वोडका यांना महिलांची मोठ्या प्रमाणात पसंती आहे. येथे महिलांची पसंती दारु पिण्याकडे असल्यामुळे याचं प्रमाण वाढलं आहे.

महाराष्ट्र
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात केवळ 0.2 टक्के महिला दारु पितात. शहरी भागातील महिलांचे प्रमाण हे 0.3 टक्के आहे तर ग्रामीण भागात हे प्रमाण अल्प आहे. मात्र धुळे जिल्ह्यात दारु पिणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 38.2 टक्के आहे. धुळे हा एक आदिवासीबहुल जिल्हा आहे. अनेक आदिवासी समुदायांमध्ये स्थानिकरीत्या तयार केलेली ‘महुवा’ किंवा ‘ताडी’ यांसारखी पेये सांस्कृतिक परंपरांचा भाग मानली जातात. सण, उत्सव किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये महिलांनी मद्यपान करणे हे तिथे सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह मानले जाते.
महिलांनी मद्यप्राशन केल्यामुळे त्यांच्या शरीरावर सर्वाधिक प्रमाणात परिणाम जाणवतो. आरोग्याच्या दृष्टीकोनातून जास्त नुकसान होत असल्याच संशोधनात दिसून आले आहे. महिलांच्या शरीरावर काय होतो परिणाम?
शारीरिक परिणामांची कारणे
अल्कोहोल डिहायड्रोजनेज (ADH) ची कमतरता: महिलांच्या शरीरात मद्य पचवण्यासाठी आवश्यक असलेले ADH नावाचे एन्झाईम पुरुषांच्या तुलनेत कमी असते. यामुळे दारू शरीरात लवकर शोषली जाते आणि रक्तप्रवाहात जास्त काळ राहते.
पाण्याचे प्रमाण: महिलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी आणि चरबीचे (Fat) प्रमाण जास्त असते. अल्कोहोल पाण्यात विरघळते, त्यामुळे महिलांच्या शरीरात ते अधिक एकवटलेले (Concentrated) राहते. NIH ने दिलेल्या माहितीनुसार
प्रमुख आरोग्य समस्या
यकृताचे आजार (Liver Diseases): महिलांमध्ये यकृताची जळजळ (Hepatitis) आणि सिरोसिस होण्याचा धोका पुरुषांच्या तुलनेत कमी कालावधीत आणि कमी प्रमाणात मद्यपान करूनही जास्त असतो.
कर्करोगाचा धोका: नियमित मद्यपानामुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. तसेच तोंड, घसा आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोकाही संभवतो.
हृदयविकार: अति मद्यपानामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता महिलांमध्ये अधिक असते.
मेंदूवर परिणाम: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दारूमुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान वेगाने होते, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. pmc ने दिलेल्या माहितीनुसार
प्रजनन क्षमता आणि मासिक पाळी
प्रजनन समस्या: दारूमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडून वंध्यत्व (Infertility) येण्याची शक्यता असते.
मासिक पाळी: मद्यपानामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते किंवा पाळीदरम्यान अधिक त्रास होऊ शकतो.
गर्भावस्था: गरोदरपणात मद्यपान केल्यास गर्भातील बाळाच्या विकासावर गंभीर परिणाम होऊन ‘फेटल अल्कोहोल सिंड्रोम’ सारखे आजार होऊ शकतात.