HSC Exam: सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. याच परीक्षेला एक नवमाता आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन आली. काहीही झालं तरी परीक्षा चुकवायची नाही, अशी तिची जिद्द. तर दुसरीकडे आपली जन्मदात्री सोडून गेली.तिचं पार्थिव घरी असतानाही तिचंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारावीच्या पेपरला गेलेली शालिनी या दोन्ही मुलींना नव्या पिढीला नवा संदेश दिलाय.
बाळाला पाळण्यात घालून त्याला जोजवणारी आई 12 वीच्या परीक्षेला आली होती. हे पाहून साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं. नांदेडमधल्या बसवेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेणा-या शीतल चित्ते प्रसूतीनंतर अवघ्या चार दिवसात शरीराची साथ नसताना बारावीचे पेपर लिहितेय. केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही नवमाता बारावीची परीक्षा द्यायला परीक्षा केंद्रावर पोहोचली. काहीही झालं तरी शिक्षण थांबणार नाही, असा संदेश तिने असंख्य मुलींना दिलाय.
बाळाला जन्म दिल्यानंतर शारीरिक परिस्थिती पाहता, नवमातेनं किमान सात दिवस तरी घराबाहेर पडू नये, असं डॉक्टर सांगतात. पण शिक्षणाची तळमळ, प्रबळ जिद्द आणि परिस्थितीवर मात करण्याची ताकद असेल तर कोणतंही स्वप्न अपूर्ण राहत नाही, असा संदेश ती देतेय. यात तिच्या पती आणि सासरच्या कुटुंबीयांनी तिला भक्कम साथ दिली.
4 दिवसांच्या बाळाला घेऊन परीक्षा
18 वर्ष पूर्ण होताच आई वडिलांनी लवकर लग्न लावून दिलं.पण शिक्षणात खंड नको म्हणून 20 वर्षांच्या शीतलनं 12 वी करण्याचा निर्णय घेतला.. त्यात ती गरोदर राहिली. 6 फेब्रुवारीला शीतलची प्रसूती झाली. 10 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार होती. पण या अवस्थेतही परीक्षा देण्यावर शीतल ठाम राहिली. अवघ्या चार दिवसांच्या बाळाला सोबत घेऊन ती परीक्षा केंद्रावर आली. परीक्षा केंद्रावर उपस्थित शिक्षक आणि कर्मचा-यांनीही त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं. तिच्यासाठी खास मातृस्नेह कक्ष निर्माण केला.
आईचा परीक्षेच्या दिवशी मृत्यू
दुसरी एक घटना गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातल्या तुमखेडमधली आहे.गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या शालिनीच्या आईचा परीक्षेच्या दिवशी मृत्यू झाला. मायेचा आधार गेला. पण त्या कोलमडलेल्या परिस्थितही आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शालिनीनं परीक्षा दिली.त्यानंतर साश्रू नयनांनी आईला निरोप दिला. प्रसुतीनंतर चार दिवसांनी तान्हुल्याला घेऊन परीक्षा देणारी शीतल असो किंवा आईचं पार्थिव घरात असताना बारावीचा पेपर द्यायला गेलेली शालिनी असेल. या दोघीही खूप काही शिकवून जातायत. दोन्ही घटनांमध्ये आईचं प्रेम आणि शिक्षणाचा ध्सास दिसतोय.