Maharashtra Weather News : कमाल तापमानात सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळं महाराष्ट्रावर सूर्य कोपल्याचंच मत सामान्यांनी बनवलं आहे. राज्याच्या विदर्भ आणि उत्तर भागासह मरावाड्यातही कुठे पारा चाळीशीपार किंवा कुठे पारा चाळीशीचा आकडा गाठताना दिसत आहे. परिस्थिती इतकी भयंकर आहे, की राज्यातील गिरीस्थानांवरही तीव्र सूर्यकिरणांचा मारा होत असल्या कारणानं नागरिकांची होरपळ सुरू आहे. 

एप्रिल महिन्याचा शेवट खुणावत असताना वाढलेल्या या होरपळीतून आता नेमका दिलासा कधी मिळणार याचीच प्रतीक्षा अनेकांना लागली आहे. पण, हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज पाहता इतक्यात दिलासा मिळणार नसल्याचच स्पष्ट होत आहे. पुढील 24 तासांसाठी राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सध्या हिमालयात नव्यानं पश्चिमी झंझावात सक्रिय असून, राजयस्थानच्या वायव्य भागापासून आणि समुद्रसपाटीपासून 1.5 किमी अंतरावरील उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. परिणामी मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक, केरळ, तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्यामुळं पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होण्याची चिन्हं आहेत. राज्यात सध्यातही मुसळधार पावसाचा इशारा नसून, आकाश मात्र ढगाळ राहील असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेसोबतच दमट वारे अडचणी वाढवणार असून, कोकण आणि मुंबई शहर उपनगरांमध्येही हे दमट हवामान अडचणी वाढवणार आहे. हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळं उष्मा आणखी जाणवत त्यामुळंही अडचणी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. मुंबई शहरात तापमानाचा आकडा 34 ते 37 अंशांदरम्यान असलं तरीही इथं आर्द्रतेमुळं उष्ण वारे अधिकच तीव्रतेनं शहराची भट्टी करताना दिसत आहेत. त्यामुळं पुढील 48 तासांमध्ये नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. 





Source link