Murtijapur Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यातील एकमेव राखीव असलेला विधानसभेचा एकमेव  मतदारसंघ म्हणजे मुर्तीजापूर….मुर्तीजापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महाराष्ट्र निर्मितीनंतर एक अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देणारा मतदारसंघ…. कधीकाळी काँग्रेसचा सूर्य या मतदारसंघातून मावळत नव्हता असे बोलले जायचे. मात्र, 1990 च्या दशकात प्रकाश आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’ आणि भाजपचा या मतदारसंघाच्या राजकीय पटलावर उदय झाला. अन काँग्रेसही येथून हद्दपार झालीय. अन 1995 पासून 2004 चा अपवाद वगळता भाजपने या मतदारसंघावरील आपला प्रभाव कायम ठेवलाय. विशेष म्हणजे भाजपला भारिप-बहुजन महासंघ, काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीतील मतविभाजनाच्या जोरावरच येथे ताकद वाढवता आली आहे. 2009 पासून गेल्या तीन निवडणुकांत भाजपचे हरीश पिंपळे हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, सध्या आमदार पिंपळे यांना मोठ्या पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहे. सध्याही भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकिटांसाठी राजकीय साठमारी सुरु झाली आहे. 

मुर्तिजापूर मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे हरीश पिंपळे 1,910 मतांनी विजयी

उमेदवार                   पक्ष             मते 
हरिश पिंपळे             भाजप       59527
प्रतिभा अवचार          वंचित        57617
रविकुमार राठी          राष्ट्रवादी      41155

मुर्तिजापूर मतदारसंघातील एकुण मतदारसंख्या : 

स्त्री : 151121
पुरूष : 158629
तृतीयपंथी : 05
एकूण : 309755

विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे ही स्पर्धा पाहता 2019 च्या निवडणुकीच्या वेळी उमेदवार या मतदारसंघात रिंगणात होते त्याहीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी विविध उपक्रम हाती घेतले असून यावेळी ‘मै हु ना’ अशी ग्वाही देत मतदारसंघात जनसंपर्क सुरू केल्याचे दिसत आहे  त्यामुळे मुर्तीजापुर मतदारसंघातील राजकारण चांगलंच तापल्याचं चित्रं आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपाचे हरीश पिंपळे यांनी फक्त 1910 मतांनी हा मतदारसंघ राखत तिसऱ्यांदा विजयश्री प्राप्त केली होती. मात्र, चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जातांना त्यांचा पहिला संघर्ष असेल तो तिकीट मिळविण्यासाठी. त्यानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोधाला मोठं तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या अनुप धोत्रेंना काँग्रेसपेक्षा 8147 मतांची आघाडी मिळाली होती. 

या मतदारसंघात पिंपळे यांच्याशिवाय भाजपचे मातंग समाजाचे नेते आणि लहूशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, पंकज सावळे, संघपरिवारातील मनोहर हरणे, राजश्री बोलके यांच्या नावाची चर्चा आहे. या मतदारसंघात भाजपनंतर सर्वाधिक चुरस आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये. येथे पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठीच्या स्पर्धेतून प्रत्येक इच्छूकाने मोठं शक्तिप्रदर्शन केलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रमुख इच्छुकांमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती सम्राट डोंगरदिवे, मागच्या निवडणुकीतील उमेदवार रवी राठी, अकोल्यातील पक्षाचे युवानेते आनंद उर्फ पिंटू वानखडे,  गजानन भटकर आणि अमरावतीचे उद्योजक तेजस जामठे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर इच्छूक आहेत. 
   
2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या वेळच्या वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांचा 1910 मतांनी थोडक्यात पराभव झाला होता. त्यामूळे वंचितकडूनही इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र, वंचितकडून प्रामुख्याने मूळचे अकोल्यातील असलेले मुंबईतील प्रख्यात बांधकाम व्यवसायिक डॉ. सुगत वाघमारे यांना उमेदवारी जाहीर करत सर्वात आधी उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. 

 या मतदारसंघात सध्या आमदार हरीश पिंपळे यांच्यासाठी अतिशय आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थिती आहे. यात त्यांना चौथ्यांदा तिकीट मिळतं का?. मिळालं तर ते ‘अँटी ईन्कमबंसी’चा कसा सामना करतात?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..



Source link