Shiv Jayanti 2025: आज 19 फेब्रुवारी… आजच्याच दिवशी महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आज संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण आहे. शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. आजवर शिवाजी महाराजांवर अनेक काव्य, पोवाडा रचले आहेत. पण तुम्हाला माहितीये का छत्रपती शिवाजी महाराजांवर एक आरतीदेखील रचण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांनी रचलेली एकमेव आरती आहे. हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ही कवितादेखील सावरकरांनी रचलेली आहे. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडेदेखील रचले आहे. मात्र सावरकरांनी रचलेल्या या आरतीबद्दल फार कमी जणांना ठावूक आहे. हृदयनाथ मंगेशकर यांच्या शिवकल्याण राजा या म्युझिक अल्बममध्ये लता मंगेशकर यांनी ही आरती गायली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर सावरकरांनी रचलेली एकमेव आरती
जयदेव जयदेव जय जय शिवराया l
या या अनन्य शरणा आर्यां ताराया llधृll
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला l
आला आला सावध हो भूपाला l
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला l
करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला llधृll
श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी l
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी l
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता l
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता llधृll
त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो l
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो l
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया l
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या llधृll
ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला l
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला l
देशास्तव शिवनेरी घेई देहाला l
देशास्तव रायगडी ठेवी देहाला l
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला l
जय देव जय देव जय जय शिवराया l
बोला छत्रपती शिवाजी महाराज की … जय ll