Maharashtra Traffic Rules: वाहतूक पोलिसांनी तपासणीवेळी अचानक तुमच्या बाईकची चावी काढली तर अशा परिस्थितीत तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही अशी अनेक प्रकरण पाहिली असतील ज्यात वाहतूक पोलिस असे करतात. अशा परिस्थितीत काय करायचे, असे करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? नसेल तर मग आपण काय करायला हवे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पोलिसांकडून जर असे केले गेले तर तुम्ही काय करायला हवे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, वाहतूक पोलिसांना बाईकची चावी काढण्याचा अधिकार नाही. पण तुमच्यासोबत असे झाल्यास तुम्ही वाहतूक पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकता. बाईकची चावी फक्त विशेष परिस्थितीतच काढता येते. जर तुमच्या बाईकची चावी काढली असेल तर या गोष्टी करा.
शांत राहा
सर्वप्रथम शांत राहा आणि पोलिसांशी आदराने बोला. त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा.
कारण जाणून घ्या
तुमची चावी का काढली गेली आहे आणि तुम्ही कोणता नियम मोडला आहे हे पोलिसांना विचारा. हे जाणून घेणे महत्वाचे आहे. ज्यामुळे तुम्ही कोणती चूक केलीय, हे तुम्हाला समजेल.
दंड भरा
जर तुम्ही कोणत्याही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्हाला चलन काढावे लागेल आणि दंड भरावा लागेल.
तक्रार दाखल करा
जर तुम्हाला वाटत असेल की पोलिसांनी तुमच्या वाहनाची चावी बेकायदेशीरपणे आणि चुकीच्या पद्धतीने काढून घेतलीय तर तुम्ही संबंधित पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता. किंवा उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.