Vidarbha Weather Update : गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सूननं (Monsoon) राज्यासह विदर्भापर्यंत (Vidarbha) मजल मारली असल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र अद्याप विदर्भात दमदार पावसाची प्रतिक्षाच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, उष्णतेचा पारा सरासरीपेक्षा वरच असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. राज्यात बहुतांश भागात पावसाने दमदार एंट्री केली असली तरी विदर्भात अद्याप पावसाने दांडी दिल्याने नेमका पाऊस गेला तरी कुठे? असा प्रश्न या निमित्याने विदर्भवासियांना पडला आहे. तर दुसरीकडे शेतीतीत पेरणीसाठी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. अशातच नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (Monsoon Arrived in Vidarbha) आज पासून पुढील पाच दिवस विदर्भाला यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या आठवड्यात तरी पाऊस हजेरी लावतो का? या कडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट
जून हा पावसाचा महिना आहे. मात्र, आता जून महिन्याचा मध्यान्ह लागला असला तरी निम्या विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात मान्सूनचं अजूनही आगमन झालेलं नाही. परिणामी प्रखर उष्णता आणि उन्हाच्या झळा अजूनही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा अजूनही 40 अंशांच्यावर असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडे ठाक झाले आहेत. तर, विदर्भातील अनेक तलावांच्या पाण्याच्या पातळीनेही अगदी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्यांना देखील आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अशातच हवामान विभागाने विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 16 जून ते 20 जून दरम्यान विदर्भात विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
योग्य पावसाशिवाय पेरणीची घाई करू नये, कृषी अधीक्षकांच आवाहन
गेल्या चार-पाच दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे, यामध्ये खामगाव, शेगाव, देऊळगावराजा, चिखली, जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 70 मिलिमीटर पाऊस पडलेला आहे, त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे, तर इतर तालुक्यांमध्ये अजूनही कमी पाऊस पडल्याने शेतकरी आता पेरणी योग्य पावसाची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे शंभर मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
वीज पडून शेतमजुराचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यात शुक्रवारच्या सायंकाळच्या सुमारास अचानकपणे विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. यावेळी शेतात काम करीत असलेल्या शेतमजुराच्या अंगावर वीज कोसळल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील टाकळी भोसा या गावात घडली. कचरू नामदेव ढेंगे असं मृतक शेतमजुराचं नाव आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..