Akola Lok Sabha Election 2024: अकोला : देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. अकोला मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) उमेदवारीनं राज्यभरात चर्चेत राहणारा मतदारसंघ समजला जातो. अशातच अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं आहे. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यानं अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज (15 जानेवारी 2024) वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंना अकोल्याची जागा तुम्ही मागणार का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी अकोल्याची जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, असं मोठं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे. तसेच, प्रकाश आंबेडकरांना तुमचा पाठिंबा आहे का? असं विचारलं असता, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्यास, आम्हीही त्यांना पाठिंबा देऊ, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.
रामदास आठवलेंनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीला टोलाही लगावला आहे. प्रकाश आंबेडकरांनी दिलेला बारा बारा जागांचा फॉर्म्युला महाविकास आघाडीनं स्विकारावा, असा सल्ला आठवलेंनी दिला आहे. तसेच, जर त्यांनी प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला स्विकारला, तर आम्हाला त्यांचे बारा वाजवण्यात यश येईल, असा टोला रामदास आठवलेंनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी ‘कन्फर्म’
महाविकास आघाडीशी प्रकाश आंबेडकरांच्या संभाव्य आघाडीवर या मतदारसंघातील निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. कारण प्रकाश आंबेडकर काँग्रेसशी युती असतांना 1998 आणि 1999 च्या निवडणुकीत येथून विजयी झालेत. ही आघाडी झाली तर प्रकाश आंबेडकरच आघाडीचे उमेदवार असतील. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा समावेश ‘महाविकास’ आणि ‘इंडिया अघाडी’त होतो की नाहीय?, ही शक्यता सध्या अधांतरी आहेत. आंबेडकर जरी लढणार असले तरी ते एकटे लढतात की महाविकास आघाडीत यावर निवडणुकीचं चित्र ठरणार आहे.
अकोल्यात संभाव्य लढतीचं चित्र अद्याप अस्पष्टच
प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित’चा समावेश ‘महाविकास’ आणि ‘इंडिया अघाडी’त होतो की नाही?, समावेश न झाल्यास अकोला लोकसभा काँग्रेस किंवा ठाकरे गटाच्या वाट्याला येणार?, की आघाडी न झाल्यानंतरही महाविकास आघाडी न मागता आंबेडकरांना पाठींबा देणार?, या सर्वच शक्यता सध्या अधांतरी आहेत. त्यासोबतच धोत्रे आजारी असल्याने भाजपला नवा उमेदवार द्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. आंबेडकर जरी लढणार असले, तरी ते एकटे लढतात की महाविकास आघाडीत यावर निवडणुकीचं चित्र ठरणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार या मुद्द्यांवर संभ्रमाचं वातावरण असल्यानं अकोल्यातील संभाव्य लढतीचं चित्र अद्यापही अस्पष्टच आहे. मात्र, 2024 चा लोकसभेचा अकोल्यातील रणसंग्राम राज्यासाठी औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
‘अकोला पॅटर्न’ची आठवण करून देणारा मतदारसंघ
अकोला लोकसभा मतदारसंघ राज्यातील एक अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे. कारण या मतदारसंघाने राज्याला नेहमीच एक नवा विचार आणि दिशा दिली आहे. राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या हा मतदारसंघ असल्याने राज्याच्या राजकारणात देखील ‘केंद्रबिंदू’ समजला जातो. 1990 च्या दशकात राज्यभरात गाजलेला प्रकाश आंबेडकर यांच्या ‘अकोला पॅटर्न’ याच जिल्ह्यात जन्माला आलेला. अलीकडे ‘सोशल इंजीनिअरिंग’ हा रूढ झालेला राजकीय विचार याच काळात प्रकाश आंबेडकरांनी अठरा पगड जातींना सोबत घेत यशस्वी करून दाखविला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :