अमरावती : महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता परीक्षा (सेट) अथवा राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) आवश्यक आहे. मात्र, अमरावती (Amravati) विभागात काही जणांनी बनावट नेट-सेट प्रमाणपत्राच्या आधारे सहयोगी प्राध्यापक पदाची नोकरी बळकावल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आलीये. अमरावती आणि नागपूर विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक असे 33 जणांकडे बनावट नेट-सेट प्रमाणपत्र असल्याची माहिती समोर आली. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात तब्बल 19 प्राध्यापकांचे नेट-सेट प्रमाणपत्र बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे पत्र अमरावती विद्यापीठाला प्राप्त झाले. यातील एक सहयोगी प्राध्यापकांचे नेट प्रमाणपत्र बनावट असल्याचे यामधून निष्पन्न झाले.  त्यानुसार नेट-सेट प्रमाणपत्राची माहती विद्यापिठाकडून महाविद्यालयाने मागवलीये.  अमरावती, नागपूर आणि नांदेड विद्यापीठातील तब्बल 69 प्राध्यापकांचे नेट-सेट बनावट असल्याची माहिती मिळत असल्याने राज्यात मोठा रॅकेटच काम करत असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येतेय. 

बोगस प्रमाणपत्र युजीसीकडे सादर

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या कामरगाव येथील कला विज्ञान महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले शारीरिक शिक्षक तथा सहयोगी प्राध्यापक सुरेंद्र तुळशीरामजी चौहान यांचे नेट प्रमाणपत्र बोगस असल्याचा अहवाल यूजीसीने विद्यापीठाकडे सादर केला.  त्यामुळे प्राध्यापक चौहान यांचे नेट प्रमाणपत्र फेक असल्याचे उघड झाले.  प्राध्यापक चौहान यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे निर्देश यूजीसीने दिलेत. त्यानुसार प्राचार्य जाणे यांनी तक्रार दाखल करण्यासाठी धनज पोलीस स्थानकात धाव घेतली. परंतु येथील ठाणेदार योगेश इंगळे हे 27 नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर असल्याने प्रभारी ठाणेदारांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे 28 नोव्हेंबरला प्राध्यापक चौहान यांचे विरुद्ध धनज पोलिसात तक्रार दाखल  करणार असल्याची माहिती प्राचार्य जाणे यांनी दिली.

महाविद्यालयाने प्रमाणपत्राची पडताळणी केली नाही? 

चौहान यांनी डिसेंबर 2004 मध्ये फिजिकल एज्युकेशन नेट परीक्षा प्रमाणपत्र जोडून ही नोकरी मिळविली असून आता ते प्रमाणपत्र फेक असल्याचे उघड झालय. त्यामुळे त्यांनी बनावट प्रमाणपत्र कसे मिळविले असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. शिवाय विद्यापीठ आणि महाविद्यालयाने नेट प्रमाणपत्राची पडताळणी न करता सहयोगी प्राध्यापक पदाला मान्यता दिली कशी प्रश्न देखील महाविद्यालयाला विचारण्यात येतोय. त्यामुळे या प्रकरणात महाविद्यालयाकडून प्राध्यापकांवर आणि युजीसीकडून महाविद्यालयांवर कोणती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा : 

Maratha Reservation : शिंदे समितीने घेतला अमरावती विभागाचा आढावा, कुणबी प्रमाणपत्रासाठी जुनी अभिलेखे तपासण्याचे निर्देशSource link