Devendra Fadnavis मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाकडून सध्या बड्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासणीचं काम सुरू आहे. थेट हेलिपॅडवरच निवडणूक आयोगाचे कर्मचारी बॅगा तपासतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान याच मुद्यावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान याच मुद्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर टीका करत खडे बोल सुनावले आहे.
बॅगा तपासण्याच्या मुद्द्यावरून विरोधक कारण नसताना राजकारण करताय. माझ्यासह मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देखील बॅगा नियमित तपासल्या जातात. मात्र आम्ही कधी या गोष्टीचा कांगावा केला नाही. ज्या पद्धतीने बॅगा तपासणाऱ्यांना बोललं जातं त्यावरून विरोधकांच्या बुद्धीची किंवा येते.असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथे प्रतिक्रिया देत या मुद्द्यावर भाष्य केलंय.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यवतमाळमधील वणी मतदारसंघात आणि लातूरच्या औसा मतदारसंघातील सभेसाठी जात असताना त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्याचा व्हिडिओ स्वत: शूट केला होता. तसेच, ज्याप्रमाणे माझ्या बॅगा तपासल्या तशाच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासा. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बॅगा तपासल्याचे व्हिडिओही मला पाठवा, असेही त्यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या व्हिडिओनंतर आता पालघर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याही बॅगांची झाडाझडती घेण्यात आली आहे. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
निवडणूक आयोगाचा अधिकार, यात सरकारचा काय संबंध?- रामदास आठवले
तर दुसरीकडे बॅगा तपासणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, त्यात सरकारचा काय संबंध, माझी आणि देवेंद्र फडणवीस यांचीही बॅग तपासली. असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
सध्या प्रचाराला फिरणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांच्या विमानातील आणि हेलिकॉप्टर मधील बॅग तपासणीवरून वादविवाद सुरू असताना आज रामदास आठवले यांनी यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. निवडणूक काळात बॅगा तपासणी हा निवडणूक आयोगाचा अधिकार असून यात सरकारचा काय संबंध, असा सवाल करीत एकट्या उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली नसून माझी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासल्या असल्याचे आठवले यांनी सांगितले.
माझ्या बॅगेत काय सापडणार?
प्रचाराला विमान, हेलिकॉप्टर गाड्या घेऊन फिरताना त्यामधील सामान तपासणी करणे हे निवडणूक अधिकाऱ्यांचे काम आहे, असे सांगत जरी बॅग तपासली तरी माझ्या बॅगेत काय सापडणार? अशा शब्दात आठवले यांनी खिल्ली उडवली. चार दिवसापूर्वी लातूरला गेले असता तिथे फडणवीस आणि माझी बॅग तपासली. आज सोलापुरात आल्यावर हेलिकॉप्टर मधून उतरताच तेथेही माझ्या बॅगेची तपासणी झाली, असे आठवले यांनी सांगितले.
निवडणुका झाल्यावर आमदार, मंत्रीपद, महामंडळ देण्याचे मान्य
आज सांगोला येथे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारासाठी आले असता आठवले माध्यमांशी बोलत होते. लोकसभेला आणि विधानसभेला तीन मोठे पक्ष एकत्र आल्याने आम्हाला जागा मिळाल्या नाही. जागा मिळायला हव्या होत्या पण त्या दिल्या नाही. निवडणुका झाल्यावर आमदार मंत्रीपद, महामंडळ देणार असल्याचे मान्य केला आहे. आणि हे पद कार्यकर्त्यांना मिळण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे ही आठवले यांनी सांगितले.
हे ही वाचा
अधिक पाहा..