Vidarbha Weather Update नागपूर : सूर्यानं 25 मे पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नव तपाला (Nautapa 2024) सुरुवात झाली आहे. नव तपाच्या पहिल्या दिवसापासूनच विदर्भात (Vidarbha) विक्रमी तापमानाची नोंद (Temperature) झाली आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 45 ते 47 अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे नव तपाचे पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत. हवामान विभागानेही 29 मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. तर यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भातील ब्रह्मपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.
नागपूर वेध शाळेने विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ,वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भातील तापमान चढेच राहील. परिणामी, वैदर्भीय जनतेने उष्माघातापासून बचाव करण्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
ब्रह्मपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज ब्रह्मपुरीमध्ये 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नागपूरमध्ये 45.6 अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानाची नोंद झाली. 45.6 अंश हे नागपुरातील या मोसमातील उच्चांकी तापमान आहे. विदर्भातील जवळ जवळ सर्वच जिल्ह्यामध्ये आज कमाल तापमान जास्त नोंदवलं गेलं आहे.
तर चंद्रपुरात आज 44.8 अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे. ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर या दोन्ही शहरात आज मौसमातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. तर पुढील काही दिवस पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे. तर दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासन आणि नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
उष्णतेच्या लाटेनं वैदर्भीयांचे पुरते हालेहाल
सध्या फक्त विदर्भातच नाही राज्यात अन् देशात सर्वत्र उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठत आहे. वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या दिवसा सूर्यदेवाचा कोप इतका असतो की, लोकांना घरातून बाहेर पडणेही कठीण होत आहे.
फक्त दुपारीच नाही तर सकाळपासूनच उन्हाचा पारा एवढा वाढलेला असतो की, लोकांना घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करावा लागत आहे. परिणामी अनेक शहरात दुपारच्या वेळी मुख्य रस्त्यांवरही भयाण शांतात बघायला मिळत आहे. तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरही उष्ण वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेनं वैदर्भीयांचे पुरते हालेहाल केल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..