Gadchiroli-Chimur Lok sabha 2024: गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ… निबिड, घनदाट अरण्याचा प्रदेश… गडचिरोलीतील 3, चंद्रपूरमधील 2 आणि गोंदिया जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ… दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळं कायम मागास जिल्ह्यांच्या यादीत समावेश असलेला हा भाग… भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असेला हा प्रदेश गेल्या अनेक वर्षात गडचिरोली अन् विकास यांचा संबध तुटला आहे. प्रशासन आणि व्यवस्था यांच्यात गुरफटलेला हा भाग कधी विकासाच्या रुळावर आलाच नाही.
गडचिरोली चिमूर… समस्या भरपूर
इथं फोफावलेला नक्षलवाद विकासाच्या वाटेतला सर्वात मोठा अडसर ठरतोय. उद्योगविहीन असा हा भाग, मात्र सुरजागड लोह खनिज खाण, चुंबक खाणी, स्टील आणि स्पॉन्ज आयर्न उद्योग लवकरच सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. आदिवासीबहुल भाग, वनसंवर्धन कायद्यामुळे सिंचन सोयी नसल्यात जमा आहेत. वाघ, बिबट आणि रानटी हत्तींमुळं मानव आणि वन्यजीव संघर्ष हा दैनंदिन जगण्याचा भाग झालाय. शासकीय मेडिकल कॉलेज अजून कागदावरच असल्यानं आरोग्य सुविधांची बोंब आहे. वडसा हे एकमेव रेल्वे स्टेशन गडचिरोली चिमूरमध्ये आहे.
गडचिरोलीचं राजकीय गणित
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2008 मध्ये हा गडचिरोली चिमूर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. राजकीयदृष्ट्या दीर्घकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता भाजपचं कमळ इथं चांगलंच फुललंय. 2009 मध्ये काँग्रेसच्या मारोतराव कोवासे यांनी भाजपच्या अशोक नेतेंचा २८ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र 2014 मध्ये भाजपच्या अशोक नेते काँग्रेसच्या नामदेव उसेंडींना धूळ चारून खासदार झाले. 2019 मध्ये याच निकालाची पुनरावृत्ती झाली. नेतेंनी दुसऱ्यांदा उसेंडींना पाणी पाजलं. विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर भाजपचे 3, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 आमदार आहे.
मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी लोकसभेच्या रणांगणात उतरावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं जोर लावला. मात्र भाजपनं विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी विद्यमान खासदार अशोक नेतेंना पुन्हा उमेदवारी दिलीय. तर दुसरीकडं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं होमपीच असलेल्या मतदारसंघात त्यांनी नामदेव किरसान यांच्यासाठी तिकीट खेचून आणलं. किरसान यांच्या उमेदवारीमुळं नाराज झालेले काँग्रेस नेते नामदेव उसेंडी यांनी भाजपात प्रवेश करून बंडाचा झेंडा फडकवला. गेल्यावेळी वंचितच्या रमेश गजबेंनी इथून लाखभर मतं घेतली होती. यंदा वंचित बहुजन आघाडीनं हितेश मडावी यांना उमेदवारी दिलीय. तरीही थेट लढत भाजपचे नेते आणि काँग्रेसचे किरसान यांच्यातच होणार आहे.