अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील ‘अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी’च्या सोयाबीन खरेदीत घोटाळा उघडकीस आला. ज्यात सुमारे 63 लाख 44 हजार 924 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यात तब्बल 1297 क्विंटल सोयाबीनची खरेदी न करता नाफेडच्या पोर्टलवर नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात कंपनीच्या संचालकांसह 12 जणांविरुद्ध आर्थिक व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबविल्याने ही कंपनी जिल्ह्यात नावारूपास आली. शेतकरी उत्पादक कंपनीला बदनाम करण्यासाठीच काही व्यापारी, पणन विभागाचे काही अधिकारी आणि कंपनीतील काही भ्रष्ट प्रवृत्तींनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप शेतकरी कंपनीने केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण? 

अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथील सोयाबीन खरेदी घोटाळा सध्या राज्यभरात गाजतो आहे. यात खरेदी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेली ‘अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी’ सध्या अडचणीत आलीये. याला कारण ठरलंय कंपनीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर झालेला गैरव्यवहार. कंपनीने 15 फेब्रुवारीनंतर एकूण 19723.92 क्विंटल सोयाबीन खरेदी केलेय. मात्र ‘नाफेड’च्या (NAFED) गोदामात केवळ 18426.92 क्विंटल माल जमा झालाय. उर्वरित 1297 क्विंटल सोयाबीनची फक्त कागदोपत्री ऑनलाईन खरेदी झाल्याचं समोर आलंय. 

शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरेदी केंद्रावर 68 शेतकऱ्यांच्या नावावर सुमारे 63 लाख 44 हजार 924 रूपयांनी शासनाला चुना लावण्यात आलाय. नाफेड’मार्फत पणन विभागाच्या माध्यमातून शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने शेतकऱ्यांकडून सोयाबीन, हरभरा, तूर, मूग, उडीद आदी मालाची खरेदी केली जातेय. यासाठी अंदुरा येथे सबएजन्ट म्हणून ‘अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी’ या नोंदणीकृत संस्थेला खरेदीसाठी नियुक्त केले होतेय. मात्र, याच कंपनीला बदनाम करण्यासाठी काही व्यापारी, पणन विभागाचे काही अधिकारी आणि कंपनीतील काही भ्रष्ट प्रवृत्तींनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप कंपनीनं केलाय. 

कंपनीने सोयाबीन खरेदीसाठी नियुक्त केलेल्या व्यवस्थापक आणि कॉम्प्युटर ऑपरेटरशी काही व्यापाऱ्यांसह नाफेडच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केल्याचा आरोप कंपनीच्या संचालक मंडळाने केलाय. यात शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी, व्यवस्थापक आणि कॉम्प्युटर ऑपरेटरने सोयाबीन खरेदीच्या खोट्या नोंदी केल्यात. 

घोटाळ्याची व्याप्ती

बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरेदी केंद्रावर 68 शेतकऱ्यांची सुमारे 63  लाख 44 हजार 924 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यात काही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सात-बारांची ऑनलाईन नोंद करण्यात आली. 

खरेदी आणि विक्रीतील फरक 

कंपनीने 15 फेब्रुवारीनंतर एकूण 19723.92  क्विंटल सोयाबीन खरेदी केले, मात्र नेफेडच्या (NAFED) गोदामात केवळ 18426.92 क्विंटल माल जमा झाला. उर्वरित 1297 क्विंटल सोयाबीनचा गैरवापर झाल्याचे निष्पन्न झाले.

खोट्या नोंदी 

अज्ञात व्यापाऱ्याने व्यवस्थापक आणि संगणकचालकाला हाताशी धरून 1297 क्विंटल सोयाबीन विक्रीच्या खोट्या नोंदी केल्याचा संशय आहे. 

‘अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी’ने राबविले होते शेतकरी हिताचे अनेक उपक्रम  

‘अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी’… अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा गावातील विविध शेतकरी हिताचे उपक्रम राबविल्याने नावारूपास आलेली शेतकरी उत्पादक कंपनी. या कंपनीने आपल्या केंद्रावर माल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना चहापाणी, नाश्त्याची व्यवस्था केली होती. यासोबतच शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे विविध परिसंवाद आयोजित केले होते. यासोबतच महिलांसाठी हळदीकुंकू, शेतकऱ्यांसाठी किर्तन असे अनेक उपक्रम कंपनीने राबविले होते. यासाठी कंपनीला वेळोवेळी कृषी विभाग आणि आत्माच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. कंपनीने ‘स्मार्ट प्रकल्पां’तर्गत अंदुरा येथे उभारलेले गोदाम, शेतमाल खरेदी केंद्र पहायला या प्रकल्पाचे अनेक मोठे अधिकारी अंदुरा येथे येऊन गेले आहेत. 

कंपनीच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? 

हा प्रकार लक्षात आल्याने कंपनीच्या वतीने 24 फेब्रुवारी, 4 मार्चला जिल्हा पणन अधिकाऱ्यांना या प्रकाराची लेखी तक्रार करण्यात आली. यासोबतच 9 मार्चला कंपनीने जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तरही दिले. तर 11 तारखेला शेतकरी कंपनीने याप्रकरणात दोषींवर कारवाईसाठी पोलीस तक्रारही केलीय. मात्र, या तक्रारींवर अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नाहीय. मात्र, यात कोणतीही कारवाई न केलेल्या जिल्हा पणन अधिकारी मारूती काकडे यांच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी कंपनीच्या संचालक मंडळासह 12 लोकांवर गुन्हे दाखल केलेय. यासंदर्भात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रियेसाठी कोणताही प्रतिसाद दिला नाहीय. याप्रकरणात काकडे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

खरेदी घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार काही संशयीत व्यापारी?

यात सहभागी व्यापाऱ्यांनी संगनमत करून काही शेतकऱ्यांकडून त्यांचे सातबारे घेतलेत. एका शेतकऱ्याच्या ‘सात-बाऱ्या’वर एका दिवशी 25 क्विंटल खरेदी करण्याची परवानगी ‘नाफेड’ने  दिलीय. याचाच फायदा घेत शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचे सोयाबीन हमीभावापेक्षा खरेदीचा गोरखधंदा राज्यभरात सुरू असल्याची गंभीर बाब समोर आलीय. यासोबतच 6 फेब्रुवारीला अंदुरा केंद्रावर फक्त अर्ध्या तासात 742 क्विंटल सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी ‘नाफेड’च्या पोर्टलवर करण्यात आली. याकडे पणन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का?, हा प्रश्न विचारला जातोय. 

कंपनीला बदनाम करण्यासाठी राजकीय हस्तक्षेपाचा आरोप 

दरम्यान, राजकीय हस्तक्षेपातून कंपनीला बदनाम केलं जात असल्याचा आरोप कंपनीने केला आहे. यात काही व्यापारी, दलाल, कंपनीतील काही लोक यासोबतच काही राजकीय लोकांनी लोकप्रतिनिधींना दिशाभूल करणारी चुकीची माहिती दिल्याचा आरोप कंपनीने केला आहे. यातून कंपनीची प्रतिमा डागाळत शेतकरी हिताच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न गैरव्यवहाराच्या आरोप करून केला जात असल्याचं कंपनीने म्हटलंय. यात कंपनीतील कुणीही दोषी असेल तर त्यावर कठोर कारवाईची मागणी संचालक मंडळाने केलीय. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून यातील संभ्रम दूर करण्याची विनंती सरकारला केली आहे. 

अकोला जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहार हे यातील भ्रष्टाचाराच्या हिमनगाचं टोक आहेय. या संपुर्ण प्रकरणात सरकारने तटस्थपणे चौकशी करत ‘दुध का दुध, पाणी का पाणी करणे’ आवश्यक आहेय. मात्र, व्यापारी, पणन विभाग, नाफेड आणि कंपनीतील भ्रष्ट प्रवृत्तीच्या दृष्ट साखळीत निरपराध भरडले जावू नयेत हिच सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. 

अधिक पाहा..



Source link