अकोला : लग्नाआधी प्रियकर अन् प्रेयसी यांच्यातील प्रेम लग्नानंतर (Marriage) अधिक घट्ट होतं, असं म्हणतात. पण, प्रेमविवाह न करता, कुटुंबाच्या सहमतीने लग्न झालेल्या पती अन् पत्नीच्या निखळ प्रेमाची कित्येक उदाहरणं समाजात आहेत. आपल्या पतीसोबत शेतात कुळव धरुन शेती करणारी पत्नी आपण पाहिली असेल. रस्त्यावर भाजीचा गाडा लावणाऱ्या पतीला मदतीची हात देणारी पत्नी तुम्ही पाहिली असेल, तर पतीच्या कामात खांद्याला खांदा लावून मदत करणारी अर्धांगिणी तुम्ही पाहिली. म्हणूनच, पती अन् पत्नीच्या प्रेमाची गोष्ट छोटी डोंगराएवढीय, असे म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अकोल्यातील (Akola) एका जोडप्यानं आपल्या याच प्रेमाची (Love) जणू कबुलीच दिल्याची घटना घडली आहे.

शहरातील एका वयस्कर दांपत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. 60 वर्ष वैवाहिक जीवन आनंदात घालवल्यानंतर 82 वर्षीय रमेशसिंग आणि 76 वर्षांच्या पद्माबाई या वयस्कर दांपत्यानं जगाचा निरोप घेतला. या दोघांच्या मृत्यूमध्ये केवळ 8 तासांचा फरक होता. या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, म्हणूनच त्यांनी एकत्रपणे या जगातून निरोप घेतल्याची चर्चा आता त्यांच्या मृत्यूनंतर होत आहे. रमेशशिंग आणि पद्माबाई या दोघांची पहिली भेट साधारणता 60 वर्षापूर्वी रमेशसिंग हे लग्नासाठी मुलगी पाहायला गेले असता झाली, त्यावेळी ते 22 वर्षांचे, तर पदमाबाई अंदाजे 16 वर्षांच्या होत्या. कुटुंबातील वरिष्ठांनी दोघांचे लग्न लावले. दरम्यान लग्नानंतर पद्माबईंनी पतीसोबत अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरात अख्खं आयुष्य घालवलं. 60 वर्षापेक्षा दीर्घकाळ एकमेकांसोबत राहिल्यानंतर दोघांचं काल मध्यरात्री निधन झाले. आज (27 मे’रोजी) सोमवारी दुपारी राहत्या बाळापुरात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय भावनिक आणि प्रेमाची साक्ष देणारा हा दु:खद प्रसंग पाहून स्मशानात अनेकांचे डोळे पाणावले.

अकोला जिल्ह्याच्या बाळापुर शहरातील गुजराती पूरा भागातील ही घटना. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या 8 तासातच पत्नीचाही मृत्यू झाला. लग्नानंतर 60 वर्षे एकत्र आयुष्याचा प्रवास केल्यानंतर दोघांनी काही वेळाच्या अंतरातच जगाचा निरोप घेतला. रमेशसिंग करणसिंग गौतम (वय 82) आणि पदमाबाई रमेश गौतम (वय 72) यांचा 60 वर्षापूर्वी विवाह झाला होता. पदमाबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील असून, रमेशसिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी होते. कुटुंबातील वरिष्ठांच्या एकमतांने दोघांचा विवाह पार पडला होता. दोघांनाही लग्नानंतर दोन मुलं आणि दोन मुली झाल्या. मुला-मुलींचे लग्न होऊन नातवंड झाली. दोघांनी 60 वर्षे सोबत संसार केल्यानंतर काल मध्यरात्री त्यांनी अखेरचा जगाचा निरोप घेतला.

पति रमेशसिंग यांचे दीर्घ आजाराने रविवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास मृत्यु झाला. तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी पद्माबाई यांचादेखील आज पहाटे मृत्यू झाला. पती-पत्नीच्या निधनानंतर परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान दोघांनीही आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवला. त्यामुळेच पतीच्या मृत्यूचा धक्का पदमाबाईंना सहन न झाल्यानेच त्यांनीही आपाल जीव त्यागल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आज दुपारी राहत्या घरापासून पती-पत्नीची अंत्ययात्रा काढण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येनं नातेवाईक आणि स्थानिक लोक सहभागी झाले. दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. बाळापुरच्या स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी, दोघांमध्ये खूप प्रेम होतं, असे यावेळी कुटुंबीयांनी सांगितले.
Source link