Bhandara News भंडारा : वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरवर जागतिक दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प होत आहे. त्याच्या भूमिपूजन समारंभाकरिता काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) भंडाऱ्यात आले होते. दरम्यान, भूमीपूजनाचा कार्यक्रम आटपून सभास्थळाकडं जात असताना जिल्हा परिषद चौकात युवक काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रकरणी युवक काँग्रेसच्या सहा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर, सभास्थळी गोसेखुर्द प्रकल्प (Gosekhurd Dam) बाधित एका महिलेसह पाच जणांनी सभेदरम्यान नारेबाजी करीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अशा अकरा जणांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घोषणाबाजी अन् काळे झेंडे दाखवणं काँग्रेसच्या पदाधिकार्यांना भोवलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते भंडाऱ्यात काल 547 कोटींच्या विकासकामाच्या भूमिपूजन संपन्न झाले. यात 102 कोटीच्या खर्चातून होत असलेल्या जागतिक दर्जाचे जल पर्यटन प्रकल्पाचा देखील समावेश आहे. मात्र हा कार्यक्रम अनेक कारणांनी चर्चेत आला आहे. एकीकडे भूमिपूजनाच्या फलकावर जलसंपदा मंत्री आणि पर्यटनमंत्री यांचे नावच गायब असल्याचे आढळून आले. तर विरोधी पक्षातील अनेक नेते कार्यक्रमाला उपस्थित असताना महायुतीतील प्रमुख नेत्यांनाच आमंत्रण मिळाले नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाने महायुतीत मतभेदाची दरी निर्माण केली आहे का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. तर आता भंडाराचे माजी खासदार आणि भाजप नेते सुनील मेंढे यांनी भाजप नेत्यांना कार्यक्रमाचं निमंत्रणात नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनाही कार्यक्रमाचा निमंत्रण नव्हतं. त्यामुळे महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असून समन्वय वाढवण्याची गरज असल्याचं मेंढे म्हणाले होते.
मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रेसने दाखविले काळे झेंडे
दरम्यान, दुसरीकडे भंडाऱ्यातील या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला स्थानिकांचा विरोध होताना देखील बघायला मिळाले होते. गोशीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना मागील दोन वर्षापासून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप भेट देत नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी कालच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्या मागण्यांना घेऊन या प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅन मध्ये कोंबून नेलं. हा सर्व प्रकार भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेदरम्यान घडला.
काँग्रेसच्या पदाधिकार्यांसह 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
तर दुसरीकडे जागतिक जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा सभा स्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसने त्यांना काळे झेंडे दाखविले. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात हे काळे झेंडे दाखविण्यात आले. यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्यासह काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता या प्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकार्यांसह 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..