Uddhav Thackeray, अकोला : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विधानसभेच्या आखाड्यात उतरावं असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं होतं. बावनकुळे यांनी आव्हान दिल्यानंतर  उद्धव ठाकरेंना थेट अकोला पश्चिम मतदारसंघातून उभा करण्याची मागणी महाविकास आघाडीकडे  (Mahavikas Aaghadi) करण्यात आली आहे. 

अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे माजी नेते जावेद जकारिया (Javed Zakaria) यांनी महाविकास आघाडीकडे ही मागणी केलीये. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांना पत्र लिहलं आहे. 

जावेद जकारिया काय काय म्हणाले? 

उद्धव ठाकरे अकोला पश्चिम मतदारसंघातून उभे राहिले तर अकोल्यातील मतदार त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दंगलीचा इतिहास असलेल्या अकोला शहरात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीने जातीय सलोखा निर्माण होणार असल्याचंही जावेद जकारिया यांनी म्हटलंय. जकारीया यांच्या या मागणीला आता महाविकास आघाडी कसा प्रतिसाद देते? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दरम्यान, गेल्या 30 वर्षांपासून अकोला पश्चिम मतदार संघावर भाजपचे वर्चस्व आहे. 

कोण आहेत जावेद जकारिया?

जावेद जकारिया अकोल्यातील  जकारिया फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. मुस्लिमातील कच्छी मेनन समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अकोल्यातील सामाजिक क्षेत्रात मोठी ओळख असल्याचेही बोलले जाते. कोरोना काळात 2200 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले होते, त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुकही झाले होते. वर्षभरापूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, भाजप आणि शिंदे सेनेतील काही नेत्यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांमुळे पक्षाचा राजीनामा  दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केलं होतं. 

देवेंद्र फडणवीस पाच वेळेस लोकांमधून निवडून आले – चंद्रशेखर बावनकुळे

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकांमधून निवडणूक जिंकली नाही. आमदार म्हणून निवडून आलेले नाहीत. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी विधानपरिषदेवर आमदारकी मिळवली होती. शिवाय याउलट देवेंद्र फडणवीस हे लोकनेते आहेत. ते पाच वेळा आमदार म्हणून लोकांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी लोकांमधून निवडून येऊन दाखवावे, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महायुतीत राष्ट्रवादीला झुकतं माप? विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाहांसोबत अजित पवारांची वेगळ्या फिल्डिंगच्या चर्चा

 

 

अधिक पाहा..



Source link