Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून तिसऱ्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि त्यानंतरही भाजपाच्या सहकारी पक्षांचे म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते. मोदींनी हा अर्ज भरल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांच्या डोक्यावर जिरोटप घालण्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात जिरेटोपाला मानाचं स्थान आहे. त्यामुळेच एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर अनेक शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरुन शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस गटानेही प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराजांचा अवमान केला; शरद पवार गटाचा दावा

भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित असतानाच प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना हा जिरेटोप घातला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेकडून आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीकडून उपस्थित होते. यावेळेस मोदींना प्रफुल्ल पटेल यांनी स्वत:च्या हाताने हा जिरेटोप चढवला. पटेल मोदींच्या डोक्यावर जिरेटोप घालतानाचा व्हिडीओ पोस्ट करत शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेलांवर टीका केली आहे. “जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे,” असं शरद पवार गटाने म्हटलं आहे. 

जनता शांत बसणार नाही

“महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही,” असंही या पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. 

संभाजी ब्रिगेडचा इशारा

पटेल यांच्या या कृतीवरुन संभाजी ब्रिगेडनेही नाराजी व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही जिरोटोप परिधान करु नेय असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यावरही जिरेटोप परिधान करण्याचा प्घात आहे. पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत. फक्त छत्रपतीच जिरेटोप परिधान करु शकतात. जिरेटोपाचा असा अपमान केला जाऊ नये,” असा इशारा दिला आहे.

भाजपा-शिंदे गटाची सारवासारव

दरम्यान, भारतीय जनता पार्टी तसेच शिंदे गटाने या प्रकरणावर भाष्य करताना ‘यामध्ये मोदींचा दोष नाही’ असे म्हटले आहे. “जिरेटोपावरुन राजकारण करु नये, ज्यांनी जिरोटोप घातला त्या पंतप्रधानांचा यात काय दोष? असाप्रकारची पुनरावृत्ती होणार नाही,” असं उद्योगमंत्री उदय सामंत या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले. तर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे यांनी, “प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला यात पंतप्रधानांचा दोष काय?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

जिरेटोपाला राज्याभिषेकातही होतं विशेष स्थान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबरोबरच त्यांच्या काही खास गोष्टींना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अनन्यसाधारण महत्त्व आणि मानाचं स्थान आहे. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे जिरेटोप! 6 जून 1674 मध्ये राज्यभिषेकाच्या सोहळ्यातही या जिरेटोपाला विशेष स्थान होते. 





Source link