Amravati News अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) पराभवाला सामोरे जावं लागल्याचे बघायला मिळाले. या पराभवाची कारणे आणि त्यावरील मंथन केल्यानंतर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार असल्याचा विश्वास दर्शवला. तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचून न जाता पूर्ण ताकदीनं विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कार्यकर्त्यांना कामाला जागण्याचे आदेश दिले आहे. परिणामी, त्या अनुषंगाने वंचित कामाला लागल्याचे बघायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार
विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविणार असल्याची स्थिती आहे. कारण आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यासाठी वंचितने राज्यभरात हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी आणि मुलाखती वंचित घेत आहे. दरम्यान, अमरावतीतील विधानसभेसह राज्यातील संपूर्ण विधानसभा वंचित पूर्ण ताकदिने लढवणार असल्याची माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिलीय.
महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
अमरावतीत वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा आज युवा प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हाभरातून अनेक उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखती दिल्या आणि वंचितकडून उमेदवारीची मागणी करण्यात आली. राज्यभरात वंचितला चांगला प्रतिसाद मिळत असून उमेदवारी संदर्भात ऍड. बाळासाहेब आंबेडकर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहितीही वंचित तर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार असल्याने पुन्हा स्थानिक स्तरावर महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये लावण्यात आलेले एक बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील क्रांती चौकात लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाला स्पष्टपणे विरोध करण्यात आला आहे. आर.बी. फाऊंडेशनकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख शुभेच्छूक असा करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षण द्यायला विरोध केला आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे.
फलकावर नेमकं काय लिहिलंय?
शासकीय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हा एक महत्त्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे. त्यामधे रक्ताच्या नातेवाईकांची (वडील, भाऊ, बहीण, काका, आत्या ) जात प्रमाणपत्रे हा एक आवश्यक पुरावा असतो. या अतिशय महत्त्वपूर्ण मानलेल्या पुराव्याला बगल देण्याचे काम ‘सगेसोयरें’ (रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांना) जातप्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाद्वारे केलेले आहे. आरक्षण कायदा व नियमावली मधे चुकीची ढवळाढवळ करण्याची मनमानी सरकार करत आहे. अशा प्रकारे संविधानाची आरक्षण निती आणि आरक्षणा मागील सामाजिक भूमिकेशी द्रोह करण्याचा अपराध सरकार व आरक्षण विरोधक करत आहेत. त्यामुळेच समाजातील सामाजिक सौहार्द व बंधुभावाला तडे जात आहेत. जाती समुहात भांडणे लावण्याचे हे षडयंत्र आहे. वंचित बहुजन आघाडी सगसोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी या ठरावाद्वारे ही परिषद करीत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..